बालकांवरील अत्याचाराच्या घटनांनंतर सुरक्षेचा प्रश्न गंभीर; सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याचे महापौरांचे निर्देश
पुणे शहरात नसरापूर आणि पर्वती परिसरात घडलेल्या गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर, महापौर मंजुषा नागपुरे यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.

Published : May 6, 2026 at 6:49 PM IST
पुणे : पुणे शहरात अलीकडेच नसरापूर आणि पर्वती परिसरात घडलेल्या लहान बालकांवरील अत्याचार आणि हत्येसारख्या अत्यंत गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर, शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या अनुषंगानं पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांची भेट घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा सुदृढ करण्याचे आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची सक्तीची पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त : पर्वती येथे घडलेल्या लहान मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर महापौरांनी आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सांगितलं की, शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णतः कार्यक्षम असणं अत्यावश्यक आहे. सध्या अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्याचं आढळून आले आहे. त्यांची तत्काळ दुरुस्ती आणि पुनर्स्थापना करण्याची गरज आहे. तसेच, शहरातील सोसायट्या, व्यावसायिक आस्थापना आणि सार्वजनिक ठिकाणी कार्यरत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची योग्य ती पोलीस पडताळणी आणि पार्श्वभूमी तपासणी सक्तीनं करण्यात यावी. कोणतीही व्यक्ती योग्य पडताळणीशिवाय सुरक्षा कर्मचारी म्हणून कार्यरत राहू नये, यासाठी कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात यावेत, असंही महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितलं.
परिसरात जनजागृती मोहीम राबवण्याची गरज : नागरिकांनीही आपल्या परिसरात सतर्क राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तींची माहिती, नवीन भाडेकरूंची नोंद तसेच संशयास्पद हालचालींबाबत स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क ठेवावा. त्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्याची गरज असल्याचं महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- नागपुरात सीसीटीव्ही यंत्रणा ठरतेय कुचकामी, बहुतांश कॅमेरे बंद, महिनाभर स्फोटकाचा साठा पडूनही कुणाला दिसलाच नाही
- मुंबईवर 11 हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वाॅच, 2140 कोटींच्या खर्चास राज्य सरकारची मंजुरी
- CCTV On Toll : सरकारचा दावा खोटा! मनसेच्या CCTV द्वारे टोलवरून ये-जा करणाऱ्या वाहनांची खरी संख्या उघड

