जरांगेंना आमदार प्रसाद लाड यांनी पाजलं पाणी; मात्र उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार
सातारा-कोल्हापूर गॅझेटच्या जीआरवर जरांगे ठाम असून, दोन दिवसांत काम न झाल्यास सलाईन काढून फेकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.


Published : September 2, 2026 at 10:41 PM IST
जालना | अंतरवाली सराटी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने बुधवारी रात्री राजकीय हालचालींना वेग आला. आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटीत दाखल होत जरांगे पाटील यांची भेट घेतली. ‘भाऊ’ म्हणून आलो असून, जरांगेंना साथ देण्यासाठी आलो असल्याचे लाड यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करताना आमदार प्रसाद लाड यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत सरकारकडून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
58 लाख नोंदी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीवर लावण्यात येणार : 58 लाख कुणबी नोंदी, जात प्रमाणपत्र पडताळणी, दाखल गुन्हे मागे घेणे, मराठा-कुणबी कक्ष, ओबीसींच्या सवलती, सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि नोकरी नियुक्ती अशा विविध मुद्द्यांवर सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. लाड यांच्या माहितीनुसार, 58 लाख नोंदी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीवर लावण्यात येणार असून, संबंधित नोंद आढळणाऱ्या अर्जदारांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त केला जाणार असून, या संपूर्ण प्रक्रियेचे मॉनिटरिंग आपण स्वतः करणार असल्याचे लाड यांनी सांगितले. मराठवाड्यात जात पडताळणी प्रमाणपत्राची प्रक्रिया सुरू करण्याबाबतही उद्यापर्यंत कार्यवाही होईल, असे आश्वासन लाड यांनी दिले.
सातारा-कोल्हापूर गॅझेटवर जरांगे ठाम : मात्र, सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनांवर मनोज जरांगे पाटील यांनी पूर्ण समाधान व्यक्त केले नाही. सातारा आणि कोल्हापूर संस्थानच्या गॅझेटचा जीआर काढल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘बिना जीआर उपोषण थांबवणार नाही’, अशी भूमिका घेत जरांगेंनी सरकारला थेट आव्हान दिले. या गॅझेटचा जीआर काढून तीन महिन्यांत त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीबाबतही जरांगेंनी सरकारला सवाल केला. जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे हैदराबाद गॅझेटनुसार प्रलंबित असलेली सहा प्रमाणपत्रांची प्रकरणे मार्गी लावून दाखवा, त्यानंतरच आपण पाणी पिऊ, अशी अट त्यांनी मांडली.
आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी : मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणीही जरांगेंनी केली. गुन्हे मागे घेतले नाहीत तर संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही गुन्हे दाखल करा, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. मराठा समाजातील सुमारे 350 तरुणांना PSI पदावर नियुक्ती मिळालेली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांना नियुक्ती देण्याची मागणीही जरांगेंनी केली. तसेच मराठा विद्यार्थ्यांना ओबीसींना लागू असलेल्या शैक्षणिक सवलती लागू कराव्यात आणि विद्यार्थ्यांनी भरलेली फी परत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
‘दोन दिवसांत काम झालं नाही तर सलाईन काढून फेकतो’ : दरम्यान, जरांगे पाटील यांची प्रकृती पाहून आपण काल रात्री झोपू शकलो नाही, असे आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. त्यांनी जरांगेंना पाणी पिण्याची विनंती केली. यानंतर आमदार प्रसाद लाड यांनी स्वतःच्या हाताने जरांगे पाटील यांना पाणी पाजले. मात्र, पाणी प्यायल्यानंतरही जरांगे यांनी उपोषण मागे घेतलेले नाही. ‘जरांगे पाणी पितील, सलाईन लावतील; पण दोन दिवसांत काम झाले नाही तर सलाईन काढून फेकतील, मात्र उपोषण सोडणार नाहीत’, अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली. पाणी पाजल्यानंतर जरांगे पाटील यांनी आमदार प्रसाद लाड यांचे आभार मानले. मात्र, मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी कायम ठेवला आहे.
सरकारसमोर आता सातारा-कोल्हापूर गॅझेटचा पेच : एकीकडे सरकारकडून विविध मागण्यांवर कार्यवाहीचे आश्वासन दिले जात असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील सातारा-कोल्हापूर संस्थानच्या गॅझेटच्या जीआरवर ठाम आहेत. त्यामुळे अंतरवाली सराटीतील उपोषणाच्या पुढील हालचालींकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
हेही वाचाः

