ETV Bharat / state

मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि तो आमचाच असणार, उद्धव अन् राज ठाकरेंकडून युतीची घोषणा

मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, असंही राज ठाकरे म्हणालेत.

Uddhav and Raj Thackeray announce the alliance
उद्धव अन् राज ठाकरेंकडून युतीची घोषणा (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : December 24, 2025 at 12:53 PM IST

|

Updated : December 24, 2025 at 4:49 PM IST

4 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई- शिवसेने(उबाठा)चे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अधिकृतरीत्या युतीची घोषणा केलीय. वरळी सी-फेसजवळील ब्लू सी हॉटेलमध्ये दोन्ही बंधूंनी संयुक्तरीत्या पत्रकार परिषद घेतलीय, त्यावेळी ते बोलत होते. मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, असंही राज ठाकरे म्हणालेत. जे काही बाकी बोलायचं आहे, जाहीर सभा सुरू होतील तेव्हा बोलू. परंतु माझी एक मुलाखत झाली होती, त्या मुलाखतीत मी म्हटलं होतं, कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. मला वाटतं तिथून त्या वाक्यापासून एकत्र येण्याची सुरुवात झाली, असंही राज ठाकरे म्हणालेत.

उद्धव अन् राज ठाकरेंकडून युतीची घोषणा (Source- ETV Bharat)

महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवणाऱ्या खूप टोळ्या- राज ठाकरे : कोण किती जागा लढवणार आकडा काय हे मी तुम्हाला सांगणार नाही, असं म्हणत महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवणाऱ्या खूप टोळ्या फिरत आहेत. त्यामध्ये दोन टोळ्या अजून जास्ती अॅड झालेल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात, जे निवडणुका लढवणार आहेत, त्या उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाणार आहे. शिवसेनेबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे जाहीर करीत आहोत, असंही राज ठाकरेंनी सांगितलंय.

मराठी माणसानं बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली- उद्धव ठाकरे : उद्धव ठाकरेंनीही पत्रकारांना संबोधित केलंय. ते म्हणाले की, बघा एवढं आमचं एकमत झालेलं आहे. सगळ्यांचं स्वागत करतोय. आता संजय राऊतांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून दिली. तो जो मंगल कलश आणला गेला तो काही सत्यनारायणाच्या पूजेसारखा आणला गेला नाही. त्यामागे मोठा संघर्ष झालेला आहे. 105 किंवा 107 किंवा त्याहूनही जास्त मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली आणि त्याची आठवण आज होणं स्वाभाविक आहे. आम्ही आज दोघेही इथे ठाकरे म्हणून बसलेलो आहोत. आमच्या दोघांचेही आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील पहिल्या पाच सेनापतींमधले एक सेनापती होते. त्यांच्यासोबत माझे वडील म्हणजे शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरेंचे वडील म्हणजे माझे काका श्रीकांत ठाकरे, म्हणजे अख्खं ठाकरे घराणं त्यावेळेला मुंबईसाठी संघर्ष करीत होते. त्याच्यानंतरचा इतिहास मी आता सांगत बसत नाही, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय.

न्यायहक्कासाठी शिवसेनेला शिवसेनाप्रमुखांना जन्म द्यावा लागला : मुंबई महाराष्ट्रानं मिळवल्यानंतर मुंबईमध्येच मराठी माणसाच्या उरावरती उपरे नाचायला लागले. त्यावेळेला न्यायहक्कासाठी शिवसेनेला शिवसेनाप्रमुखांना जन्म द्यावा लागला. साधारणतः 60 ते 65 वर्ष आता होतील, पुढच्या वर्षी शिवसेनेला 60 वर्षे होतील. इतकी वर्षे व्यवस्थित गेली, आता परत पाहतोय की, मुंबईचे लचके, मुंबईच्या चिंधड्या उडवायचे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती, त्यांचे प्रतिनिधी वरती म्हणजेच आता दिल्लीत बसलेले आहेत, त्यांचे मनसुबे आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठी- उद्धव ठाकरे : आता जर का आपण भांडत राहिलो, तर तो जो काय संघर्ष, ते जे काय हुतात्मा स्मारक आहे, त्याचा मोठा अपमान होईल. आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि मागेच म्हटलं एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठी. यापुढे मुंबई आणि महाराष्ट्रावरती कोणी वाकड्या नजरेनं किंवा कपटी कारस्थानानं मुंबईला महाराष्ट्रापासून आणि मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा खात्मा केल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेऊन मैदानात उतरलो आहोत. उत्साह अमाप आहे. विधानसभेच्या वेळेला भाजपानं जो अपप्रचार केला होता, बटेंगे तो कटेंगे तसंच मी मराठी माणसाला सांगतोय, आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल, तर पूर्णपणे संपून जाल. मराठी माणूस हा सहसा कोणाच्या वाटेला जात नाही. त्याच्या वाटेला जर का कोणी आलाच तर त्याला परत जाऊ देत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक- संजय राऊत : ज्या संख्येनं आपण सगळे इथे उपस्थित आहात आणि आपल्यातला उत्साह दिसतोय, ते पाहता एक गोष्ट नक्की आहे की, आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आहे. सकाळी मी कोणाला तरी सांगितलं की आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर जो महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात आलाय, तो मराठी ऐक्याचा मंगल कलश होता आणि आज मराठी ऐक्याचा मंगल कलश घेऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपल्यासमोर आलेले आहेत. तोच आनंदाचा क्षण आज महाराष्ट्राच्या जीवनात आलेला आहे. हाच मंगल कलश मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये भगवा ध्वज फडकावल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्राला फक्त ठाकरेच नेतृत्व देऊ शकतात आणि महाराष्ट्र ठाकरेंच्याच मागे जाईल हे सांगणारी आजची पत्रकार परिषद आणि आजचा दिवस आहे, असंही संजय राऊत म्हणालेत.

हा आनंदाचा क्षण - अरविंद सावंत : शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांची ऐतिहासिक युतीची आज घोषणा झाली. याबाबत शिवसेनेचे (उबाठा) खासदार अरविंद सावंत यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, "शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांची युतीचा लोकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. हा आनंदाचा क्षण आहे. दोन्ही बंधूंची एकत्र यावं, असं सर्व मराठी माणसांना वाटतं होतं."

...हे समीकरण पुन्हा एकदा अधोरेखित होईल - वरुण सरदेसाई : "शिवसेना (उबाठा) आणि मनसे एकत्र आल्याचा आनंद आहे. आमच्यासोबत सगळे मराठी आहेत. आजपर्यंत मराठी म्हणजे केवळ आडनाव पाहून आम्ही मतं मागितली नाहीत. आम्हाला सर्व लोक मतदान करतात, पुढंही करतील. मुंबईत गेल्या 30 वर्षांपासून शिवेसनेची सत्ता राहिली आहे. ती परत एकदा अबाधित राहील. शिवसेना, ठाकरे, मनसे हे समीकरण पुन्हा एकदा अधोरेखित होईल," अशी प्रतिक्रिया शिवसेने(उबाठा)चे आमदार वरुण सरदेसाई यांनी दिली.

राज्यातील प्रत्येक नागरिक आज आनंदित - सुनील शिंदे : "शिवसेना मनसे युतीची ऐतिहासिक घटना आज इथं नोंदवली गेली आहे. त्यामुळं आज राज्यातील प्रत्येक नागरिक हा आनंदित आहे. त्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण झाली. याचं समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. तसंच, अनेक पत्रकारांच्या चेहऱ्यावर देखील अशाच आनंद आम्हाला पाहायला मिळाला. या गोष्टी आम्ही आमच्या मनामध्ये साठवून ठेवल्या आहेत. भविष्यात ज्यावेळी चांगल्या गोष्टींची चर्चा होईल. त्यावेळी आजच्या दिवसाची चर्चा निश्चित होईल. तसंच या संपूर्ण राज्यानं बाळासाहेब आणि त्यांच्या कुटुंबीयांचा नेहमी आदर केला आहे," असं शिवसेना नेते (उबाठा) सुनील शिंदे यांनी म्हटलं आहे.

शिवसैनिक नक्की विजय खेचून आणतील- पेडणेकर : यावेळी शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी युतीबाबत आनंद आहे, अशी प्रतिक्रिया देत बाळासाहेबांची इच्छा प्रत्यक्षात उतरल्याचं समाधान व्यक्त केलंय. कार्यकर्ते खूपच आनंदी आहेत. वर्तमान बघा आणि भविष्य सुखकारक करा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. तसेच शिवसैनिक आणि मनसैनिक जिद्दी आहेत, निष्ठावंत आहेत. नक्की विजय खेचून आणतील, असा विश्वास किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलाय.

मराठी माणसासाठी आनंदाचा क्षण - देशपांडे : तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मराठी माणसासाठी आनंदाचा क्षण आहे. एकत्र लढायचं आहे. मराठीसाठी लढायचं आहे. आणि आम्ही सर्व एकत्र काम करू. बटेंगे तो पिटेंगे नहीं.. नहीं बटेंगे तो भी पिटेंगे अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.

हेही वाचाः

राज्यात भीतीचं वातावरण, भाजपा अमराठी भाषिकांना भडकावतंय; संजय राऊत कडाडले

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रहिवाशांचं लवकरच पुनर्वसन, राज्य सरकारनं ठाणे-पालघरमध्ये जागा शोधली

Last Updated : December 24, 2025 at 4:49 PM IST