ETV Bharat / state

अवघी शाहूनगरीत साहित्यमय, उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९९ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन

साताऱ्यात ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला गुरूवारी औपचारिक प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संमेलनाचं उद्घाटन होणार आहे.

स्वागताध्यक्ष शिवेंद्र राजे यांनी ग्रंथ दिंडी घेतली खांद्यावर
स्वागताध्यक्ष शिवेंद्र राजे यांनी ग्रंथ दिंडी घेतली खांद्यावर (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 1, 2026 at 10:16 PM IST

|

Updated : January 1, 2026 at 10:29 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

सातारा : साताऱ्यातील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा गुरूवारी दिमाखात प्रारंभ झाला. दुपारी राजपथावरून ग्रंथदिंडी काढण्यात आली. त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवरील चित्ररथ सहभागी झाले होते. संमेलनाच्या निमित्तानं अवघी शाहूनगरी साहित्यमय झाली आहे. शुक्रवारी सकाळी ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत मृदुला गर्ग यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचं उद्घाटन होणार आहे.


अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून संमेलनाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष, 'पानिपत'कार विश्वास पाटील, मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष तथा मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मराठी साहित्य संमेलनाच्या सुरुवातीची शोभायात्रा (ETV Bharat Reporter)


साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीचं उ‌द्घाटन ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते झालं. त्यानंतर राजवाड्यापासून ग्रंथदिंडीला सुरूवात झाली. ग्रंथदिंडीत संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाह सुनीताराजे पवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह साहित्यिक सहभागी झाले होते.

स्वागताध्यक्ष शिवेंद्र राजे यांनी ग्रंथ दिंडी घेतली खांद्यावर
स्वागताध्यक्ष शिवेंद्र राजे यांनी ग्रंथ दिंडी घेतली खांद्यावर (ETV Bharat Reporter)


स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले, प्रा. मिलिंद जोशी यांनी ग्रंथदिंडीतील पालखी स्वतःच्या खांद्यावर घेतली. ग्रंथदिंडीत साताऱ्यातील ९५ शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सातारा जिल्ह्यातील पर्यटन, संत साहित्य, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांची शैक्षणिक चळवळ तसंच संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाईच्या संत परंपरेवर शाळांनी तयार केलेल्या आकर्षक चित्ररथांनी साहित्यिकांचं लक्ष वेधलं. ग्रंथदिंडीची सांगता झाल्यानंतर डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचं उ‌द्घाटन झालं. पुस्तकांनी सजलेल्या ग्रंथनगरीत वाचकांसाठी आता ज्ञानाचा खजिना खुला झाला आहे.

साहित्य संमेलनातील चित्ररथ
साहित्य संमेलनातील चित्ररथ (ETV Bharat Reporter)



साहित्यिकांच्या पाहुणचारासाठी सातारकर सज्ज असल्याचं संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी सांगितलं. दिग्गज साहित्यिकांच्या स्वागतासाठी सातारकर आतुर आहेत. हे संमेलन साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारं ठरेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले की, सातारकरांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या साहित्य आणि रसिकांचा उत्साह पाहून आम्हाला देखील प्रेरणा मिळाली. या संमेलनात लोक मोठ्या संख्येनं सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा...

  1. रयत शिक्षण संस्थेचा अजब ठराव, साहित्य संमेलनाला गर्दी जमवण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक वेठीस?
Last Updated : January 1, 2026 at 10:29 PM IST