माझं शहर, माझी जबाबदारी : कोल्हापुरात 27 फेब्रुवारीला दिवसभर राबवली जाणार स्वच्छता मोहीम, 2 हजार स्वयंसेवक सहभागी होणार
कोल्हापुरात 27 फेब्रुवारी रोजी मोठी स्वच्छता मोहीम पार पडणार आहे. या अंतर्गत सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत प्रमुख रस्त्यांवर स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे.

Published : February 25, 2026 at 9:26 AM IST
|Updated : February 25, 2026 at 9:33 AM IST
कोल्हापूर : 'माझं शहर, माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत 27 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर शहरात सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत प्रमुख रस्ते, फुटपाथ आणि अतिक्रमणमुक्तीवर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे. या मोहिमेत 2 हजारपेक्षा जास्त आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि विविध संघटनांचे स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. महापौर रूपाराणी निकम यांनी या उपक्रमाला चालना दिली असून, कोल्हापूर महापालिकेत आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली.
भाग एक: फुटपाथ अतिक्रमणमुक्त, प्रमुख रस्ते स्वच्छ होणार : महापालिकेच्या बैठकीत बोलताना महापौर रूपाराणी निकम म्हणाल्या, 'प्रथम टप्प्यात शहरातील सर्व प्रमुख रस्ते आणि फुटपाथ स्वच्छ करणार आहोत. वर्षानुवर्षे साठलेला कचरा आणि अतिक्रमण काढून शहराला चकाचक करू.' या मोहिमेसाठी 15 हून अधिक जेसीबी, डंपर, ट्रॅक्टर-टिपरची व्यवस्था करण्यात आली आहे. 9 मुख्य प्रवेशद्वारांपासून सुरू होणाऱ्या स्वच्छतेत रोटरी, जायंट्स क्लब आणि स्थानिक संघटनांचा सहभाग असणार आहे. चार विभागीय कार्यालयांवर जबाबदारी वाटपित केली असून, प्रत्येक प्रभागात पुढील टप्प्यात नगरसेवकांसह स्वच्छता होईल.
भाग दोन: डिव्हायडरचं सुशोभीकरण, दैनंदिन निरीक्षण : महापौर निकम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, 'डिव्हायडरवरची बोगनवेल व्यवस्था काढून सीएसआरदात्यांच्या मदतीनं सुशोभित झाडे लावणार आहोत. यानंतर अंतर्गत वस्तींमध्ये स्वच्छता करू.' त्या पुढे म्हणाल्या, 'सकाळी 11:30 ते 2 या वेळेत मी महापालिकेत प्रत्येक विभागाचं निरीक्षण करणार आहे. दर महिन्याच्या 24 तारीखेला अतिक्रमण, 25 तारखेला केएमटी, 26 तारीखेला लाइट विभाग, 27 तारीखेला स्वच्छता, 4 तारखेला (4 मार्च) पाणी आणि 5 तारीखेला जनता दरबार असं नियोजन आहे.' या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचं तत्काळ निराकरण होईल, अशी खात्री त्यांनी दिली.
नवीन स्वच्छतागृह, आर्थिक सुधारणा : कोल्हापूर शहरातील स्वच्छतागृहांची कमतरता दूर करण्यासाठी 'स्वच्छालय पाडा, बांधा आणि कमवा' योजना लवकरच सुरू होणार आहे. महापौर रूपाराणी निकम यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं, '8-10 दिवसांत 4 प्रोव्हिजनल स्वच्छतागृहांची तयारी पूर्ण झाली आहे. ज्यात महिलांसाठी एसी टॉयलेट आणि तृतीयपंथी व्यक्तींसाठी वेगळी व्यवस्था असेल.' आर्थिक बाबतीत करवाढ टाळून उत्पन्नवाढीवर भर देणार असल्याचं सांगत त्यांनी पुढे नमूद केलं, 'थकीत बिलं वसूल करून शहर प्रकाशमय करू. कर्मचारी भरतीसाठी केंद्र-राज्य सरकारकडे पाठपुरावा करू.'
या बैठकीस उपमहापौर अक्षय जरग, गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक मुरलीधर जाधव, आदिल फरास, इंद्रजीत बोंद्रे, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता रमेश मस्कर, वाहतूक शाखा पीआय नंदकुमार मोरे उपस्थित होते. निकम यांनी शाहू महाराजांच्या नगरीला अशा मोहिमांची गरज का भासते? यावर खंतदेखील व्यक्त केली. पदाधिकाऱ्यांनी या मोहिमेमुळे कोल्हापूर स्वच्छ आणि सुंदर होईल, असा विश्वास व्यक्त केला.

