'पहाटेचा शपथविधी ते कधीही न लाभलेले सर्वोत्तम मुख्यमंत्री'; देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या आठवणींना दिला उजाळा
अजित पवारांच्या निधनावर शोकप्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी ते त्यांच्या जाण्यापूर्वीच्या एक दिवस आधीची भेट, अशा आठवणींना उजाळा दिला.

Published : February 23, 2026 at 2:58 PM IST
|Updated : February 23, 2026 at 3:39 PM IST
मुंबई- "अजित पवार हे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहीलेले नेते होते. कधीतरी मुख्यमंत्री होईन. पण, कायम उपमुख्यमंत्री राहीन, असं अजित पवार कायम म्हणायचे. अजितदादा हे महाराष्ट्राला न लाभलेले सर्वोत्तम मुख्यमंत्री होते", असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
राज्याच्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी परंपरेप्रमाणं शोकप्रस्ताव मांडण्यात आला. या शोकप्रस्तावात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी भाजप आमदार राज पुरोहित यांच्या निधनावर शोकप्रस्ताव मांडला गेला. विधानसभेत शोकप्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक शब्दांत श्रद्धांजली वाहिली.
हा शोकप्रस्ताव अत्यंत वेदनादायक- फडणवीस - विधानसभेची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या निधनावर शोकप्रस्तावावर बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, “आज मनात वादळ आहे. अजित पवारांचा शोकप्रस्ताव मांडावा लागेल, याची कल्पनाही करवत नाही. सभागृहात उजव्या बाजूला पाहिलं की अजितदादा दिसायचे. कितीही उशीरापर्यंत कामकाज चाललं तरी ते शेवटपर्यंत बसलेले असायचे,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या शोक प्रस्तावानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा...
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 23, 2026
(विधानसभा, मुंबई | दि. 23 फेब्रुवारी 2026)#Maharashtra #Mumbai #MahaBudget2026 pic.twitter.com/hJokRG9bh2
दशकापेक्षा अधिक काळ आमची मैत्री - मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, “राजकारणात स्थिरावलेले, नेतृत्व सिद्ध केलेले अजित पवार यांचं जाणं म्हणजे एक मोठी पोकळी निर्माण होणं आहे. आता दुसरे ‘अजितदादा’ होणं शक्य नाही.” दशकाहून अधिक काळाची मैत्री आठवत त्यांनी अजित पवारांच्या निधनाच्या एक दिवस आधी झालेल्या कॅबिनेट बैठकीची आठवण सांगितली. “बैठकीनंतर पायाभूत सुविधांवरील चर्चा झाली. त्यांच्या सिग्नेचर स्टाईलनं त्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. प्रत्येक मुद्दा कागदावर नोंदवलेला असायचा. त्यानंतर आम्ही पाऊण तास गप्पा मारल्या. पण ती शेवटची भेट ठरेल, याची पुसटशीही कल्पना नव्हती,” असे ते म्हणाले. "एक दशकापेक्षा अधिक काळ आमची मैत्री होती", असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.
लाडकी बहीण योजनेचे श्रेय अजित पवारांचे! "निवडणुकीआधी लाडकी बहीण योजना आणण्याचे ठरवले. मंत्रिमंडळात हा विषय चर्चेला आला. ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मंत्रिमंडळात चिंता व्यक्त झाली होती. लाडकी बहीण योजनेचा राज्याच्या तिजोरीवर भार पडेल, असं मंत्रिमंडळाने सांगितलं. पण, अजित पवारांनी आर्थिक नियोजन करून ती योजना त्यांनी प्रत्यक्षात आणली.” विकास प्रकल्पांबाबत त्यांची दूरदृष्टी आणि निर्णयक्षमता अधोरेखित करताना ते म्हणाले, “फाईलींचा ढीग त्यांच्या टेबलावर कधी दिसला नाही. अधिकारी थेट बोलावून घेत, योग्य ते निर्णय घेत. त्यांची पाठराखण करत.”
