येत्या 15 दिवसांत साकळाई पाणी योजनेच्या कामाला सुरूवात करणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही
सारोळे कासारा इथं जवळपास 3 कोटी रुपयांच्या विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलं.


Published : January 11, 2026 at 4:46 PM IST
अहिल्यानगर : येत्या पंधरा दिवसांत साकळाई पाणी योजनेच्या कामाची सुरूवात करून लाभक्षेत्रातील गावांना दुष्काळमुक्त करण्याची ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तालुक्यातील सारोळे कासारा इथं जवळपास 3 कोटी रुपयांच्या विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी साकळाई योजनेचं काम पूर्ण करून स्व.शिवाजीराव कर्डीले यांचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. तसंच ते म्हणाले की, "वर्षानुवर्ष पाण्याची प्रतिक्षा या भागातील लोकांना करावी लागली. महायुती सरकारनं साकळाईच्या सर्व कामांना मंजूरी दिली असून, पुढील पंधरा दिवसात कामाला सुरूवात करण्याच्या सूचना विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसंच साकळाईच्या कामामुळं सारोळा कासार येथील 295 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येऊन 13 बंधाऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल," असं त्यांनी सांगितलं.
प्रत्येक गावाला 3 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार : "ग्रामीण भागाचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल. ही भूमिका ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू आहे. केंद्र सरकारनं नव्यानं आणलेल्या विकसित भारत जी राम जी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावाला 3 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासाचं नियोजन करताना 125 दिवसांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे. तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ समाज घटकांना मिळत आहे. सुरू केलेली एकही योजना बंद नाही. कोव्हिडनंतर सुरू झालेल्या मोफत धान्य योजनेची मुदत वाढविण्यात आली असून, लाडकी बहीण योजना देखील सुरू राहणार आहे," असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
गुंतवणुकीचा फायदा जिल्ह्याला कसा होईल, हा प्रयत्न : याचबरोबर, "कुकडी कालव्याच्या कामांना 400 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असून कालव्याची काम मार्गी लगल्यानंतर आवर्तनाचा चाळीस दिवसांचा कालावधी कमी होईल. शेवटच्या गावाला पाणी मिळावं म्हणून पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा विचार जलसंपदा विभाग करीत आहे. जिल्ह्यात रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यात येत असून राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली येत असलेल्या गुंतवणुकीचा फायदा जिल्ह्याला कसा होईल, हा प्रयत्न असून, संरक्षण उत्पादनाचं केंद्र म्हणून आपला जिल्हा नावारूपाला येईल. दळणवळणाची साधन उपलब्ध होत आहेत. छत्रपती संभाजीनगर पुणे ग्रानी फिल्ड मार्ग होत आहे. जिल्हा मोठ्या औद्यगिक नगरांना जोडला जात असल्यानं जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचं काम युवकांच्या भवितव्याच्या दृष्टीनं करायचं आहे," असंही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.
कमानीचं लोकार्पण : दरम्यान, घोसपुरी इथं माजी सैनिकांनी उभारलेल्या कमानीचं लोकार्पण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, सैनिकांच्या त्यागाला समाज विसरून जातो, अशी खंत व्यक्त करत,"राष्ट्र प्रथम ही भावना असली पाहिजे. जिल्ह्यातील सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या विचारानं अकोला जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या स्मारकाप्रमाणे आपल्या जिल्ह्यात स्मारक उभारण्याचा मानस आहे," असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमास भाजपाचे जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग उद्योजक दिलीप दाते, सरपंच आरती कडूस, रविंद्र कडूस, योगिता निंभोरे, सरपंच किरण साळवे संतोष खोबरे दादाभाऊ चितळकर रंगनाथ निमसे यांच्यासह पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
हेही वाचा :
- 'जे काम उबाठानं केलं, त्याचं श्रेय चोरू नका' : संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
- मुंबई, ठाण्यासारखंच नाशिकमध्ये 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांची घरपट्टी माफ करू ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- बाळासाहेबांनी भरवलं नसतं, तर तुमचा राजकीय मृत्यू झाला असता, - उद्धव ठाकरे यांचा भाजपावर हल्लाबोल!

