मराठा आरक्षण आंदोलन : अंतरवालीत मराठा आंदोलकाचा मृत्यू: रात्री आंदोलनानंतर झोपले, सकाळी उठलेच नाही
बीड जिल्ह्यातील आंदोलकाचा अंतरवाली सराटीत मृत्यू झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं या आंदोलकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.

Published : September 3, 2026 at 9:58 AM IST
|Updated : September 3, 2026 at 11:50 AM IST
जालना : अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकाचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. दशरथ शिवाजी रायकर ( वय 40 ) असं या मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव आहे. ते संगम तालुका धारूर जिल्हा बीड इथले राहणारे होते. त्यांना आज पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय अंबड इथं पाठवण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शेतशिवारात झोपले मात्र सकाळी उठलेच नाही : अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संगमचे रहिवासी दशरथ रायकर हे त्यांच्या गावातील काही मराठा आंदोलकांसोबत आले होते. त्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला. रात्री ते अंतरवाली सराटी इथं एका शेतशिवारात झोपले, मात्र सकाळी ते उठलेच नाहीत. यावेळी त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांनी सदरची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली असता, त्यांना अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. या घटनेमुळे संपूर्ण आंदोलकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दशरथ रायकर यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मृतदेहावर अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आलं असून पुढील तपास पोलीस करत आहेत. मात्र दशरथ रायकर यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण रायकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पाश्चात एक मुलगी एक मुलगा असा परिवार आहे. दशरथ रायकर हे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपलं जीवन जगत होते. त्यामुळे या परिवाराला सरकारनं तत्काळ आर्थिक मदत द्यावी. त्यांच्या मुलांना शासकीय नोकरीत समावेश करून घ्यावा, अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.
जालना जिल्हा बंद मागं, रस्ता रोको स्थगित : आज मराठा आरक्षण आंदोलकांकडून जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. मात्र शासनाच्या वतीनं प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटीत भेट देत मनोज जरांगे यांच्याशी बोलणी केली. आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांच्या हस्ते पाणी पिलं. त्यामुळे आज करण्यात येणारं जालना जिल्हा बंद आंदोलन मागं घेण्यात येत आहे. मागण्यांचा जीआर दोन दिवसात निघला नाही, तर पुन्हा आंदोलनाची हाक देण्यात येणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे यांचे समर्थक विश्वंभर तिरुखे यांनी दिली.
आंदोलनाकडं दुर्लक्ष केल्यानं दिली होती हाक : सरकारनं 5 दिवस मनोज जरांगे यांच्या आंदोलनाकडं दुर्लक्ष केल्यानं आंदोलनाची हाक दिली होती. मात्र काल भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना मागण्याचा मसुदा वाचून दाखवला. त्यानंतर प्रसाद लाड यांच्या विनंतीला मान देऊन जरांगे पाटलांनी पाणी त्याचबरोबर सलाईन घेतल्यामुळे आजचा रास्ता रोको आणि जालना जिल्हा बंदची हाक मागे घेण्यात आली आहे, अशी माहिती मनोज जरांगे यांचे समर्थक विश्वंभर तिरुखे यांनी दिली.
हेही वाचा :

