ETV Bharat / state

अजितदादांच्या मंत्र्याला मोठा झटका, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला हायजॅक करत भाजपाने उपनगराध्यक्षपदी आणलं निवडून

वाई नगरपालिका उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठं राजकीय नाट्य घडलं. भाजपाच्या मतांवर चक्क राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला आहे.

major setback for Ajit Pawar minister
वाई नगरपरिषद निवडणूक (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 10, 2026 at 12:34 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

सातारा - वाई नगरपालिका उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शुक्रवारी मोठी नाट्यमय घटना घडली. राष्ट्रवादीचे नगरसेवक घनश्याम चक्के हे चक्क भाजपाच्या मदतीने उपनगराध्यक्षपदी निवडून आलेत. राष्ट्रवादीने अपक्ष नगरसेवक सुशील खरात यांना उपनगराध्यपदाचा शब्द दिला होता. म्हणून भाजपाने मूळचा भाजपाचा परंतु राष्ट्रवादीतून निवडून आलेल्या चक्के यांनाच हायजॅक केलं. तसेच भाजपाची मते त्यांच्या पारड्यात टाकत त्यांना निवडूनही आणले. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांची वाई शहरात जंगी मिरवणूक देखील काढली.

संपूर्ण गडच भाजपाच्या ताब्यात : वाई नगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकमेकांविरोधात लढली होती. त्यात राष्ट्रवादीने सर्वाधिक 12 जागा जिंकल्या होत्या. परंतु 10 नगरसेवक आणि नगराध्यक्ष भाजपाचा निवडून आल्याने राष्ट्र‌वादीची अवस्था 'गड आला, पण सिंह गेला', अशी झाली होती. त्यानंतर किमान उपनगराध्यक्षपद पदरात पाडून घेण्यासाठी अपक्ष निवडून आलेल्या सुशील खरात यांना राष्ट्रवादीने ऑफर दिली होती. ही खबर लागताच भाजपाने मोठी खेळी करत राष्ट्रवादीतून निवडून आलेल्या घनश्याम चक्के यांनाच ऑफर दिली. शुक्रवारी (1 जानेवारी) उपनगराध्यक्षपदाची निवडणूक असल्याने गुरुवारीच त्यांना ताब्यात घेत ट्रिपवर नेले. निवडणुकीच्या दिवशी सकाळी थेट नगरपालिकेत आणून राष्ट्रवादीतून त्यांचा अर्ज दाखल केला.

राष्ट्रवादीचे एक मतही फुटले : वाई पालिकेत भाजपा 11, राष्ट्रवादी काँग्रेस 12 आणि अपक्ष 1, असे बलाबल होते. परंतु चक्के यांना भाजपाने आपल्याकडे ओढल्यामुळे भाजपाचे बलाबल राष्ट्रवादी एवढेच म्हणजे 12 झाले. त्यामुळे समान मते होणार होती. म्हणून भाजपाने राष्ट्रवादीचे आणखी एक मत फोडले आणि 13 विरुद्ध 11 अशा फरकाने घनश्याम चक्के हे उपनगराध्यक्ष निवडून आले.

10 वर्षांनी उपनगराध्यक्षपद रविवार पेठेत : भाजपाची ही खेळी राष्ट्रवादी आणि पर्यायाने मदत, पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यासाठी धक्कादायक ठरलीय. उपनगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर घनश्याम चक्के यांची चक्क भाजपा कार्यकर्त्यांनी जंगी मिरवणूक काढली. स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेली 10 वर्षे उपनगराध्यक्ष हा वाईच्या सिद्धनाथवाडीतील होता. यंदा रविवार पेठेतीलच नगराध्यक्ष करायचा, असा चंग बांधून भाजपाने चक्के यांच्याशी संधान साधत ही खेळी केल्याचे समजते.

...तर कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाणार : उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा अथवा राष्ट्र‌वादीने व्हिप काढलेला नव्हता. तसेच मतदान गुप्त पद्धतीने झाल्यामुळे भाजपाला राष्ट्रवादीचे आणखी एक मत फोडता आले आहे. जर चक्के हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील तर त्यांना राष्ट्रवादीची मते का मिळू शकली नाहीत आणि राष्ट्रवादीकडून कायदेशीर आव्हान दिल्यास आपली भूमिका काय असणार, याबद्दल विचारले असता, घनश्याम चक्के म्हणाले की, मी राष्ट्र‌वादीचाच आहे. राष्ट्र‌वादीतूनच मी अर्ज दाखल केला होता. जर कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागले तर त्याला माझी तयारी आहे.

हेही वाचाः