ETV Bharat / state

फलटणमधील डॉ राजेंद्र रुपनवर यांच्या मृत्यूने वैद्यकीय क्षेत्र हादरले; मार्ड आक्रमक, वैद्यकीय अधीक्षक निलंबित

फलटणमधील डॉ राजेंद्र रुपनवर यांच्या मृत्यूने वैद्यकीय क्षेत्र हादरलय. २७ ऑगस्टला सायन स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला.

डॉ राजेंद्र रुपनवर
डॉ राजेंद्र रुपनवर (File)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 31, 2026 at 9:54 PM IST

|

Updated : August 31, 2026 at 10:02 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई/सातारा - फलटण, सातारा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र रुपनवर यांच्या दुर्दैवी मृत्यूने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 27 ऑगस्टला सायन स्टेशन येथे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असतानाच सोमवारी, 31 ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमागील नेमकी कारणं अद्याप स्पष्ट झालेली नसताना कामाच्या ठिकाणी झालेला कथित छळ तसंच बाह्य किंवा राजकीय दबावाच्या आरोपांनी प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे.

सेंट्रल मार्ड, बीएमसी मार्डनं या घटनेची तातडीने, स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केलीय. डॉक्टरांवर कोणत्याही प्रकारचा मानसिक छळ, धमकी, दबाव, दडपशाही किंवा अनुचित बाह्य हस्तक्षेप झाला आहे का, याचा सखोल तपास करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी भूमिका दोन्ही संघटनांनी घेतली आहे.



सेंट्रल मार्डने आपल्या निवेदनात फलटणमध्ये डॉक्टरांशी संबंधित अशा प्रकारची ही दुसरी दुर्दैवी घटना असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे फलटणमधील डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा तसंच त्यांच्या कामाच्या वातावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वैद्यकीय सेवा बजावताना डॉक्टरांना कोणत्याही प्रकारच्या भीती किंवा दबावाला सामोरे जावे लागू नये, अशी मागणी संघटनेनं केली आहे.

मार्डचे निवेदन
मार्डचे निवेदन (ETV Bharat)



आरोपांची सखोल चौकशी - डॉ रुपनवर यांच्या मृत्यूपूर्वीच्या परिस्थितीची प्रत्येक बाजू तपासली जावी. कामाच्या ठिकाणी कथित छळ झाला होता का, धमकी किंवा दबाव आणण्यात आला होता का, तसंच बाह्य अथवा राजकीय हस्तक्षेप होता का, याची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी बीएमसी मार्डने केली आहे. चौकशीत आरोप तथ्यात्मक असल्याचं आढळल्यास संबंधितांवर कायदा आणि योग्य न्यायप्रक्रियेनुसार कठोर कारवाई करण्यात यावी, असंही संघटनेनं स्पष्ट केलं आहे.


डॉक्टरांच्या सुरक्षितता, प्रतिष्ठा आणि सन्मानाशी कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, अशी ठाम भूमिका मार्डने घेतली आहे. प्रत्येक डॉक्टरला भीती, धमकी, मानसिक छळ किंवा अनुचित दबावाशिवाय वैद्यकीय सेवा बजावता यावी, यासाठी सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यपरिसर निर्माण करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे.


महाराष्ट्रात ठोस यंत्रणा उभारण्याची मागणी - डॉक्टरांच्या मानसिक छळाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात प्रभावी कायदे आणि संस्थात्मक यंत्रणा उभारण्यात याव्यात, अशी मागणी सेंट्रल मार्डने केली आहे. कोणत्याही डॉक्टरला छळ किंवा बाह्य दबावामुळे टोकाचे पाऊल उचलण्याच्या परिस्थितीत जावे लागू नये, यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, असं संघटनेनं म्हटलंय.

या प्रकरणातील आरोप अद्याप चौकशीअंती सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे निष्पक्ष तपासातूनच वस्तुस्थिती समोर येणे आवश्यक आहे. मात्र, डॉ रुपनवर यांच्या मृत्यूने डॉक्टरांच्या सुरक्षित कार्यपरिसराबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सेंट्रल मार्ड आणि बीएमसी मार्डने डॉ रुपनवर यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांप्रती संवेदना व्यक्त करत, या दुःखद प्रसंगी संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे. सरकारने या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे.

सातारा - डॉक्टरच्या मृत्यूनंतर फलटणमध्ये तणाव

माळशिरस तालुक्यातील डॉ रूपनवर यांच्या गावातील नागरिकांनी फलटणकडे धाव घेतल्यामुळे फलटणमध्ये तणाव निर्माण झाला आहे. नातेवाईक डॉ रुपनवर यांचं पार्थिव घेवून मुंबईहून फलटणच्या दिशेने येत आहेत. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना तत्काळ अटक न झाल्यास डॉ रुपनवर यांच्या पार्थिवावर उपजिल्हा रुग्णालयासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा इशारा नातेवाईकांनी दिला असल्याचं समजतं.

फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक निलंबित

डॉ राजेंद्र रुपनवर यांच्या आत्महत्या प्रकरणात फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांचं नाव समोर आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी यासंदर्भात चौकशी समिती नेमली होती. डॉ रुपनवर यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समितीला डॉ मदने या दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर आजच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यामध्ये एका राजकीय पक्षाशी संबंधितांनी डॉ राजेंद्र रुपनवर यांच्यावर राजकीय दबाव टाकून फिटनेस प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. मात्र डॉ रुपनवर यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता. यानंतर चिडलेल्या संबंधितांनी डॉ रुपनवर यांना शिवीगाळ तसंच धक्काबुक्की केली होती. डॉ रुपनवर यांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली होती. मात्र, संबंधित लोकांवर कारवाई होणे अपेक्षित असताना आरोग्य विभागातील वरिष्ठांनी त्यांच्यावरच कारवाई करीत त्यांचे वेतन रोखले होते. या कारवाईमुळे अस्वस्थ झालेल्या डॉ रुपनवर यांनी सोशल मीडियावर वरिष्ठांनी केलेल्या पिळवणुकीबाबत व्हिडिओ प्रसारित करुन मला न्याय मिळाला नाही तर मी आत्महत्या करणार असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तसंच काही लोकांची नावे त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये नमूद केली होती.

माझा संशयित मृत्यू झाल्यास जबाबदार व्यक्तीसंदर्भात डॉ रूपनवर यांच्या तळहातावर लिहलेला फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे फलटणच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवरील मानसिक ताण आणि कामाच्या परिस्थितीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत खळबळजनक दावे केले आहेत.

टीप - जीव देणं हा उपाय नाही : जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील, किंवा तुम्हाला एखाद्या मित्राची काळजी वाटत असेल, किंवा तुम्हाला भावनिक आधाराची गरज असेल, तर तुमचे ऐकण्यासाठी नेहमीच कोणीतरी आहे. स्नेहा फाउंडेशन - 04424640050 (24x7 उपलब्ध) किंवा आयकॉल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस हेल्पलाइन 9152987821 वर कॉल करा (सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत उपलब्ध).

हेही वाचा...

  1. डॉक्टर होण्याचा खर्च वाढला; डीम्ड मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस फी 27 लाखांपर्यंत
  2. पालिकेच्या रुग्णालयातील कारभाराबाबत नगरसेविका अदिती खुरसंगेंची नाराजी; रुग्णासोबत घडलेला प्रकार सांगितला...
Last Updated : August 31, 2026 at 10:02 PM IST