ETV Bharat / state

उत्सवापेक्षा माणुसकी महत्त्वाची! आमदार रवी राणांकडून विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धा रद्द, पीडित कुटुंबांना देणार 50 लाख

अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील भीषण अग्निकांडात नवजात बालकांचा मृत्यू झाल्यामुळे, आमदार रवी राणा यांनी यंदाची विदर्भस्तरीय भव्य दहीहंडी स्पर्धा रद्द करण्याचा संवेदनशील निर्णय घेतला आहे.

MLA Ravi Rana Cancels Dahi Handi
आमदार रवी राणांकडून विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धा रद्द (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : September 2, 2026 at 8:12 PM IST

|

Updated : September 2, 2026 at 8:32 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

अमरावती : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर, आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या वतीनं गेली वीस वर्षे आयोजित करण्यात येणारी विदर्भस्तरीय भव्य दहीहंडी स्पर्धा यंदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 6 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या दहीहंडी स्पर्धेऐवजी केवळ बालगोपाळांच्या हस्ते दहीहंडीचं पूजन करून साध्या पद्धतीनं परंपरा कायम ठेवली जाणार असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली.

गरजू आणि पीडित कुटुंबांना 50 लाख रुपयांची मदत

“रुग्णालयातील दुर्घटनेनंतर शहरासह जिल्ह्यात शोकाकुल वातावरण आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत नेहमीप्रमाणे जल्लोषात उत्सव साजरा करणं योग्य ठरणार नाही, यामुळे आम्ही या वर्षी दहीहंडी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला. स्पर्धेसाठी होणारा सुमारे 50 लाख रुपयांचा खर्च विविध गरजू आणि पीडित कुटुंबांना आर्थिक मदतीच्या स्वरूपात देण्यात येणार आहे,” असं आमदार रवी राणा म्हणाले.

माध्यमांशी बोलताना आमदार रवी राणा (ETV Bharat)

मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख

“जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनेत नवजात बालकांचा मृत्यू झाला. या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याचं सांगत, रवी राणा यांनी त्यांच्या घरी जाऊन प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. पूजा स्वप्निल बोरंगे या रोजंदारीवर काम करतात, गायत्री प्रफुल चोपडे यांच्या पतीची खासगी नोकरी असून किरण गंगाराम बेठेकर या शेतमजुरी करतात. या तिन्ही महिलांनी आपलं बाळ गमावलं असून, त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत त्यांना आर्थिक व मानसिक आधार देण्याचा हा प्रयत्न आहे,” असं रवी राणा म्हणाले.

वाचलेल्या 36 बालकांच्या कुटुंबीयांनाही मदत

“आगीतून बचावलेल्या 36 बालकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तसंच संबंधित कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीनचं वाटप करून त्यांना स्वयंरोजगाराचा आधार देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे,” असं आमदार रवी राणा यांनी जाहीर केलं.

दिव्यांग बालकांच्या शिक्षणाची जबाबदारी

“जिल्हा स्त्री रुग्णालयात कर्णबधिर, अंध किंवा अपंगत्वासह जन्मलेल्या बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचंही आमदार रवी राणा यांनी जाहीर केले. याशिवाय रुग्णालयातील कंत्राटी परिचारिका व कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांना रोख स्वरूपात मदत देण्यात येणार आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांनाही या निधीतून आर्थिक मदत केली जाणार आहे,” असं आमदार रवी राणा यांनी सांगितलं.

अमरावतीसह चार तालुक्यातील दहीहंडी कार्यक्रम रद्द

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी पत्राद्वारे केलेल्या विनंतीच्या पार्श्वभूमीवर, अमरावती शहरातील दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं रवी राणा यांनी सांगितलं. अमरावतीसह परतवाडा, धारणी, अंजनगाव सुर्जी आणि तिवसा येथील नियोजित दहीहंडी कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.

बालगोपाळांच्या हस्ते साधेपणानं दहीहंडी

“दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या दहीहंडीतील जल्लोष, रोषणाई आणि मनोरंजनाला यंदा फाटा देण्यात येणार आहे. 6 सप्टेंबर रोजी कोणताही गाजावाजा न करता केवळ बालगोपाळांच्या हस्ते दहीहंडीचं पूजन करून ती फोडण्यात येणार आहे. उत्सवाची परंपरा कायम ठेवत, त्याला यंदा सामाजिक संवेदनशीलतेची जोड देण्यात आली आहे,” असं आमदार रवी राणा म्हणाले.

हेही वाचा -

अमरावती रुग्णालय आग दुर्घटना : नवजातांच्या मृत्यूची जबाबदारी शासनाने स्वीकारली; दोषी आढळल्यास कारवाई- पालकमंत्री बावनकुळे

"शेम ऑन यू फडणवीस", अमरावती रुग्णालयातील दुर्घटनेनंतर सुषमा अंधारे यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Last Updated : September 2, 2026 at 8:32 PM IST