आमदार राजेश क्षीरसागरांचा कथित 'स्टिंग' व्हिडिओ व्हायरल; क्षीरसागरांचा रविकिरण इंगवलेंवर ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा
आमदार राजेश क्षीरसागरांचा कथित आर्थिक देवाणघेवाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांनी हे ब्लॅकमेलिंग असल्याचे सांगत ५ कोटींच्या दाव्याचा इशारा दिला.

Published : June 28, 2026 at 2:53 PM IST
कोल्हापूर : शिवसेना आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या कथित व्हिडिओनं कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते रविकिरण इंगवले यांनी स्टिंग ऑपरेशन करत आर्थिक देवाणघेवाणीचा व्हिडिओ व्हायरल केला. याबाबतची तक्रार कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडं करणार असल्याचं रविकिरण इंगवले यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमदार राजेश क्षीरसागर यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी रविकिरण इंगवले यांनी केली आहे. यानंतर ऋतुराज राजेश क्षीरसागर यांनी रविकिरण इंगवले यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती दिली. तसंच आमदार राजेश क्षीरसागर पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर प्रतिक्रिया देणार आहेत, असंही ते म्हणाले.
क्षीरसागर यांनी मिळवलेल्या संपत्तीची चौकशी व्हावी : शिवसेना (उबाठा) नेते रविकिरण इंगवले यांनी व्हायरल केलेल्या या व्हिडिओवर 25 ऑक्टोंबर 2025 अशी तारीख दिसत आहे. या व्हिडिओत कोल्हापूर उत्तर शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आणि संबंधित व्यक्तीचा व्यवहार, टक्केवारीची भाषा आणि वरिष्ठांना पैसे द्यावे लागतात, असा उल्लेख आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून झाला आहे. याप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी भूमिका मांडली. कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या प्रत्येक कामात आमदार राजेश क्षीरसागर टक्केवारी घेतल्याशिवाय कंत्राटदारांकडून कामेच करून घेत नाहीत. आतापर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून आणि विधान मंडळाचा आमदार म्हणून काम करताना क्षीरसागर यांनी मिळवलेल्या संपत्तीची चौकशी व्हावी. ज्या कोल्हापूरच्या जनतेनं त्यांना निवडून दिलं आहे, त्यांची फसवणूक करत राजेश क्षीरसागर प्रत्येक कामात टक्केवारीची भाषा करतात. याबाबत आपण कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन शर्मा यांच्याकडं तक्रार देणार आहोत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या व्हिडिओची दखल घेत प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी रविकिरण इंगवले यांनी केली आहे.
आमदार क्षीरसागर पत्रकार परिषद घेऊन मांडणार भूमिका : आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर झालेल्या आरोपाबद्दल प्रतिक्रिया जाणवण्यासाठी फोन केला असता आमदार क्षीरसागर यांनी याबाबत सविस्तर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याचे सांगितलं. मात्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेल्या या व्हिडिओची चर्चा सध्या कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असून काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनीही "असा व्हिडिओ समोर येत असेल तर त्याची शहानिशा करून तत्काळ चौकशी करावी," अशी मागणी केली आहे.
अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांचा कंत्राटधारासोबत संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर आमदार क्षीरसागर यांनी आणि कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक ऋतुराज राजेश क्षीरसागर यांनी पत्र काढून आपली भूमिका मांडली. "अशा कोणत्या प्रकाराला आम्ही भीक घालत नाही. इंगवले हे ब्लॅकमेलर आहेत. त्यांच्यावर पाच कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे," असं नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी पत्रात म्हटलं आहे.
राजू शेट्टींची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत : आमदार राजेश क्षीरसागर आणि कंत्राटदार यांच्यातील संवादात 40 लाख रुपये दिल्याचा उल्लेख आढळतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आमदार क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधत यासाठीच शक्तीपीठ महामार्ग हवा आहे का, असा प्रश्न उपस्थित करत क्षीरसागर यांच्यावर बोचरी टीका केली आहे. यामुळे क्षीरसागर यांच्या अडचणीत वाढ होत आहे.
हेही वाचा :

