'माझ्या विरोधात घातपाताचा कट, चुकीच्या ठिकाणी हात टाकला': धमकीनंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना धमकी आल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी मनोज जरांगे यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

Published : November 6, 2025 at 8:42 PM IST
|Updated : November 6, 2025 at 8:52 PM IST
जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना धमकी आल्यानं मोठी खळबळ उडाली. धमकीनंतर मनोज जरांगे यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्या विरोधात घातपाताचा कट रचण्यात आला आहे. मात्र तू नेता असला तरी चुकीच्या ठिकाणी हात टाकला आहे. वेळ आली, तर मी समाजासाठी रक्त सांडायला तयार आहे. आता धमकी आली आहे, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रकरणी गंभीर दखल घेतील. खोलात जाऊन चौकशी करतील, देवेंद्र फडणवीस कसल्याही प्रकरणात आदेश देतात, त्यामुळे या प्रकरणाची ते गांभीर्यानं दखल घेतील," असं यावेळी मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.
माझ्या विरोधात घातपाताचा कट : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना ठार मारण्याची धमकी आल्यानंतर त्यांनी आंतरवली सराटीत प्रसार माध्यमांबरोबर संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "माझ्या विरोधात घातपाताचा कट रचला गेलाय. मात्र तू नेता असला तरी चुकीच्या ठिकाणी हात टाकला. वेळ आली तर समाजासाठी रक्त सांडायला मी तयार आहे. समाजानं शांत राहावं, तो तपासाचा भाग असून जालन्याचे पोलीस अधीक्षक स्वत: लक्ष ठेवून आहेत. उद्या याप्रकरणी नेत्यांसह पत्रकार परिषद घेऊन उघड करणार आहे. पुराव्यासह उद्या धमकी देणाराचा खुलासा करणार आहे. यात कितीही मोठा नेता असला, तरी पोलीस आरोपीची गय करणार नाहीत, याची खात्री आहे. धमकी देणारा आणि त्यामागचा कोण आहे, याची उद्या भूमिका स्पष्ट करणार," असं यावेळी त्यांनी सांगितलं.
जुन्याच सहकार्याने धमकी दिल्याची माहिती ? : मनोज जरांगे यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनोज जरांगे यांच्या जुन्याच सहकार्यानं धमकी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बदनाम होत नसल्यामुळं घातपातावर हे आले आहेत, असं मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितलं. आमचे याआधीही कार्यकर्ते फोडले, विरोधात बोलायला लावले, राजकीय नेत्यानं गोळा केलेले हे सगळे जेलमध्ये सडणार आहेत. चार पैशांसाठी आयुष्य उद्धवस्त करू नका, माझ्या वाट्याला येवू नका, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. देवेंद्र फडणवीसांनी यामध्ये बारकाईनं लक्ष घालणं गरजेचं आहे.
हेही वाचा :

