ETV Bharat / state

मराठा आरक्षण आंदोलन : मनोज जरांगे आजपासून पुन्हा मैदानात, अंतरवालीत सुरू केलं उपोषण

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी आजपासून अंतरवाली सराटी इथं पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.

Manoj Jarange Hunger Protest Start
मनोज जरांगे आजपासून पुन्हा मैदानात (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 29, 2026 at 7:35 AM IST

|

Updated : August 29, 2026 at 12:35 PM IST

4 Min Read
Choose ETV Bharat

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आजपासून अंतरवाली सराटी इथं पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार आहेत. सकाळी 10 वाजता या उपोषणाला प्रारंभ होणार असून, त्यासाठी अंतरवाली सराटीत मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव जमण्याची शक्यता आहे. उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी मनोज जरांगे गावातील ग्रामदैवताचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून उपोषणाला सुरुवात करणार आहे, अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे. दरम्यान मनोज जरांगे यांचं आजपासून आंदोलन सुरू होणार असल्यानं जालना पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी या अगोदर अनेक वेळा आंदोलनं केली आहेत. मात्र यावेळचं हे आपलं शेवटचं उपोषण आणि निर्णायक आंदोलन असणार आहे, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीवर सरकारनं ठोस आणि अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. आता सरकारला सुट्टी नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

मनोज जरांगेंना भाव देत नाही - विजय वडेट्टीवार : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे आजपासून अंतरवाली सराटीत आंदोलन सुरू करत णआहेत. मात्र त्यांच्या आंदोलनावरुन विरोधकांमधूनही टीका करण्यात येत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर टीका केली. "मी जरांगेला भाव देत नाही, जरांगेनं सरकारचे कपडे उतरवावे, सरकारनं जरांगेचे कपडे उतरवावे, आम्हाला काही देणं घेणं नाही. आमच्या वाट्याचं कुणालाही देऊ नये, तसंच ओबीसींच्या वाट्याचं घेऊ नये. तुम्ही जसं ईडब्लूएससाठी दहा टक्के आरक्षण न मागता वाढवून दिलं. म्हणजेच 50 टक्केची मर्यादा ओलांडली. आता ती मर्यादा 60 टक्केवर गेली. पुन्हा 40 टक्के वाढवा अ, ब, क, ड काढून टाका. मनोज जरांगेंच्या नादाला लागायचा, त्याचा प्रश्न आहे. मात्र, ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये, हा आमचा प्रश्न आहे," असा हल्लाबोल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार प्रसार माध्यमांशी बोलताना केला.

मनोज जरांगे एकनाथ शिंदेंचा माणूस - गुणरत्न सदावर्ते : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे आजपासून अंतरवाली सराटीत आंदोलन करणार आहेत. मात्र त्यांच्या आंदोलनापूर्वीच मोठं राजकारण रंगत आहे. या आंदोलनावरुन मनोज जरांगे यांच्यावर टीका करण्यात येत आहे. यात आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही उडी घेतली आहे. याबाबत सदावर्ते यांनी जरांगे यांचा एकेरी उल्लेख करत जरांगे कुणीतरी फीड केलेलं बरळत असल्याचा आरोप केला. "एकनाथ शिंदे यांच्यासह मोठ्या नेत्यांचा जरांगे यांना छुपा पाठिंबा आहे. आंदोलन करण्याची मुभा सर्वांना आहे, पण संविधानाच्या अधीन राहून आंदोलन करावं लागते. जी भाषा मनोज जरांगेंकडून वापरली जात आहे, महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल भाषा अर्वाच्च भाषेत बोललं जात आहे, हे अत्यंत गंभीर आहे. सर्व काही रेकॉर्ड केलं जात आहे," त्यामुळे जरांगे यांना तातडीनं अटक करण्याची मागणी सदावर्ते यांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.

पोलिसांना मुख्यालय न सोडण्याच्या सूचना : आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांनी २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान वैद्यकीय रजा वगळता सर्व सुट्ट्या रद्द केल्या आहेत. बाहेरील जिल्ह्यांतून अतिरिक्त पोलीस फोर्सही जालन्यात दाखल होत असून, अंतरवाली सराटीसह संवेदनशील ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. आंदोलनाच्या काळात पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध राहावं, यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्धारित कालावधीत मुख्यालय सोडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधितांनी बंदोबस्ताच्या कर्तव्यावर उपस्थित राहणं अपेक्षित आहे.

प्रशासनासमोर दुहेरी आव्हान : एकीकडं जरांगे यांनी मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. दुसरीकडं आंदोलनाला मोठ्या संख्येनं मराठा समाज सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंदोलन शांततेत पार पाडणं आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणं, असे दुहेरी आव्हान शासन व प्रशासनासमोर उभं ठाकलं आहे. आंदोलनासाठी मराठा समाजानं मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. तसेच एकाही मराठा तरुणानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहनही त्यांनी केलं. त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या या आंदोलनाकडं राज्याचं लक्ष लागलं असून, सरकार आणि मनोज जरांगे यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र गुणरत्न सदावर्तेंना अटक करा - गंगाधर काळकुटे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा सरकारविरोधात दंड थोपटणार आहेत. अंतरवाली सराटी इथं आज सकाळी दहा वाजल्यापासून जरांगे पाटील उपोषणाला सुरुवात करणार आहेत. मात्र, त्याआधीच मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी सरकारला थेट इशारा दिला. गुणरत्न सदावर्ते यांना तातडीनं अटक करा, अशी मागणी त्यांनी केली. इतकंच नाही, तर "मुंबईकडं कूच करण्यासाठी मनोज जरांगेंचा बी प्लॅन तयार असल्याचा दावा काळकुटे यांनी केला. मनोज जरांगेंचं आंदोलन मुंबईकरांनी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं आहे. त्यामुळे आता पुन्हा मुंबईत जाण्याची वेळ आली, तर त्यासाठी पूर्ण तयारीनिशी अंतरवेली सराटीकडं निघालो आहोत," असा थेट इशाराच त्यांनी सरकारला दिला.

काय आहेत मनोज जरांगे यांच्या मागण्या : 58 लाख मराठा नोंदींची प्रमाणपत्रं व वैधता देणं, मराठा-कुणबी नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती स्पष्ट करणं, स्वतंत्र मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करणं, सारथीच्या बंद योजना सुरू करणं, तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परताव्याची रक्कम देणं, अशा प्रमुख मागण्या त्यांनी सरकारसमोर ठेवल्या आहेत. सरकारच्या भूमिकेवर टीका करताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. केवळ आश्वासन नको, मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करा, अशी भूमिका घेत त्यांनी मागण्या मान्य न झाल्यास थेट ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन बसण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा :

  1. मराठा आरक्षण : 'आता थेट 'वर्षा' बंगल्यावरच आंदोलन' : मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा!
  2. 'शिंदे-फडणवीस पागल समजता का? तुम्हाला राजकारणातून संपवू'- मनोज जरांगेंचा आरक्षणावरून इशारा
  3. मुंबई आंदोलनाच्या तयारीत असतानाच मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, आंदोलनाची पुढील दिशा काय?
Last Updated : August 29, 2026 at 12:35 PM IST