ETV Bharat / state

अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीचे धडे; 15 ऑगस्टनंतर मुदतवाढ नाही!

मराठी भाषा शिकण्यासाठी 15 ऑगस्ट 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलं.

Marathi Lessons for Non-Marathi Rickshaw and Taxi Drivers, No Extension After August 15
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीचे धडे; 15 ऑगस्टनंतर मुदतवाढ नाही! (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 25, 2026 at 8:20 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यवहारिक मराठी बोलता, समजता आणि दैनंदिन व्यवहारात वापरता यावी, यासाठी परिवहन विभागाकडून व्यापक मराठी शिक्षण अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात रिक्षा-टॅक्सी संघटनांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. तसंच मराठी भाषा शिकण्यासाठी 15 ऑगस्ट 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सोमवारी (दि.25) याबाबत मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत विविध रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींशी या उपक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, वरिष्ठ अधिकारी आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

दररोज 4 तासांचे ऑफलाईन प्रशिक्षण : सरनाईक म्हणाले, "चालकांना व्यवहारिक मराठी आत्मसात करता यावी यासाठी दररोज 4 तासांचे ऑफलाइन प्रशिक्षण दिलं जाणार आहे. मराठी संभाषण कौशल्य विकसित करण्यावर विशेष भर देण्यात येणार असून ऑनलाइन प्रशिक्षणाची सुविधाही उपलब्ध असणार आहे. प्रशिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी विविध शाखा कार्यालयांमध्ये विशेष वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, पालघर आणि डहाणू या भागांत प्रारंभी प्रशिक्षण वर्ग सुरू केले जाणार आहेत. तसंच कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातूनही मराठी शिकवली जाणार आहे."


4500 शिक्षकांची नियुक्ती करणार : या उपक्रमासाठी सुमारे 4500 शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यांना मानधन दिले जाणार आहे. शासनाकडून आवश्यक निधीची तरतूद करण्यात आल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर चालकांची मौखिक परीक्षा घेण्यात येणार असून यशस्वी उमेदवारांना शासनाकडून प्रमाणपत्र दिलं जाईल. तसंच हिंदी ते मराठी भाषांतर आणि सोपे मराठी संभाषण शिकण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ऑनलाइन ॲपची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून चालकांना मराठी शब्द, वाक्यरचना आणि दैनंदिन संवाद सहज शिकता येणार असल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, या उपक्रमामुळं प्रवासी आणि चालक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होईल. तसंच मराठी भाषेचा वापर आणि प्रसार वाढण्यास मदत होईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

  1. रेल्वेनं मुंबईच्या दिशेनं प्रवास करताय? तर ही बातमी आहे अतिशय महत्त्वाची
  2. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत ‘घोडेबाजार’चा आरोप; विजय वडेट्टीवारांचा भाजपावर आरोप
  3. वन्यजीवांच्या मृत्यू मागचं काय आहे विदारक वास्तव? विषबाधेसह व्यवस्थेतील उणिवासह शिकारीचे चिन्हे