ऐन थंडीत पावसाचं संकट; पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून इशारा
राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल पाहायला मिळत आहे. आता थंडीचा कडाका जाणवायला सुरुवात झाली असली तरी पुन्हा एकदा राज्यावर पावसाचं संकट येणार आहे.

Published : November 23, 2025 at 1:18 PM IST
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसापासून थंडीचा कडाका (Maharashtra Winter) वाढला होता. कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये थंडीची चाहूल लागल्यानं नागरिक सुखावले होते. तसेच मुंबईकरांना देखील गुलाबी थंडी अनुभवता येत होती. मात्र, शनिवारपासून पुन्हा तापमानात थोडी वाढ झाल्यानं थंडी जाणवत नाहीये. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन 'सैनार चक्रीवादळ' (Senyar Cyclone) तयार झालं असून, हवामान विभागाने पुढील 24 तासांत राज्यातील काही भागात पावसाचा इशारा दिला आहे.
सैनार चक्रीवादळ तयार : हवामान विभागानुसार, "दक्षिण अंदमानादरम्यान समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं 'सैनार चक्रीवादळ' तयार होत आहे. अंदमान आणि निकोबार तसेच तामिळनाडूदरम्यान या पट्ट्याचे हळूहळू चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळं तापमानात वाढ होऊन काही ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे. तसेच महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विशेषत: ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत ढगाळ वातावरण असून याठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे." शिवाय येणारे हे चक्रीवादळ किनाऱ्यालगत अतितीव्र आणि किनाऱ्याकडून आत येता येता सौम्य होणार असलायचा अंदाज हवामानशास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
अरबी समुद्रात चक्रीवादळ यायला सुरुवात : याबाबत बोलताना पर्यावरण अभ्यासक संजय जोशी यांनी अरबी समुद्रात काही वर्षांपूर्वी चक्रीवादळ निर्माण होत नव्हतं, असं म्हटलं होतं. पण गेल्या 10 ते 12 वर्षांपासून अरबी समुद्रात देखील चक्रीवादळ यायला सुरुवात झाली असून, हे चिंताजनक आहे, असं जोशी म्हणाले. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळं येणं हे सामान्य असलं तरी या हंगामातलं हे दुसरं चक्रीवादळ असल्याचं त्यांनी नमूद केलं. बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांची तीव्रता आणि वारंवारता वाढली असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. हे चक्रीवादळं अधिक विध्वसंक होत असल्याचं जोशी यांनी सांगितलं.
हेही वाचा -

