मध्यरात्री जरांगे पाटील यांनी उपोषण घेतलं मागे; दोन दिवसांमध्ये जीआर काढण्याचं मंत्री विखे पाटील यांचं आश्वासन
मनोज जरांगे पाटील यांनी भर उन्हात सुरू ठेवलेलं उपोषण सरकारच्या आश्वासनानंतर मध्यरात्री मागे घेतलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळानं दोन दिवसांमध्ये जीआर काढण्याचा आश्वासन दिलं आहे.

Published : May 31, 2026 at 10:30 AM IST
|Updated : May 31, 2026 at 10:36 AM IST
जालना- मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मध्यरात्री मागे घेतलं आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं केलेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याची घोषणा केली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी रात्री उशिरा जरांगे पाटील यांची भेट घेत सुमारे एक तास चर्चा केली. सरकारने सर्व मागण्या मान्य केल्याचा दावा करत जरांगे पाटील यांनी समाजबांधवांशी संवाद साधल्यानंतर उपोषण स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला.
जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीनं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी मध्यरात्री 1 वाजून 40 मिनिटांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये सविस्तर चर्चा झाली.
यावेळी उपस्थित असलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले," मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनामुळे मराठा समाजाला न्याय मिळतो. त्यामुळे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. शासनानं त्यांनी दिलेल्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्याप्रमाणं दोन-तीन दिवसांमध्ये शासन निर्णय काढून अंमलबजावणी करणार आहोत. त्यांना सगळ्या समाजबांधवांनी संमती दिली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी सर्वांच्या हितासाठी आणि समाजबांधवांच्या हितासाठी आमरण उपोषण स्थगित करावे, अशी विनंती करत आहे". मनोज जरांगे पाटील यांना उपोषण करावे लागणार नाही, यासाठी प्रयत्न करावे, अशी उपस्थितांनी यावेळी सरकारच्या शिष्टमंडळाला विनंती केली.
सुमारे एक तास चाललेल्या चर्चेनंतर राज्य सरकारनं मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित मराठा समाज बांधवांशी संवाद साधत उपोषणाला स्थगिती देत असल्याची घोषणा केली. यावेळी आंदोलनस्थळी 'एक मराठा, लाख मराठा'च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या आहेत.
उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. सरकारनं मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी तात्काळ करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झालेल्या या सकारात्मक चर्चेमुळे मराठा आरक्षण आंदोलनातील तणाव काही प्रमाणात निवळला आहे. आता, सरकार मान्य केलेल्या मागण्यांवर किती वेगानं कार्यवाही करते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा-

