माझ्या घातपाताचा कट धनंजय मुंडेंनी रचला; मनोज जरांगेंचा आरोप: तर नार्को टेस्ट करा, धनंजय मुंडेंचा पलटवार
मनोज जरांगे पाटील यांनी आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सनसनाटी आरोप केला. धनंजय मुंडे यांनी माझ्या घातपाताचा कट रचला आहे, असा आरोप त्यांनी केला.

Published : November 7, 2025 at 9:51 PM IST
जालना / बीड : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्यावर सनसनाटी आरोप केला. धनंजय मुंडे यांनी माझ्या घातपाताचा कट रचला आहे, त्यांनी अडीच कोटी रुपयात मला मारण्याची सुपारी दिली, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. दुसरीकडं माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. मनोज जरांगे यांची आणि माझी नार्को आणि ब्रेन मॅपींग टेस्ट करा, त्यानंतर दूध का दूध आणि पानी का पानी होईल. उलट मनोज जरांगे यांनाच मी पृथ्वीतलावर नको आहे, असा पलटवार धनंजय मुंडे यांनी यावेळी केला.
धनंजय मुंडेच घातपाताचा कट रचणारे मुख्य सूत्रधार : माझ्या घातपाताचा कट रचणारा मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे हे आहेत. त्यांना चौकशीला बोलवा, असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला. मनोज जरांगे यांना मारण्याच्या धमकीनंतर दोघांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंचं नाव घेऊन मोठी खळबळ उडवून दिली. "माझा घातपात करण्यासाठी तीन टप्प्यात अडीच कोटी रुपयांची खंडणी घेतली गेली. पहिल्या टप्प्यात खोट्या रेकॉर्डिंग, व्हिडिओ बनवायचा होता. पण ते झालं नाही. दुसरा मुद्दा डायरेक्ट खून करायचा आणि तिसरा म्हणजे मला गोळ्या किंवा औषध देऊन घातपात करायचा होता. धनंजय मुंडेंचा पीए आधी यांना घेऊन परळीला गेला. तिथेच धनंजय मुंडे यांच्यासोबत बैठक झाली, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. अनेकदा हे आरोपी धनंजय मुंडे यांना भेटले आहेत. माझ्याकडं सर्व पुरावे असून ते मी पोलिसांना दिले आहेत. त्यामुळं माझा घातपात करणारा हा मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे आहे. त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करावी," अशी मागणीही मनोज जरांगे यांनी यावेळी केली.
मनोज जरांगे यांच्यावर धनंजय मुंडेंचा पलटवार : मनोज जरांगे यांनी आंतरवली इथं पत्रकार परिषद घेऊन माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर धनंजय मुंडे यांनीही मनोज जरांगे यांच्यावर जोरदार पलटवार केला. "गेल्या 30 वर्षात सामाजिक वारसा मुंडे साहेब आणि पंडित आण्णांचा संस्काराचा वारसा आहे. मी कधीही जात पाहून काम केलं नाही. माझ्या जातीपेक्षा जास्त इतर मित्र आहेत. पहिल्यांदा मी जिल्हा परिषदमध्ये मराठा आरक्षणाचा ठराव घेतला. मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनात मी सहभागी आहे. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर परळीमध्ये आंदोलन झालं, त्या आंदोलनाला जागा देण्यापासून पाणी देण्यातपर्यंत सगळी कामं केली. अण्णासाहेब जावळे, विनायक मेटे, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणाच्या लढाईत मी उतरलो आहे. जगात 58 मराठा समाजाचे आदर्श मोर्चे निघाले. मुंबईच्या मोर्चामध्ये मी सहभागी झालो आणि मला बोलण्याची संधीही मिळाली. पाच वर्ष मी राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. नरड्यातून रक्त पडेपर्यंत मराठा आरक्षणासाठी आवाज उठवला. सभागृह बंद पाडलं. कोपर्डी बलात्कार प्रकरणात त्या ठिकाणी पहिल्यांदा मी स्वतः गेलो. दुसऱ्या दिवसापासून अधिवेशन चालू होतं, सर्व आरोपी अटक होईपर्यंत मी अधिवेशनही चालू दिलं नाही. ही मराठा समाजाप्रती आमची प्रमाणिक निष्ठा आहे. मी पालकमंत्री असताना 80 हजार बीड जिल्ह्यातून कुणबी प्रमाण पत्र मिळालेली आहेत. मंत्री म्हणून आपण उपोषण सोडायला पाठवलं त्यावेळेस माझ्या हातानं एकदा त्यांनी उपोषण पण सोडलं. तसं माझं आणि त्यांचं कधीही वैर नाही. जीवनामध्ये कधीही 17 तारखेची सभा सोडता एका शब्द बोललो नाही. एक आरोपही केला नाही, मात्र मनोज जरांगे यांना वाटतं की हा धनंजय मुंडे पृथ्वीतलावरच नसावा. 17 तारखेच्या सभेत त्यांना दोनच प्रश्न विचारले होते, त्याचे उत्तर अद्यापपर्यंत मिळाले नाही. माध्यमांनी हे दोन प्रश्न त्यांना विचारावेत. मराठा समाजाला खरंच ओबीसीमध्ये जाऊन फायदा आहे का? का इ डब्ल्यू एसमध्ये जाऊन फायदा आहे."
घर जळणारी पिलावळ कोणाची आहे : "मी कट रचला असा आरोप केला जात आहे. माझा त्यांचा काय बांधाला बांध आहे का? माझं आणि त्यांचं वैर काय. माझे आणि त्यांचे एवढेच वैर आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देऊ नका. रेस्ट हाऊसला प्रत्येक सोमवारी असतो, अनेक जण भेटायला येतात. त्यांच्यापैकी कोणी मला भेटला असेल. भेटला आणि बाजूला घेऊन बोलत असा कुठला कट रचला. अटक झालेले आरोपी, कबुली जवाब देणारे कार्यकर्ते त्यांचे. माझी इमेज मर्डरर म्हणून तयार केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयनं केली पाहिजे. माझी ब्रेन मॅपिंग करा, त्यांच्यासोबत मनोज जरांगेचीही करा आणि पकडलेल्या आरोपीचीही करा. नार्को टेस्ट करा, मी स्वतः वकील लावून सगळ्यांची कोर्टाकडून परवानगी घेऊन या टेस्ट करतो." असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.
हेही वाचा...

