महिला सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर; अमरावतीच्या मानसी भगतनं विकसित केलं महिलांसाठी ‘आव्हा’ सुरक्षा ॲप
अमरावतीच्या मानसी भगतनं (Mansi Bhagat) महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘आव्हा’ ॲप विकसित करून महिलांना आधार दिलाय.

Published : January 10, 2026 at 8:12 PM IST
अमरावती : महिलांच्या सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत मानसी भगत (Mansi Bhagat) या तरुण अभियंता विद्यार्थिनीनं उल्लेखनीय कामगिरी केलीय. मानसी ही सध्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेच्या अमरावतीच्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तिनं महिला आणि युवतींच्या संरक्षणासाठी 'आव्हा' नावाचं मोबाईल ॲप विकसित केलं आहे.
'आव्हा' हा संस्कृत शब्द : तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विशेष असं मोबाईल ॲप तयार करणाऱ्या मानसीनं या ॲपचं नाव 'आव्हा' असं ठेवलं आहे. आव्हा हा मूळ संस्कृत शब्द असून या शब्दाचा मराठीत अर्थ संरक्षणासाठी केलेलं आव्हान असा होतो. युवती आणि महिलांच्या संरक्षणासाठी समर्पक असं नाव असणाऱ्या या ॲपचं वैशिष्ट्य आणि त्याचं महत्त्व मानसी भगत हिनं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
डिजिटल प्रोटेक्शन गार्डियन : आव्हा हे ॲप महिला आणि युवतींसाठी एक डिजिटल प्रोटेक्शन गार्डियन म्हणून काम करतं. वाढत्या गुन्हेगारीच्या घटना, अत्याचार आणि असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर महिलांना तत्काळ मदत मिळावी हा या ॲपचा मुख्य उद्देश आहे. या ॲपच्या निर्मितीसाठी तिने साडेआठ ते नऊ महिने सातत्याने मेहनत घेतली. आव्हा ॲपमध्ये महिलांच्या दैनंदिन सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली अनेक आधुनिक आणि उपयुक्त फीचर्स समाविष्ट करण्यात आल्याची माहिती मानसी भगतने दिली.
तीन सेकंदात होतो संपर्क : या ॲपद्वारे वापरकर्ती महिला किंवा युवती आपलं लाईव्ह लोकेशन थेट पालकांना किंवा निवडक विश्वासू संपर्कांना शेअर करू शकते. आपत्कालीन परिस्थितीत केवळ तीन सेकंदात पालकांसह सेव केलेल्या सर्व संपर्कांना आपली माहिती, सध्याचे लोकेशन आणि मदतीचा संदेश या ॲपद्वारे पाठवता येतो. या ॲपचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वन क्लिक डायरेक्ट कॉलिंग फीचर आहे. घरच्यांशी संपर्क न झाल्यास इतर सेव केलेल्या संपर्कावर त्वरित कॉल जातो. यामुळं संकटाच्या वेळी युवती किंवा महिलेला एकटीला झुंज द्यावी लागत नाही. सायबर सेक्युरिटीच्या दृष्टीनं हे ॲप सुरक्षित आणि विश्वासार्ह असल्याचं मानसीनं सांगितलं.
ॲपची ट्रायल यशस्वी : सध्या आव्हा हे ॲप ट्रायल स्वरूपात अनेक युवती आणि महिलांना वापरण्यास देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या ॲपला उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळतो. वापरकर्त्यांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियांमुळं या ॲपचं महत्त्व अधिक ठळकपणे समोर येतं. भविष्यात हे ॲप मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचल्यास महिलांच्या सुरक्षिततेसाठी ते एक प्रभावी साधन ठरेल असा विश्वास मानसी भगतने व्यक्त केला आहे.
ॲपचं वैशिष्ट्य काय?
- वन क्लिक कॉलिंग आणि सायबर सिक्युरिटी.
- तीन सेकंदात लाईव्ह लोकेशन आणि मदतीचा संदेश पालकांपर्यंत पोहोचतो.
- महिलांमध्ये सुरक्षित असल्याची भावना या ॲपमुळं निर्माण होते.
हेही वाचा -

