सोलापूर येथे दीडशे वर्षांच्या शेकडो झाडांची कत्तल; दोन जणांवर गुन्हा दाखल
सोलापूर येथील सलगर वस्ती येथे शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. झाडांच्या अवैध कत्तल प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published : May 29, 2026 at 8:20 PM IST
सोलापूर : सोलापूर शहर परिसरातील सलगर वस्ती येथे शेकडो झाडांची कत्तल करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जवळपास 50 ते 100 वर्षे जुनी अनेक झाडं तोडण्यात आल्यानं पर्यावरणाचं मोठं नुकसान झाल्याची प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमी मनोज देवकर यांनी दिलीय.
या घटनेची माहिती मिळताच उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, मनोज देवकर तसंच इतर पर्यावरणप्रेमींनी सलगर वस्ती परिसरात धाव घेतली. झाडांची कत्तल करून लाकूड वाहून नेणारं वाहन त्यांनी अडवून संबंधित प्रकाराचा निषेध नोंदवला. परिसरातील नागरिकांनीही या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.
118 झाडांची कत्तल : महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी या प्रकरणाची अधिकृत माहिती देताना सांगितलं की, झाडांच्या अवैध कत्तल प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
शहरातील वाढत्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याची चिंता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली असून, प्रशासनानं अशा घटनांवर तातडीनं नियंत्रण आणण्याची मागणी करण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका बिल्डरकडून ही वृक्षतोड करण्यात आल्याचं बोललं जात आहे. मात्र संबंधित बिल्डरचं नाव अद्याप समोर आलेलं नाही.
'दंडात्मक कारवाईही करण्यात येणार' : या प्रकरणी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक चालक सैफन मुजावर आणि ठेकेदार मोहन राठोड अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावं आहेत. प्राथमिक टप्प्यात या दोघांविरोधात कारवाई करण्यात आली असून तपासानंतर आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, सलगर वस्ती परिसरात वृक्षतोड झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मनपाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी एक ट्रकचालक तोडलेली झाडं घेऊन जाताना आढळून आला. त्यानंतर ट्रक चालक आणि संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय अधिक तपास करून संबंधित जागा मालकाला नोटीस बजावण्यात येणार असून दंडात्मक कारवाईही करण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा

