ETV Bharat / state

पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांचा एकाच गाडीतून प्रवास, गहिनीनाथ गडावर दोघांमधील वैर संपलं?

मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्यानं त्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Pankaja Munde suresh dhas travel
गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमात नेतेमंडळी एकत्र (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 10, 2026 at 7:03 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

बीड - श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथील कार्यक्रमाला मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस हे एकाच गाडीतून प्रवास करुन आल्याचं चित्र पाहायला मिळालं. यामुळं बीडच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. विधानसभा निवडणुकीला विरोधी उमेदवाराचा प्रचार केल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केला होता. तेव्हापासून या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन आमदार सुरेश धस यांनी सातत्यानं मुंडे यांच्यावर टीका करत आरोप केले होते. त्यानंतर शनिवारी या दोघांचा एकाच गाडीतून प्रवास झाल्यानं त्यांच्यातील वैर गहिनीनाथ गडावर संपल्याचं बोललं जात आहे.

Pankaja Munde suresh dhas
गहिनीनाथ गड पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम (ETV Bharat Reporter)

सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांचा एकाच गाडीतून प्रवास - श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे वामनभाऊ यांची 50 वी पुण्यतिथीचा कार्यक्रम शनिवारी झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आमदार सुरेश धस हे सर्वजण एकाच व्यासपीठावर एकत्र होते. हॅलिपॅडवरून मंत्री पंकजा मुंडे व आमदार सुरेश धस यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्यानं कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळं मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यातील असलेलं वैर या गडावरून संपलं असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Pankaja Munde suresh dhas
गहिनीनाथ गड पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम (ETV Bharat Reporter)

संत वामनभाऊ महाराजांचे विचार मार्गदर्शक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "संत वामनभाऊ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी मी येथे आलो. हे निमंत्रण मुख्यमंत्र्याला नसून, संत वामनभाऊ महाराजांच्या एका भक्ताला आणि गहिनीनाथ गडाच्या सेवकाला विठ्ठल महाराजांनी दिलं आहे. या भावनेतून मी येथे उपस्थित आहे. नाथ परंपरेतील महान संत आणि शंकराचा अवतार मानले जाणारे संत वामनभाऊ महाराज हे समाजाला दिशा देणारे गुरु होते. दऱ्या-खोऱ्यांतून प्रवास करत त्यांनी भागवत पंथाचा प्रचार केला आणि समाजात एकोप्याचा संदेश दिला. मन शुद्ध असेल तर आचरण शुद्ध होतं हा विचार त्यांनी समाजमनात रुजवला. त्यांच्या उपदेशामुळं चोरसुद्धा चोरी सोडून माळकरी झाले, ही त्यांची अलौकिक किमया होती."

Pankaja Munde suresh dhas
गहिनीनाथ गड पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम (ETV Bharat Reporter)

काय म्हणाल्या मंत्री पंकजा मुंडे? - "मी पालकमंत्री असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी निधी आणून विकासकामांना सुरुवात केली होती. एक लेक म्हणून अधिकाधिक भव्यदिव्य अशा गडाच्या विकासाची मनोमन इच्छा होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुधात साखर टाकली असून, आज जो गहिनीनाथ गडाचा विकास सुरू आहे तो एकमेव देवेंद्र फडणवीस यांच्यामुळंच शक्य झाला. त्याचबरोबर लोकांचं हे प्रेम, आशीर्वाद आणि डोळ्यातील आदर कायम राहण्याजोगं काम आपल्या हातून घडावं हीच संत वामनभाऊ चरणी आपण प्रार्थना करतो, अशा भावना मंत्री पंकजा मुंडे यांनी गहिनीनाथ गडावर बोलताना व्यक्त केल्या.

हेही वाचा -

  1. हरित लवादाच्या आदेशाला केराची टोपली, महानगरपालिकेनं तोडली 30 ते 40 झाडं; पर्यावरणप्रेमी संतप्त
  2. बदलापूर लैंगिक प्रकरण : सहआरोपी तुषार आपटेला भाजपानं केलं स्वीकृत नगरसेवक; नागरिकांच्या संतापानंतर राजीनामा
  3. 'मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही'; के. अण्णामलाईंच्या वक्तव्यानं भाजपा अडचणीत? राज्यातील भाजपा नेत्यांची 'चुप्पी'!