ETV Bharat / state

नवी मुंबईतील 'मराठी भाषा भवन'ला शासनाची केराची टोपली; पाच वर्षात एकही वीट रचली नाही

नवी मुंबईतील मराठी भाषा भवन उपकेंद्राला शासनानं चक्क केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप मनसेनं केलाय.

marathi bhasha bhavan navi mumbai
मराठी भाषा भवन उपकेंद्र भूखंड, नवी मुंबई (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 27, 2026 at 10:21 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नवी मुंबई - नवी मुंबई ऐरोली येथील मराठी भाषा भवन उपकेंद्राला शासनानं चक्क केराची टोपली दाखवली आहे. पाच वर्षात भूखंडावर एकही वीट रचली नाही. त्यामुळं भूखंड 'जैसे थे' असून शासनाचे याकडं दुर्लक्ष होत आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं तरी सरकारला जाग येणार का? असा सवाल मनसेनं विचारला आहे. लवकरच प्रतिकात्मक भूमिपूजन करणार असल्याचा इशारा मनसेच्या माध्यमातून देण्यात आला.

काय आहे प्रकरण? - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी नवी मुंबई ऐरोली येथील मराठी भाषा भवनच्या उपकेंद्रासाठी राखीव भूखंडाला भेट दिली. "२०२१ मध्ये हा ३ हजार स्क्वेअर मीटरचा भूखंड सिडकोच्या माध्यमातून राज्य सरकारला देण्यात आला होता. या भूखंडावर मराठी भाषा भवनचं उपकेंद्र बांधण्यात येणार होतं. मात्र, पाच वर्ष उलटूनही मराठी भाषा भवन उपकेंद्राची साधी वीट देखील रचली गेली नाही. मराठी भाषा आणि संस्कृतीचा विकास, संवर्धन आणि जतन व्हावं म्हणून हे उपकेंद्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे बांधण्यात येणार होतं. या उपकेंद्राच्या इमारतीमध्ये मराठी भाषा संचालनालय, विश्वकोश महामंडळ इत्यादी कार्यालये सुरू होणार होती. सोबतच सभागृह, बालविभाग, ज्येष्ठ नागरिकांसाठी दालन सुरू करण्याचा सरकारचा मानस होता. मात्र, हे सगळं अजूनही कागदावरच आहे," अशी खंत मनसेनं व्यक्त केली.

भूमिपूजनासाठी सरकारला वेळ नाही - "मराठीचा जयघोष करायचा. मात्र, मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी काहीही करायचं नाही, असं या राज्य सरकारचं धोरण आहे," अशी टीका मनसेचे राज्य. प्रवक्ते गजानन काळे यांनी केली. २६ कोटींचं बजेट मंजूर होऊनही अजून राज्य सरकारला भूमिपूजनासाठी वेळ नाही ही बाब अत्यंत दुःखद असल्याचंही त्यांनी म्हटलं. नोव्हेंबर २०२२ ला येऊन मंत्री उदय सामंत यांनी मराठी भाषा विभागाचं आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर या भूखंडाला भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी पुढच्या ८ दिवसात मुख्यमंत्री आणि मराठी साहित्यिकांना घेऊन या मराठी भाषा भवनच्या उपकेंद्राचं भूमिपूजन होईल, असा जाहीर शब्द माध्यमांसमोर जनतेला दिला होता. मात्र, त्यानंतर ४ वर्षे लोटली तरी परिस्थिती 'जैसे थे'च आहे, असं मनसेनं म्हटलं आहे.

...अन्यथा लवकरच भूखंडावर मनसे प्रतिकात्मक भूमिपूजन करणार - मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं तरी राज्य सरकारला जाग येईल आणि अधिवेशन संपण्याअगोदर या उपकेंद्राचं उद्घाटन करावं, अशी मागणी मनसेनं केली आहे. विधिमंडळातील आमदारांनीही याबाबत अधिवेशनात सरकारला प्रश्न विचारावे, असंही मनसेनं मत मांडलं आहे. हे नाही झालं तर लवकरच या भूखंडावर मनसे प्रतिकात्मक भूमिपूजन सोहळा करेल, असा इशारा मनसेनं दिला.

हेही वाचा -

  1. मराठी भाषा गौरव दिन विशेष : राज्यातील मराठी शाळांचं अस्तित्व धोक्यात, बिहार भवन मुंबईत, तर मराठी भवन कुठंय?
  2. मराठी माणसांनी गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय करावा; गुजराती लोकांनी मुंबईत यावं हा सिद्धांत नाही; पालकमंत्री गणेश नाईक यांचा सल्ला