नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुण्यात युती तुटली, मंत्री उदय सामंत मात्र वेगळ्याच भ्रमात
शिवसेनेचे नेते राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देत कुठेही युती तुटली नसल्याचं सांगितलं.

Published : December 30, 2025 at 3:52 PM IST
|Updated : December 30, 2025 at 4:13 PM IST
पुणे : राज्यात महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, अनेक ठिकाणी भाजपा आणि शिवसेना युती म्हणून निवडणूक लढणार आहे. अनेक महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपाच्या जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नसून, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना युती तुटली असल्याचं सांगितलं जात आहे. यावर शिवसेनेचे नेते राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देत कुठेही युती तुटली नसल्याचं सांगितलं.
यावेळी उदय सामंत म्हणाले, "मी शिवसेना पक्षाच्या वतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यावर पुण्यात आलो आहे. मुंबई महापालिकेत भाजपा, शिवसेना आणि रिपाइं यांची महायुती झाली असून, १३७ जागा भाजपा आणि रिपाइं लढत आहे, तर ९० जागांवर शिवसेना लढत आहे. शिवसेना ९० ठिकाणी मुंबईत लढत आहे. शिवसेना - उबाठा पक्ष मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार हे मी सांगितलं होतं. कोणत्याही आपल्या मित्रपक्षाला मोठं होऊ द्यायचं नाही असा जो आविर्भाव शिवसेना - उबाठा यांचा आहे, त्याची प्रचिती आता राज ठाकरे यांना येत आहे."
राज्यात युती कायम - उदय सामंत : राज्यात महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. "सर्वांचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही महायुतीचा भगवा फडकावण्यासाठी सज्ज झालो आहोत. राज्यातील कुठल्याही महापालिकेत महायुती तुटली असं चित्र नाही. आम्ही इच्छुकांना एबी फॉर्म दिले आहेत. अर्ज माघारी तसंच छाननीला वेळ असल्याने आम्ही महायुती म्हणून एकत्र बसणार आहोत आणि अंतिम निर्णय घेणार आहोत," असं स्पष्टीकरण मंत्री उदय सामंत यांनी दिलं. त्यामुळं खरंच राज्यात युती आहे का? असा सवाल भाजपा आणि शिवसेनेतील कार्यकर्त्यांना पडलाय.
उदय सामंत यांचं स्पष्टीकरण : पक्षाकडून अनेक इच्छुकांना उमेदवारी अर्ज देण्यात आले, तर काहींना देण्यात न आल्यानं ते नाराज झाले आहेत. त्यांनी उमेदवारी अर्जासाठी पैसे घेतल्याचा आरोप केलाय. याबाबत उदय सामंत यांना विचारलं असता ते म्हणाले, "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कोणीही पैसे घेऊन उमेदवारी देणार नाही. जर असं होत असेल तर हे खूप दुर्दैवी आहे. आमच्या पक्षात एकही नेता असा नाही की जो आर्थिक व्यवहार करून उमेदवारी अर्ज देईल."
कार्यकर्त्यांनी नेमकं करायचं काय? : राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये भाजपा आणि शिवसेनेची युती तुटली असल्याची घोषणा स्थानिक नेत्यांनी केलीय. त्यामुळं आता सामंत यांच्या विधानानुसार, जर युती तुटली नसेल आणि स्थानिक नेत्यांनी जर युती तुटल्याची घोषणा केली असेल तर कार्यकर्त्यांनी नेमकं करायचं काय? असा प्रश्न विचारला जातोय.
हेही वाचा -
- छत्रपती संभाजीनगरमध्ये युती तुटली; भाजपा कार्यालयासमोर इच्छुक उमेदवारांचा गोंधळ, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळं टळला अनर्थ
- 'नगरपालिका निवडणुकीप्रमाणं शिवसेनेला महापालिका निवडणुकीत यश मिळेल'- मंत्री भरत गोगावले
- कोल्हापुरात महायुतीचं जमलं, भाजपा मोठा भाऊ, तर शिवसेना, राष्ट्रवादीच्या वाट्याला किती जागा? जाणून घ्या

