ETV Bharat / state

नाशिकमध्ये महायुती तुटली; भाजपाविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवणार

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. नाशिकमध्ये महायुती फुटली असून, भाजपाविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणूक लढवणार आहेत.

Mahayuti Breaks in Nashik
नाशिकमध्ये महायुती तुटली (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : December 29, 2025 at 8:30 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नाशिक : भारतीय जनता पार्टीकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यानं नाशिकमध्ये अखेर महायुती तुटली आहे. नाशिक महानगरपालिका निवडणुकीत भाजपाविरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी निवडणूक लढवणार असल्याचं राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं.


निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होणार : नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस अगोदर महायुती तुटली असून, आता भाजपाविरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवणार आहे. सोमवारी नाशिकच्या एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक झाली, यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. मागील पंधरा दिवसापासून महायुतीबाबत भाजपाकडून चर्चेसाठी कुठलाही प्रतिसाद नं मिळाल्यानं अखेर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं यंदा नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत बघायला मिळणार आहे.

प्रतिक्रिया देताना नरहरी झिरवाळ, समीर भुजबळ,विजय करंजकर (ETV Bharat Reporter)



भाजपाकडून कुठलाही प्रतिसाद नाही : "केंद्रात आणि राज्यात महायुती एकत्रित काम करत आहे. त्यामुळं नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा एकत्रित असावे अशी आमची इच्छा होती. यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत सुरुवातीला चर्चा केली. मात्र नंतर त्यांनी आम्हाला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यानं अखेर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. जागावाटप मंगळवारी सकाळपर्यंत जाहीर करू," असं मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं.


विश्वासात घेतलं नाही : "पक्षामध्ये इतर पक्षातील लोकांना घेतलं जातं ते आमच्याही पक्षात घेतलं जात आहे. आमच्याकडं 40 माजी नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीकडं सहा-सात नगरसेवक आहेत. आम्ही तेवढ्याच जागेची मागणी भाजपाकडं केली होती. मात्र त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळं आम्ही एकत्रित निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढू," असं शिवसेनेचे नेते विजय करंजकर यांनी म्हटलं आहे.



शिवसेना, राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवणार : "भारतीय जनता पार्टीबरोबर निवडणूक लढवण्याचा आमचा निर्णय होता, मात्र तो न झाल्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही एकत्र आलो. दोन-चार दिवसापासून आमच्या वाटाघाटी सुरू होत्या. मात्र, तेथून आम्हाला कुठेही सकारात्मक प्रतिसाद न आल्यामुळं आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळं आम्ही या निर्णयाला पोहोचलो आहोत. त्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवणार आहे," असं माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ यांनी सांगितलं.


हेही वाचा -

  1. ठाण्यात शिवसेनेतील घराणेशाहीला वाढतोय विरोध, नातेवाईकांना उमेदवारी दिल्यास बसणार बंडखोरीचा फटका
  2. 'कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नाही'- रोहित पवार
  3. मुंबई महानगरपालिकेत महायुतीने रिपब्लिकन पक्षाला किमान 16 जागा सोडाव्यात - रामदास आठवले