गुमगाव गोळीबार प्रकरण : मित्राच्या मदतीला गेला अन् काका पुतण्याच्या वादात जीव गमावून बसला
काका पुतण्याच्या वादात पडणं एका तरुणाच्या चांगलच अंगलट आलं. मित्रासाठी काका पुतण्याच्या वादात पडलेल्या तरुणाला काकानं गोळीबारात ठार केलं.

Published : January 7, 2026 at 3:48 PM IST
नागपूर : काका पुतण्याचा जागेचा वाद सोडवताना मित्राच्या मदतीला जाणं एका तरुणाच्या चांगलच अंगलट आलं आहे. मित्राच्या काकानं केलेल्या गोळीबारात या तरुणाचा जीव गेला आहे. विजय शंकरराव मानावार असं काका पुतण्याच्या वादात जीव गमावलेल्या तरुणाचं नाव आहे. तो त्याचा मित्र प्रवीण चंद्रकांत देवतळे आणि त्याचा काका नाना जगन्नाथ देवतळे यांचं भांडण सोडवण्यास गेला होता. दरम्यान काका जगन्नाथ देवतळे यानं केलेल्या गोळीबारात प्रवीण चंद्रकांत देवतळे आणि विजय शंकरराव मानावार जखमी झाले. "उपचारादरम्यान विजयचा मृत्यू झालाय. त्यामुळे हिंगणा पोलिसांनी आरोपी नाना जगन्नाथ देवतळे (वय 87) आणि त्याचा मुलगा गजानन नाना देवतळे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे," अशी माहिती पोलीस निरीक्षक जितेंद्र पोकळे यांनी दिली आहे.

मित्राच्या मदतीला गेला अन् जीव गमवला : 24 डिसेंबरला या काका पुतण्याच्या दोन्ही गटात जागेवरुन भांडण झालं. यावेळी प्रवीणचा मित्र विजय मानावार देखील तिथं उभा होता. सुरुवातीला एकमेकांना लाथा- बुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर फावड्यानं एकमेकांना मारहाण सुरू झाली. तेवढ्यात काका नाना देवतळे यानं घरात ठेवलेली बंदुक आणून तीन गोळ्या फायर केल्या. बंदुकीची एक गोळी पुतण्या प्रवीणच्या पोटात लागली तर दोन गोळ्या त्याचा मित्र विजय मानावार याला लागल्या. पोटाला आणि हाताला दोन गोळ्या लागल्यानं विजयवर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मारेकरी उपचारासाठी रुग्णालयात दाखल : दोन्ही आरोपी सध्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल असल्यान् कुणालाही आद्यप अटक होऊ शकलेली नाही. ही घटना 24 डिसेंबरची असून गुमगाव इथल्या नाना देवतळे याच्या घराजवळ असलेल्या जागेच्या वाद काका रुतण्यात सुरू होता. यात काका नाना देवतळे आणि त्याचा मुलगा गजानन तर दुसरीकडं पुतणे प्रवीण चंद्रकांत देवतळे आणि नितीन चंद्रकांत देवतळे असे दोन गट आहेत.
खुनाचा गुन्हा दाखल : आरोपी नाना देवतळे त्याचा मुलगा गजानन याला सुद्धा नितीन आणि प्रवीणनं फावड्यानं मारल्यानं ते जखमी झालेत. सर्वांवर वेगवेगळ्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणात हिंगणा पोलिसांनी विजयच्या मृत्यूनंतर आरोपी नाना आणि मुलगा गजानन या दोन्ही आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, लवकरच पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक जितेंद्र पोकळे यांनी दिली.
हेही वाचा :

