ETV Bharat / state

श्रावण सोमवार त्र्यंबकेश्वर; त्र्यंबकेश्वरला गर्दी टाळण्यासाठी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी केला एसटीनं प्रवास

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज खंबाळे वाहनतळ ते त्र्यंबकेश्वरदरम्यान एसटीनं प्रवास केला. त्यांच्यासह जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह आदींचाही समावेश होता.

Girish Mahajan Traveling MSRTC Bus
पालकमंत्री गिरीश महाजन (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 24, 2026 at 7:01 PM IST

|

Updated : August 24, 2026 at 8:04 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नाशिक : श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर इथं भाविकांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज खंबाळे वाहनतळ ते त्र्यंबकेश्वरदरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसनं प्रवास केला. पालकमंत्री यांच्यासमवेत जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह आदींनीही प्रवास केला. देशातील बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये आज श्रावण सोमवारनिमित्त राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येनं भाविक दर्शन व ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेसाठी येतात.

Girish Mahajan Traveling MSRTC Bus
पालकमंत्री गिरीश महाजन (ETV Bharat)

सोमवारी भाविकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी : श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी झाली. या पार्श्वभूमीवर आज प्रशासनानं त्र्यंबक शहरापासून चार किलोमीटर अंतरावर खंबाळे या ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था केली आहे. तिथून एसटी बसनं भाविकांना त्र्यंबकेश्वरपर्यंत व तिथून पार्किंग अशी एसटी बसची व्यवस्था केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं केलेल्या नियोजनाची पाहणी तसेच आपल्या वाहनांच्या ताफ्यामुळे भाविकांना त्रास होवू नये, याची काळजी घेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी एसटी बसमधून प्रवास करण्यास प्राधान्य दिलं. यादरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी श्रावण सोमवारनिमित्त जिल्हा प्रशासनानं केलेल्या तयारीचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

त्र्यंबकेश्वरला गर्दी टाळण्यासाठी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी केला एसटीनं प्रवास (ETV Bharat)

प्रशासनाचा चोख बंदोबस्त : श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर इथं कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठिकठिकाणी पोलीस आणि होमगार्ड यांचा मोठा फौजफाटा आहे. याशिवाय ब्रह्मगिरी फेरीच्या मार्गावर जागोजागी आरोग्य पथक असून डॉक्टरांकडून भाविकांची तपासणी केली जात आहे. त्यासोबतच नाशिकहून त्र्यंबकेश्वरसाठी एसटी महामंडळानं बसच्या अतिरिक्त फेऱ्यात वाढ केली आहे.

दर्शनासाठी तीन ते चार तास : दुसऱ्या श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात आज पहाटे भगवान त्र्यंबकेश्वराची विशेष महापूजा व अभिषेक करण्यात आला. यानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनानं दर्शन रांगेचं विशेष नियोजन केलं. पूर्व दरवाजा व इतर मार्गांवरून भाविकांना प्रवेश दिला जात आहे. भाविकांना दर्शनासाठी साधारण तीन ते चार तासांचा कालावधी लागत आहे.

आम्ही बसनं केला प्रवास : "मागील श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे एकदा वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आम्ही त्र्यंबकेश्वरच्या चार किलोमीटर आधी खंबाळे इथं खासगी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था केली होती. तिथून पुढं एसटी बसची सुविधा करण्यात आली. मी देखील बसनं प्रवास करत आहे. त्र्यंबकेश्वरला वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे, त्यासाठी आम्ही बसनं त्र्यंबकेश्वरला निघालो आहोत," असं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. कुंभमेळ्याचे काम देण्याच्या आमिषानं बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी कुणाचीही गय केली जाणार नाही - गिरीश महाजन
  2. रायगड-नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला! भरत गोगावले आणि गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी; गोगावले यांची 'ईटीव्ही भारत'ला Exclusive प्रतिक्रिया
  3. कुंभमेळ्याच्या नावानं कोट्यवधींची फसवणूक; विभागीय आयुक्तांच्या नावानं बनावट वर्क ऑर्डर!
Last Updated : August 24, 2026 at 8:04 PM IST