'एकनाथ शिंदे भाजपाविरोधात भूमिका घेणार...'; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून नाराजीनाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्याची सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावर आता पडदा टाकण्याचा नेते प्रयत्न करत आहेत.

Published : November 23, 2025 at 9:57 AM IST
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्याची सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. रावणाची लंका अहंकारामुळं जळून खाक झाली हे जे काही वाक्य त्यांनी म्हटलं आहे त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. ते म्हणाले, "एकनाथ शिंदे यांची ही भूमिका शिवसेना - उबाठाच्या विरोधात आहे. ते भाजपाच्या विरोधात काही भूमिका घेतील असं मला वाटत नाही."
आम्ही महायुती म्हणून एकत्र : यावेळी विखे पाटील म्हणाले, "मी त्यांचं मत ऐकलं नाही. राज्यात महायुती म्हणून आम्ही एकत्र काम करत आहोत. काही ठिकाणी विविध युती, आघाडी झाल्या असल्या तरी राज्यात महायुती म्हणून आम्ही जोमानं काम करत आहोत. एकनाथ शिंदे यांची आणि माझी भेट झाली असून, त्यांच्या नाराजीबाबत चर्चेचा काही विषय देखील येत नाही. वरिष्ठ पातळीवर याबाबत नेते मंडळी निर्णय घेतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीमधील सर्वांना एकत्रित घेऊन पुढे जाण्याचं काम करत आहेत. स्थानिक पातळीवर जरी अडचण असली तरी वरती महायुतीला काहीही झालं नाही."
...म्हणून दोघे भाऊ एकत्र : ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेबाबत तसेच राज ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबत विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. जेव्हा महाविकास आघाडी तयार झाली तेव्हाच मी सांगितलं होतं की हे एकत्र राहणार नाहीत. सत्तेसाठी हे एकत्र आले होते. काँग्रेसची अवस्था तर खूपच बिकट झाली आहे. राज्याच्या जनतेने महाविकास आघाडीला नाकारलं आहे. ते राज्यातून हद्दपार झालेत. मुंबई महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले असून, आपला भ्रष्टाचार उघडकीस येईल या भीतीने दोघे भाऊ एकत्र येत असल्याचं यावेळी विखे पाटील यांनी सांगितलं.
हेही वाचा -

