ETV Bharat / state

मंत्री गणेश नाईक यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, शिंदे म्हणाले 'चोराच्या उलट्या बोंबा'

भाजपा नेते तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत. शिंदे यांनीही या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Ganesh Naik on eknath shinde
मंत्री गणेश नाईक यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 9, 2026 at 3:27 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - महायुतीतील पक्ष काही महापालिकांमध्ये युतीत, तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारादरम्यान राज्याच्या कॅबिनेटमध्ये एकत्र असलेले नेतेच आता एकमेकांविरोधात टोकाची टीका करताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपा नेत्यांमधील वाद सुरू असतानाच, वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेच्या प्रचारात थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.

एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप - "सिडको प्रशासनात बिल्डरांचे दलाल बसले असून, भूखंड थेट बिल्डरांच्या खिशात घातले जात आहेत," असा खळबळजनक आरोप नाईक यांनी केला. जाहीर सभेत बोलताना त्यांनी कोविड काळातील कथित गैरव्यवहारांचाही उल्लेख केला. “कोविडच्या भीषण संकटात नवी मुंबईत येणारी औषधे आणि इंजेक्शन्स लंपास करण्यात आली. रबाळे एमआयडीसीमध्ये हॉस्पिटलसाठी तयार होणारा ऑक्सिजन गॅसही चोरून नेण्यात आला. औषधं चोरली, गॅस चोरला आणि पाणीही चोरलं,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

shivsena rally
शिवसेनेचा प्रचार (ETV Bharat Reporter)

शिवसेनेची जोरदार बॅनरबाजी - दरम्यान, नवी मुंबईत शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी सुरू आहे. शहराच्या विविध भागात ‘नवी मुंबई, नवं सरकार’ या आशयाचे बॅनर झळकत असून, ‘हुकूमशाही संपवणार’, ‘भ्रष्टाचारमुक्त कारभार’, ‘लाडक्या बहिणींचा तारणहार’, ‘हक्काच्या घराचे स्वप्न साकार’ अशा घोषणांद्वारे गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे.

गणेश नाईक यांचा यूडीसीपीआरला आक्षेप - याचवेळी गणेश नाईक यांनी यूडीसीपीआर (UDCPR) योजनेवरही तीव्र टीका केली. “सध्याची यूडीसीपीआर योजना नेमकी कोणत्या शहाण्याने तयार केली? असा प्रश्न आहे. पूर्वी मुंबईत एकच एफएसआय दिला जात होता. साधी गॅलरी काढली तरी एनजीओ आणि नागरिक विरोध करत असत, त्यामुळे मुंबईचे वेगळे महत्त्व होते. मात्र, यूडीसीपीआरमुळे आज एफएसआय खैरातीसारखा वाटू लागला आहे,” असा आरोप त्यांनी केला. “उद्या या शहरांमध्ये टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या, तर संपूर्ण परिसर काँक्रीटने भरून जाईल. मोटरसायकल चालवणेही अशक्य होईल. एक-दोन नव्हे, तर अनेक उन्नत रस्ते करावे लागतील,” अशी भीतीही नाईक यांनी व्यक्त केली.

dcm eknath shinde
भाषणात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ETV Bharat Reporter)

एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल - त्याचबरोबर गेली पाच वर्षे महापालिकांमध्ये प्रशासकाचा कारभार आहे. त्यामुळे या कालावधीसाठी आम्हाला कोणीही दोष देऊ शकत नाही. या पाच वर्षांत जे काही वाटोळं झालं आहे, ते सर्व प्रशासकीय काळातच घडलं आहे. त्या काळाचं नेतृत्व कोण करत होतं, हे सांगण्याची गरज नाही,” असे म्हणत गणेश नाईक यांनी नगरविकास मंत्री असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला.

शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध वनमंत्री गणेश नाईक यांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, "आम्ही सत्तेत एकत्र आहोत. त्यामुळं एकमेकांवर टोकाची टीका करायची नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. ते आम्ही पाळतोय." पण, प्रत्यक्षात मात्र असं होताना दिसत नाहीये.

minister ganesh naik
भाषणात बोलताना मंत्री गणेश नाईक (ETV Bharat Reporter)

चोराच्या उलट्या बोंबा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : गणेश नाईक यांच्या आरोपांना स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. शिंदे म्हणाले, “नवी मुंबईमध्ये इतकी वर्ष सत्ता कोणाची आहे? मग आम्ही चोराच्या उलट्या बोंबा आहेत असं म्हणू शकतो. पण, आम्ही आरोपांना आरोपाने उत्तर न देता कामाने उत्तर देतो. नवी मुंबईची जनता सुज्ञ आहे.”

नवी मुंबईत भाजपा, शिवसेनेचा वेगवेगळा जोर - मुंबई, ठाणे आणि कल्याण–डोंबिवली महापालिकांमध्ये भाजपा-शिवसेना युती झाली असली, तरी नवी मुंबईत मात्र गणेश नाईक यांच्या आग्रहामुळं भाजपा नेतृत्वानं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईतील जागावाटपाचे संपूर्ण अधिकार गणेश नाईक यांना देण्यात आले असून, त्यामुळं भाजपाच्या उमेदवार यादीत प्रामुख्याने नाईक निष्ठावंतांचा समावेश करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडूनही नवी मुंबईत प्रचाराचा जोर लावण्यात आला आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेवर कोण सत्ता मिळवणार हे निकालानंतरच कळेल.

हेही वाचा -

  1. "देवेंद्र फडणवीसांची इच्छा चांगली, पण...", मुंबईच्या मुद्द्यांवर काय म्हणाले राज ठाकरे?
  2. मनपा निवडणुकीच्या धुराळ्यात मुंबई भाजपाकडून 26 पदाधिकाऱ्यांचं 6 वर्षांसाठी निलंबन, कारण काय?
  3. 'रोज खा मटण अन् कमळाचं दाबा बटण' : अशोक चव्हाण यांचा मतदारांना अजब सल्ला