ETV Bharat / state

इतिहास विद्यार्थ्यांपर्यत पोहचवण्यात यंत्रणा कमी पडते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली खंत

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाच शिक्षण विभागाबाबत खंतही व्यक्त केली.

Minister Radhakrishna Vikhe Patil
विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 9, 2026 at 7:59 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

अहिल्यानगर - विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये संशोधनात्मक वृती निर्माण करण्यासाठी शालेय स्तरावर अधिक प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. विज्ञान प्रदर्शनासाठी अधिकच्या सोयी सुविधा निर्माण करून देतानाच एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

जामखेड येथील नागेश विद्यालय येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग व जिल्हा विज्ञान-गणित अध्यापक संघ, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन २०२५-२६ चा पारितोषिक वितरण समारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, "विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. घोकमपट्टीच्या शिक्षणाचे दिवस आता संपले आहेत. विद्यार्थ्यांनी प्रयोग, संशोधन व निरीक्षणावर भर दिला पाहिजे. यासाठी शिक्षकांच्या मानसिकतेत सुद्धा बदल होण्याची अपेक्षा आहे."

Minister Radhakrishna Vikhe Patil
विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती (ETV Bharat Reporter)

इतिहास विद्यार्थ्यांपर्यत पोहचवण्यात यंत्रणा कमी पडते - आपल्याला थोर शास्त्रज्ञांची परंपरा लाभली. प्रत्येकानं आपल्या योगदानातून देशाला बलशाली बनवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. या सर्व थोर शास्त्रज्ञांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यत पोहचवण्यात यंत्रणा कमी पडत असल्याची खंत विखे पाटील यांनी व्यक्त केली.

शिक्षण विभागाला केली सूचना - आज जगभरात भारतीय शास्त्रज्ञ आपली क्षमता सिद्ध करत आहेत. ब्रम्होस, चांद्रयान मोहीम यामाध्यमातून तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून आत्मनिर्भर भारताकडे देशाची वाटचाल सुरू आहे. देशात तसेच जगभरात तंत्रज्ञानात होत असलेले बदल व नवनवीन संशोधनाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी इस्रो, नासा यांसारख्या वैज्ञानिक संस्थांना विद्यार्थ्यांच्या सहलीचे आयोजन करण्याची सूचना त्यांनी शिक्षण विभागाला केली.

Science Fair jamkhed
विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती (ETV Bharat Reporter)

कौशल्य विकास कार्यक्रमात उभारी - ते पुढे म्हणाले, "संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आजच्या घडीला प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होताना दिसत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विविध क्षेत्रांमध्ये वेगाने वाढत आहे. देश कौशल्य विकास कार्यक्रमात उभारी घेत असून, उद्योगांच्या मागणीनुसार अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमातून कौशल्याधारित कोर्सेस सुरू करण्यात यावेत. कालानुरूप शैक्षणिक अभ्यासक्रमातील बदलते प्रवाह यासारख्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावेत."

आजच्या आधुनिक व तंत्रज्ञानाच्या बदलत्या युगात अशा जिल्हास्तरीय प्रदर्शनांमधून भावी गुणवंत वैज्ञानिक घडावेत, यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. प्रदर्शन आयोजनासाठी असलेल्या ५ लाख रुपयांच्या निधीत वाढ करून तो १ कोटी रुपयांपर्यंत करण्यात येईल. या माध्यमातून जिल्ह्यातून भविष्यात मोठे शास्त्रज्ञ व संशोधक घडतील, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा - 'भगवा'आमच्या रक्तात, सुजय विखे पाटील यांचा निवडणूक आयोगावर प्रहार