'माता-भगिनींचे आशीर्वाद, पुण्याईची कवचकुंडले माझ्या पाठीशी..', मंत्री हसन मुश्रीफ यांचं कागलमध्ये रक्षाबंधन
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी मतदारसंघातील हजारो माता-भगिनी आणि ब्रह्माकुमारी संस्थेच्या भगिनींनी एकत्र येत रक्षाबंधन साजरं केलं.

Published : August 28, 2026 at 5:18 PM IST
कोल्हापूर : बहीण-भावाच्या नात्याचा प्रेमळ सण 'रक्षाबंधन' आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना त्यांच्या कागल येथील निवासस्थानी लाडक्या माता-भगिनींनी पवित्र राखीचा धागा बांधला. यावेळी उपस्थित माता-भगिनींनी आपल्या लाडक्या भाऊरायाच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली, तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी ओवाळणी देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. ''तमाम माता-भगिनींचे आशीर्वाद आणि पुण्याईची कवचकुंडले माझ्या पाठीशी आहेत," अशा भावना मंत्री हसन मुश्रीफ यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.
तब्बल सहा वेळा कागल विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवलेले आणि राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदापर्यंत मजल मारलेले सहकारातील नेते म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ ओळखले जातात. ''अटीतटीच्या लढतीत प्रत्येक विजयात मतदार संघातील माझ्या लाडक्या माता भगिनींनी मला ओवाळणीरुपी मतांचं दान देऊन या पदापर्यंत पोहोचवलंय, भगिनींच्या प्रेमानं आशीर्वादामुळेच आपण सर्व काही करू शकलो'', अशी भावना यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. राज्यभरातील बहिणींना सक्षम आरोग्य सेवा देऊन अडचणीच्या काळातही आपण या भगिनींसोबत उभं राहिलो, समाजातील सर्व माता भगिनींच्या आशीर्वादानं प्रेमामुळेच आजपर्यंतची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले.
मंत्री हसन मुश्रीफ यांचं निवासस्थान असलेल्या कागल येथील मुजावर गल्ली परिसरात आज सकाळपासूनच लाडक्या भाऊरायाचं औक्षण करण्यासाठी मतदारसंघातील अनेक माता-भगिनींनी हजेरी लावली होती. मतदारसंघातील जनतेला भेटण्यासाठी मंत्री मुश्रीफ दररोज सकाळी साडेसहा वाजता उपस्थित असतात; आज मात्र तेथे महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. दरवर्षी रक्षाबंधनाच्या या पवित्र दिवशी मंत्री हसन मुश्रीफ आपल्या लाडक्या भगिनींकडून राखी बांधून घेतात, तोच अभूतपूर्व सोहळा आजही येथे पाहायला मिळाला.
कागल येथील प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या भगिनींनी सालाबादप्रमाणं यंदाही हसन मुश्रीफ यांचं रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं औक्षण केलं. यावेळी कागल मतदारसंघातून आलेल्या हजारो माता-भगिनी उपस्थित होत्या.
हेही वाचा -
शिर्डीत साईभक्तीचा अनमोल संगम : गुजरातच्या बहिणींनी साकारल्या साईबाबांसाठी विशेष राख्या
'तू कुठून तरी येशील . . . .' : रक्षाबंधनाला 'दादां'च्या आठवणीत खासदार सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट

