ETV Bharat / state

मेळघाट व्याघ्र प्रकल्प : 52 वर्षांची यशस्वी वाटचाल, वाघांसाठी सुरक्षित ठिकाण

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या स्थापनेला 52 वर्ष पूर्ण झालीत. अनेक दृष्टीकोनातून हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Melghat Tiger Reserve
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या स्थापनेला 52 वर्ष पूर्ण (ETV Bharat Reporter/GFX)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 22, 2026 at 12:22 PM IST

4 Min Read
Choose ETV Bharat

BY - Shashank Laware

अमरावती - सातपुडा पर्वतरांगांच्या सानिध्यात वसलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या स्थापनेला 52 वर्ष पूर्ण झालीत. 22 फेब्रुवारी 1973 रोजी स्थापन झालेला हा प्रकल्प देशातील पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. सध्या मेळघाटमध्ये 44 वाघांची नोंद असून, वाघांच्या सुरक्षित अधिवासासाठी हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या स्थापनेला 52 वर्ष पूर्ण (ETV Bharat)

व्याघ्र प्रकल्पाची पार्श्वभूमी - 1970 च्या दशकात भारतातील वाघांची संख्या झपाट्यानं घटू लागल्यानं केंद्र सरकारनं 1973 मध्ये देशात 'प्रोजेक्ट टायगर' अर्थात व्याघ्र प्रकल्प सुरू केला. त्यानुसार सुरुवातीला नऊ व्याघ्र प्रकल्प स्थापन करण्यात आले. आज देशात 58 व्याघ्र प्रकल्प कार्यरत आहेत. त्यापैकी सहा व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रात आहेत. सध्या भारतामध्ये 3600 हून अधिक वाघ आढळून येतात. ही समाधानाची बाब आहे. राज्यनिहाय विचार केला तर मध्य प्रदेशात सर्वाधिक 745 वाघ असून महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात एकूण 444 वाघ आहेत.

Melghat Tiger Reserve history
मेळघाट व्याघ्र प्रकल्प (ETV Bharat GFX)

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचं वैशिष्ट्य -

  • सातपुडा पर्वतरांगेतील विस्तीर्ण आणि दाट जंगल परिसर
  • बफर आणि कोअर क्षेत्रांची प्रभावी रचना
  • जैवविविधतेनं समृद्ध परिसर
  • सध्या 44 वाघांची नोंद

मेळघाटात आदर्श अधिवास - वाघ हा अत्यंत आक्रमक प्राणी आहे. एक वाघ हा दुसऱ्या वाघाला आपल्या क्षेत्रात सहज येऊ देत नाही. त्यामुळं अधिवास पुरेसा आणि सुरक्षित असणं आवश्यक ठरतं. त्या दृष्टीनं मेळघाटचं विस्तीर्ण जंगल वाघांसाठी आदर्श अधिवास ठरलं असल्याची माहिती मेळघाटात कार्य करणारे 'ऑर्गनायझेशन फॉर कुला'चे अध्यक्ष राजेश महाल्ले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

'अशी' होते वाघांची गणना - "दर चार वर्षांनी वाघांची गणना केली जाते. त्यासाठी कॅमेरा ट्रॅप प्रणाली, वाघांच्या पावलांचे ठसे आणि वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो. प्रत्येक वाघाच्या शरीरावरील पट्टे हे वेगळे असतात. माणसांच्या बोटांचे ठसे जसे भिन्न असतात, अगदी तसेच वाघांच्या पट्ट्यांमध्ये फरक असतो. त्यामुळं वाघांची ओळख पटवणं सोपं जातं," अशी माहिती पर्यावरण शास्त्राचे अभ्यासक प्रा.डॉ.वैभव म्हस्के यांनी दिली.

Melghat Tiger Reserve
मेळघाट व्याघ्र प्रकल्प (ETV Bharat Reporter)

शिकारीपासून संरक्षणापर्यंत... - ब्रिटिश काळात मोठ्या प्रमाणात शिकार होत असायची. प्रसिद्ध शिकारी जिम कॉर्बेट यांनी सुरुवातीला नरभक्षक वाघांचा बंदोबस्त केला. मात्र, नंतर त्यांनी वन्यजीव संरक्षणाची गरज अधोरेखित केली. यामुळं त्यांच्या नावावरून 'जिम कॉर्बेट नॅशनल पार्क' स्थापन करण्यात आलं. "भारतामध्ये 1972 साली वन्यजीव संरक्षण कायदा लागू करण्यात आला. या कायद्याअंतर्गत वाघांसह सर्व वन्यजीवांना कायदेशीर संरक्षण देण्यात आलं. शिकारीमुळं काही प्रजाती लुप्त झाल्या. भारतातील चित्ते 1947 नंतर नामशेष झाले होते. अलीकडं त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न झाला," असं प्रा.डॉ.वैभव म्हस्के यांनी सांगितलं.

अंधश्रद्धा आणि धोका - चीन, तायवांसारख्या काही देशांमध्ये वाघांच्या कातड्याबाबत आणि हाडांपासून औषध बनवण्यासंदर्भात अंधश्रद्धा असल्यानं तस्करीचं प्रचंड प्रमाण होतं. चीन आणि तायवांमध्ये चक्क वाघाचं कातडं पांघरल्याने पुनर्जन्म मिळतो, अशी अंधश्रद्धा आहे. यामुळं तस्करीचं प्रमाण फार होतं. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरही वाघ संरक्षणासाठी सहकार्य आवश्यक आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून वाघांचं संरक्षण केलं जातं.

मेळघाटात इंदिरा गांधींची ऐतिहासिक भेट - 1972 साली तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी मेळघाटला भेट दिली होती. त्यावेळी कोलकास परिसरात त्यांच्यासाठी खास विश्रामगृहाची व्यवस्था करण्यात आली होती. आज देखील कोलकास येथील विश्रामगृह ऐतिहासिक ठिकाण म्हणून ओळखलं जातं.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प
मेळघाट व्याघ्र प्रकल्प (मेळघाट व्याघ्र प्रकल्प)

असा आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार - अमरावती, अकोला आणि बुलढाणा अशा पश्चिम विदर्भातील तीन जिल्ह्यात एकूण 1 हजार 649.31 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात सातपुडा पर्वतरांगांमध्ये मेळघाट विस्तारला आहे. मेळघाटातील जंगलात वाघांसह असणारे अनेक प्राणी, पक्षी आणि आदिवासी संस्कृती आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करून आहे.

अशी आहे मेळघाटची विभागणी - मेळघाट वन्यजीव अभयारण्य, वान अभयारण्य, नरनाळा अभयारण्य अशा तीन भागात मेळघाटची विभागणी आहे.

मेळघाट वन्यजीव अभयारण्य - मेळघाट वन्यजीव अभयारण्याची अधिसूचना ही फेब्रुवारी 1974 मध्ये निघाली. हे अभयारण्य 788 चौरस किलोमीटरमध्ये पसरलं असून, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हे संरक्षित क्षेत्र आहे. या अभयारण्यात पूर्वी 23 गावं होती. त्यापैकी आठ गावांचं स्थलांतर झालं असून, सहा गावं स्थलांतरण प्रक्रियेत आहेत. या अभयारण्यात सेमाडोह, कोलकास आणि हरिसाल येथील पर्यटन संकुल प्रसिद्ध आहेत.

Melghat Tiger Reserve
मेळघाट व्याघ्र प्रकल्प (ETV Bharat Reporter)

वान अभयारण्य - वान वन्यजीव अभयारण्य हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचं विस्तारित क्षेत्र असून, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांच्या महत्त्वपूर्ण जंगल सीमांना एकत्र जोडणारा हा भाग आहे. जैवविविधतेनं समृद्ध असणारा हा परिसर भौगोलिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांनी समृद्ध आहे. प्राचीन मंदिरं, गुहा या अभयारण्यात आहेत. जंगलातील वान नदीचं पाणलोट क्षेत्र आणि वान धरणामुळं या अभयारण्याचं महत्त्व वाढलंय.

नरनाळा अभयारण्य - मेळघाटचं दक्षिणेकडील प्रवेशद्वार अशी नरनाळा अभयारण्याची ओळख आहे. अकोला जिल्ह्यात नरनाळा किल्ला हा अकोट तालुक्यातील शहानुर गावात आहे. समुद्रसपाटीपासून एक हजार मीटर वर असणाऱ्या नरनाळा किल्ल्यापासून थेट चिखलदरा येथील गाविलगड किल्ला असणाऱ्या पर्वतरांगांच्या प्रदेशापर्यंत नरनाळा अभयारण्य पसरलंय. साप, लांडगा असे प्राणी नरनाळा अभयारण्यात आढळतात.

मेळघाटात आढळणारे प्राणी - मेळघाट व्याघ्र प्रकल्पात 80 प्रजातीच्या सस्तन प्राण्यांची नोंद आहे. यामध्ये वाघ हा प्रमुख प्राणी असून, वाघांसह बिबट, रान कुत्रे, कोल्हा, अस्वल, रानगवा ,सांबर, चितळ, नीलगाय,रानडुक्कर, चौसिंगा हे वन्य प्राणी येतात. चांदी अस्वल, उडणारी खार खवले मांजर असे दुर्मिळ प्राणीही मेळघाटात असल्याची माहिती महाराष्ट्र वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य यादव तरटे यांनी दिली.

मेळघाटात अनेक पक्षांचा वावर - "मेळघाटात दुर्मिळ असा रानपिंगळा पक्षी हा भुरळ घालतो. रानपिंगळासह गरुड, गिधाड, धनेश, सुतार पक्षी, घुबड, समुद्र चोर, टकाचोर, स्वर्गीय नर्तक, कुटुंगा, कोतवाल, रान कोंबडी, रातवा, पोपट, पारवा, नाचण, दयाळ, धीवर, लाल मनोली, जांभळा शिंजीर, मोर असे पक्षी मेळघाटात आहेत," असं पक्षी मित्र डॉ. किरण मोरे यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. सातपुड्याच्या कुशीतील मेळघाटावर 35 वर्षानंतरही कुपोषणाचा कलंक; यंत्रणेत काय आहेत त्रुटी?
  2. विशेष संवर्धन कार्यक्रमाचा सकारात्मक परिणाम; मेळघाटात दहा वर्षानंतर पुन्हा फडफडले गिधाडांचे पंख
  3. प्राध्यापकाची आदर्श शेती; मेळघाटच्या पायथ्याशी असणाऱ्या एकलासपूरमध्ये दर आठवड्याला 60 क्विंटल वांग्याचे उत्पादन