जरांगे पाटलांचा फोन अन् थेट इशारा; पण खासदार बंडू जाधव आपल्या निर्णयावर ठाम; जालन्यात नेमकं काय घडतंय?
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणारा परभणीतील शेतकरी मेळावा रद्द करण्याचा इशारा शिवसेना खासदार बंडू जाधव यांना दिला.

Published : August 30, 2026 at 2:19 PM IST
जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शिवसेना खासदार संजय (बंडू) जाधव यांनी आयोजित केलेल्या परभणीतील शेतकरी मेळाव्याला विरोध केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. मात्र ''मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं होत असताना हा मेळावा कशासाठी?'', असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. त्यानंतर जरांगेंनी बंडू जाधव यांना फोन केला. ''हा मेळावा रद्द करावा अन्यथा मी तिथं येईन असा इशारा दिला.' आता यावर बंडू जाधवांनी उत्तर दिलंय.
काय म्हणाले होते जरांगे पाटील ? : परभणीत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा होत असून हा कार्यक्रम रद्द करण्यासाठी जरांगे पाटलांनी अल्टीमेटम दिला. यानंतरही बंडू जाधवांनी कार्यक्रम शेवटच्या क्षणी रद्द करणार नसल्याचं जाहीर केलं. यानंतर जरांगेंनी एकेरी भाषेत बोलत बंडू जाधव यांच्यावर तोफ डागली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ''तुला सांगितलं होतं कार्यक्रम रद्द कर, तू केला नाहीस. ही तुझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक आहे. मराठा समाज संभाळून ठेवणं हे तुझं अस्तित्व होतं. आता तुझ्या राजकारणाला अवकळा लागलीय, हे तू लक्षात ठेव. बंडू जाधव हा सगळ्यात थर्ड क्लास माणूस निघाला. 500 जण तुझ्याजवळ गुंड असतील, त्याच्यावर राजकारण चालत नसतं हे ध्यानात ठेव, पण आता तुझ्यामुळं, शिरसाटमुळं, एकनाथ शिंदे आणखी खोलात गेले आहेत. शिरसाटाचं ऐकून, शेतकऱ्याच्या कार्यक्रमाच्या नावाखाली शिंदेना 100 टक्के नाचवलंस आता याची परतफेड होईल.''
काय म्हणाले बंडू जाधव ? : मनोज जरांगे आक्रमक झाल्यानंतर बंडू जाधवांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ''कार्यक्रम रद्द होणार नाही. आता नियोजित कार्यक्रम, सगळं ठरलेलं आहे, सर्व लोक आले आहेत, कार्यक्रम अचानक रद्द करा असं होणार नाही. तुमच्या भावनांचा मी आदर करतो आणि तुम्हाला आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे.''
12 सप्टेंबरला तारीख जाहीर : जरांगे पाटील यांनी एकदा राज्य सरकारला आक्रमक इशारा दिलाय. “हे शेवटचं आंदोलन आहे. यामध्ये एकाही मागणीत माघार घेतली जाणार नाही,” असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. तसंच 12 सप्टेंबरला मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
मुंबई आंदोलनासाठी महाराष्ट्रातील मराठा बांधवांना बोलावून नियोजन केलं जाणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं. मुंबईत आंदोलन पाच टप्प्यात करण्याचं नियोजन असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. “तीन दिवसांत मराठ्यांना मुंबईला नेऊन परत आणणं आपल्याला परवडणार नाही. त्यामुळे यावेळी पक्की तयारी करायची,” असं आवाहन त्यांनी समाजबांधवांना केलं.
हेही वाचा...

