शेतकरी म्हणून आंदोलनात सहभागी; बच्चू कडूंच्या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय.

Published : October 30, 2025 at 3:23 PM IST
नागपूर : सरसकट कर्जमाफीसह शेतीमालाला हमी भाव मिळावा यासह अनेक मागण्यांसाठी दोन दिवस नागपूरला वेठीस धरल्यानंतर माजी आमदार बच्चू कडू आणि शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यसोबत मुंबईत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलीय, त्यापूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलन स्थळाला भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या आंदोलनाला आणखी धार मिळण्याची शक्यता आहे.
उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर बच्चू कडू यांनी आंदोलनाला तूर्तास ब्रेक लावला असला तरी आंदोलक अद्याप नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी आडोश्याला थांबले आहेत. मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबतच्या होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे आंदोलक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांच्या चांगल्या भविष्यासाठी - बच्चू कडू : "आंदोलनाच्या दरम्यान न्यायालयाचा आदेश आला व पावसाने देखील हजेरी लावली. मनोज जरांगेंना माहीत झाल्यावर त्यांचा मला फोन आला होता. शेतकऱ्यांसोबत राहायला पाहिजे म्हणून ते इथे आलेत. नेते सगळे एकत्र झाले आहेत. सर्वांनी आम्हाला समर्थन देण्याचे पत्र दिलं होतं. मनोज जरांगे हे मागच्या आंदोलनात देखील आले होते. जरांगे यांनी सांगितले, मी मराठा किंवा ओबीसी नाही तर शेतकरी म्हणून आृलो आहे. यामुळे आंदोलनास वेगळी दिशा मिळणार नाही. सगळे शेतकरी नेते एकत्र आले हे त्यांचे मोठेपण आहे," अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
"शेतकऱ्यांचं एक चांगलं भविष्य तयार होईल. आंदोलन करतोय हे महत्त्वाचं आहे. एखादा निर्णय सगळ्यांनाच पटेल असंही नाही. आपली प्रामाणिकता असणे आवश्यक आहे. कर्जमुक्तीचं बंधन आमच्या मनगटाला बांधलं आहे. त्यासाठी बच्चू कडू मरायला सुद्धा तयार आहे. हे आंदोलन करायला कोणाच्याच परवानगीची गरज नाही. माझा शेतकरी सर्व जातीत, समाजात आहे. एक शेतकरी म्हणून उभं राहायला पाहिजे. माझा मराठा व ओबीसी देखील शेतकरी आहेत. उद्या रेल रोको आहे ते बैठकीनंतर ठरवू," अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

