मराठी माणसांनी गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय करावा; गुजराती लोकांनी मुंबईत यावं हा सिद्धांत नाही; पालकमंत्री गणेश नाईक यांचा सल्ला
महाराष्ट्रीयन मराठी माणसाने संधीचा फायदा घ्यावा, त्यासाठी राज्य मदतीचा हात देईल, अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिलीय.

Published : February 20, 2026 at 12:05 PM IST
पालघर : मराठी माणूस कुठेही कमी नाही. त्याला प्रोत्साहन दिले तर तो काहीही करू शकतो. ‘बुलेट ट्रेन’मुळे जशी गुजरातच्या लोकांना महाराष्ट्रात येऊन व्यवसाय करण्याची संधी आहे, तशीच संधी महाराष्ट्रीयन लोकांनाही गुजरातमध्ये जाऊन व्यापार, उदीम करण्याची आहे. महाराष्ट्रीयन मराठी माणसाने या संधीचा फायदा घ्यावा, त्यासाठी राज्य मदतीचा हात देईल, अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिलीय.
महिला बचत गटांच्या 100हून अधिक स्वतंत्र प्रदर्शनांचा समावेश : पालघर जिल्ह्यातील शिरगाव समुद्रकिनाऱ्यावर आयोजित ‘ग्लोबल कोकण महोत्सव’ आणि ‘कोकण सरस’ प्रदर्शनाचे उद्घाटन नाईक यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. ‘कोकण सरस’ आणि ‘ग्लोबल कोकण’ महोत्सवात चारशेहून अधिक स्थानिक उद्योजकांचे स्टॉल्स लागलेत. त्यात महिला बचत गटांच्या 100हून अधिक स्वतंत्र प्रदर्शनांचा समावेश आहे. कोकणातील खाद्य संस्कृती, फूड फेस्टिव्हल, मराठी चित्रपट महोत्सव, ‘राजा रयते’चा हे 100 कलावंतांचे भव्य महानाट्य अशी या महोत्सवाची विविध आकर्षणे आहेत.
मुंबईहून प्रवासी बोटी पालघर-गुजरातपर्यंत : या महोत्सवामुळे ग्रामीण भागातील उद्योगांना मोठी बाजारपेठ मिळेल, असा विश्वास व्यक्त करून नाईक म्हणाले की, गुजरात आणि महाराष्ट्रातील दळणवळण ‘बुलेट ट्रेन’ मुळे वाढणार आहे. ते अधिक गतिमान होईल. ‘बुलेट ट्रेन’चा फायदा जसा गुजराती लोकांना होणार आहे, तसाच तो महाराष्ट्रातील लोकांना होणार आहे. महाराष्ट्रातील लोकांनी आता मानसिकतेत थोडा बदल करून गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय सुरू केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
सागरी पर्यटन आणि सागरी प्रवासाला महत्त्व : कोकणातील पर्यटन निसर्ग संपदा लोककला आणि ग्रामीण उद्योगांना जागतिक व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’ आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे कौतुक करून नाईक म्हणाले की, सागरी पर्यटन आणि सागरी प्रवासाला आता महत्त्व दिले जात आहेत. आता मुंबईपासून निघणाऱ्या प्रवासी बोटी थेट पालघर जिल्ह्यातील विविध बंदरांवर पोहोचतील आणि या बंदरांचा विकास होईल. त्याचबरोबर मुंबईपासूनच्या बोटी केवळ पालघर जिल्ह्यातील बंदरावर थांबणार नाहीत, तर त्या गुजरातपर्यंतही जाऊ शकतील.
हवा तेवढा निधी देऊ : ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’ आणि जिल्हा प्रशासनाला वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी राज्य सरकार हवा तेवढा निधी देईल आणि निधी कमी पडलाच, तर सामाजिक दायित्व निधीतून त्यासाठी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. या महोत्सव दररोज दोनशे स्थानिक कलाकार विविध लोककला सादर करत आहेत. त्यात तारपा नृत्य, दशावतार झाकडी नृत्य, कोळी नृत्य यासारख्या पारंपरिक कलांचा समावेश आहे. या महोत्सवामुळे कोकणच्या सांस्कृतिक वर्षाला चालना मिळाली आहे.
शिरगाव समुद्र किनाऱ्याला आदर्श समुद्रकिनारा करणार : दरम्यान, शिरगाव समुद्रकिनाऱ्याला आदर्श समुद्रकिनारा म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी ही पालकमंत्र्यांनी निधी देण्याची ग्वाही दिली असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. पर्यटन वृद्धीमुळे या भागातील स्थानिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आलाय. 22 तारखेपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे.

