आत्मसमर्पण करणाऱ्या भूपती, सतीशला नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीनं संघटनेतून केलं बडतर्फ
कुख्यात नक्षलवादी भूपती उर्फ सोनू यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलं. मात्र आता नक्षलवादी संघटनेनं कथित पत्रातून भूपतीला बडतर्फ केल्याचं स्पष्ट केलं.

Published : October 22, 2025 at 6:13 PM IST
नागपूर : अनेक दशकांचा रक्तरंजित संघर्षाचा त्याग केल्यानंतर शेकडो नक्षलवाद्यांनी पोलीस आणि सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केलं. त्यात मोठं नाव असलेला मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती आणि सतीश यांना नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीनं नक्षलवादी संघटनेतून बडतर्फ केलं आहे. त्या संदर्भातील एक पत्रक केंद्रीय समितीच्या प्रवक्त्यानं जारी केलं आहे. त्यामध्ये केलेल्या आरोपासंदर्भात नक्षल विरोधी विशेष कृती दलाचे अपर पोलीस महासंचालक संदीप पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, "केवळ स्वतःची चळवळ टिकवण्यासाठी ते पत्रक काढत आहेत. ज्यांनी आत्मसमर्पणचा पर्याय निवडला आहे, त्यांनी अनेक आदिवासींचा जीव वाचवला आहे," असं संदीप पाटील म्हणाले. शेवटी यात आदिवासींचं नुकसान सर्वाधिक होते, ते आता होणार नाही, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

भूपतीचं 61 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण : भूपती उर्फ सोनूनं 61 सहकाऱ्यांसह पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्यानंतर सतीश यानं छत्तीसगडमध्ये 200 नक्षलवाद्यांसोबत आत्मसमर्पण केलं. त्यामुळे सतीश याला सुद्धा संघटनेतून बडतर्फ करण्यात आलं असं त्या पत्रात नमूद आहे. एवढेच नाही तर भूपती, सतीशसोबत आत्मसमर्पण करणाऱ्या जवळपास 271 नक्षलवाद्यांना सुद्धा संघटनेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. यावर बोलताना नक्षल विरोधी विशेष कृती दलाचे अपर पोलीस महासंचालक संदीप पाटील म्हणाले की, "ज्यांनी अद्याप शस्त्र ठेवलेली नाहीत, त्यांनी देखील हिंसा सोडून आदिवासींचे जीव वाचवावेत. ते तरी कुठं क्रांतीच्या मार्गावर चालत आहेत. ते तर तेलंगणात सिजफायर करून बसले. त्यामुळे त्यांना काही बोलण्याचा अजिबातच अधिकार नाही. ज्यांनी आत्मसमर्पण केलं आहे, त्यांनी लोकशाहीच्या मार्गानं पुढं जाताना संविधानाचा स्वीकार केला आहे. केवळ संघटना वाचवण्यासाठी ते पत्रक काढत आहेत."
संघर्ष संपलेला नाही, नक्षलवाद्यांचा इशारा : सोनू उर्फ भूपती आणि सतीश यांनी शत्रूसोबत म्हणजेच पोलिसांशी हात मिळवणी केल्याचा आरोप, या पत्रकात करण्यात आलाय. आम्हाला तर भूपतीवर 2011 पासूनच शक होता, त्याचे पोलिसांशी संबंध होते, असा आरोपही पत्रकात करण्यात आलेला आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाविरोधातला आमचा सशस्त्र संघर्ष सुरूच राहील, असंही केंद्रीय समितीनं या पत्रकाच्या माध्यमातून जाहीर केलं आहे. यावर बोलताना संदीप पाटील यांनी नक्षलवाद्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. "ज्यांनी आत्मसमर्पण केलं नाही, त्यांच्यावर देखील चांगला परिणाम झाला आहे. त्यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण होतील," असा दावा देखील त्यांनी केलाय.
आत्मसमर्पण करणारे अवसरवादी, स्वार्थी : "आत्मसमर्पण करणारे भूपती व सतीश सारखे नक्षलवादी नेते अवसरवादी आणि स्वार्थी होते. त्यांनी नक्षलवाद्यांच्या अनेक दशकांच्या लढ्याशी गद्दारी केली. दोघांनी त्यांच्या समर्थकांसह पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आणि नक्षलवाद्यांचे महत्त्वाचे शस्त्र सुद्धा पोलिसांच्या स्वाधीन केले. दोघांना योग्य वेळी योग्य शिक्षा दिली जाईल," असा इशाराही या पत्रकात देण्यात आलेला आहे. "भूपती व सतीशला कोणत्याही स्थितीत माफ केलं जाणार नाही. मात्र, त्यांच्यासोबत आत्मसमर्पण करायला गेलेले इतर नक्षली जर भविष्यात नक्षलवाद्यांच्या संघटनेत परत येऊ इच्छित असले, तर त्यांना आम्ही परत घेऊ," असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
हेही वाचा :
- 'नक्षलमुक्त भारत' दिशा निश्चित असली तरी प्रवास अजूनही खडतर; वाचा स्पेशल रिपोर्ट
- शेकडो जणांच्या रक्तानं माखले हात : 'इतक्या' कोटीचं बक्षीस, कुख्यात नक्षलवादी भूपतीनं का केलं महाराष्ट्रात आत्मसमर्पण ?
- नक्षलवादाच्या शेवटाची सुरुवात महाराष्ट्रातून सुरू; लवकरच छत्तीसगड, तेलंगाणामधून नक्षलवादाचं . . .: भूपतीच्या आत्मसमर्पणावेळी देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