वर्षा बंगल्यावर ‘तो’ निर्णय मागे घ्यायचं ठरले…! 2019 मधील राजकीय घडामोडींचा संदर्भ देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, “आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. वरिष्ठांनी नंतर भूमिका बदलली, पण अजितदादांनी ‘मी शब्द दिला आहे’ असे ठामपणं सांगितलं. शपथविधीनंतर न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला. वर्षा बंगल्यावर बसून आम्ही तो निर्णय मागे घेण्याचं ठरवलं.” त्या काळातील त्यांची भूमिका आणि धैर्य फडणवीसांनी विशेषत्वाने अधोरेखित केलं. "सकाळी 9 वाजता घेतलेला शपथविधी हा पहाटेचा नव्हता", असं अजित पवार कायम सांगायचे, अशी त्यांनी आठवणही सांगितली. अजित पवारांचा वक्तशीरपणा हा त्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग होता, असे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, “मंत्रालयात अधिकारी येण्याआधी अजितदादा पोहोचायचे. मंत्रालयाची सुरुवातच त्यांच्या उपस्थितीनं व्हायची.”
कुटुंबावर मोठा आघात झाला- बारामतीचे अपराजित नेते म्हणून त्यांची ओळख अधोरेखित करताना फडणवीस यांनी सांगितलं की, महाराष्ट्र त्यांच्या कामाची कायम आठवण ठेवेल. साहित्य-संस्कृतीविषयक बांधिलकीचा दाखला देताना त्यांनी केशवसुतांच्या स्मारकासाठी निधी देण्याचा प्रसंग सांगितला. “मधुमंगेश कर्णिक निधीबाबत शंका व्यक्त करत होते. पण हे स्मारक महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आवश्यक आहे,’ असे म्हणून अजितदादांनी तातडीनं निधी मंजूर केला,” असे फडणवीस यांनी सांगितलं. अखेर कुटुंबाच्या दुःखाचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले, “अजित पवारांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. मात्र, हे दुःख बाजूला सारून त्यांच्या कार्याला पुढे नेण्याचे काम सुनेत्रा पवार करत आहेत.”
दोघांमध्ये माझी भूमिका अनेकदा रेफ्रीसारखीच राहिली…! एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस आणि काही काळानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सामिल झाले. पण सरकारमध्ये निर्णय घेताना अनेकदा फडणवीसांची अडचण व्हायची असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, त्यांचा हात मोकळा होता. मग ते नवीन योजना घोषीत करायचे. मग अजित पवार म्हणायचे, आपण मोठ्या योजना आणल्या आहेत. आता नवी योजना कशी करायची? मग एकनाथ शिंदे म्हणायचे, हे करायचं आहे. मग अजित पवारांना सांगायचो, ही योजना करावी लागेल. मग पैसे कसे द्यायचे, हा प्रश्न असायचा. पण त्याचं नियोजन अजित पवार करायचे. त्यात माझी भूमिका रेफ्रीची असायची. कुठल्याही मुख्यमंत्र्याला अर्थमंत्री कसा पाहिजे, तर तो अजित पवारांसारखा पाहीजे. जो वास्तविकचा आरसा दाखवणारा पाहिजे.”
अजित पवारांच्या अपघाताची चौकशी करा..! "अजित पवारांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र बारामतीकडे लोटत जात होता. पण अजित पवारांसारख्या नेत्याचा अपघात होणं शक्य वाटत नाही. मनात आजही संशय आहे. याची कोणतीही चौकशी करा. पण सत्य महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे", अशी मागणी शिवसेना (उबाठा) नेते भास्कर जाधव यांनी केली. ते म्हणाले, “रोहित पवार हे अजित पवार यांच्या अपघाताचा मुद्दा लावून धरत आहेत. काहीजण म्हणतायेत, शरद पवार आणि रोहीत पवार यांच्या बोलण्यामध्ये विसंगती आहे. पण अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांचा व्हिडीओ आला होता. त्यात त्यांच्या हातात एक कागद होता. त्यांनी एक ओळ वाचली, हा घातपात नसून ,अपघात आहे याला कोणताही वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असं शरद पवार म्हणाले होते. पण, तेव्हाची परिस्थिती नाजूक होती. जर ठिणगी पडली असती तर काय घडलं असतं, याची जाणीव शरद पवारांना आहे. म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलं. पण, अपघाताची चौकशी झाली पाहिजे", असं भास्कर जाधव यांनी म्हटलं.
दादांसारखा विश्वासू मित्र...माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावना व्यक्त करताना म्हटलं की, माणसं असताना त्यांचं खरं महत्त्व कळत नाही. अनेकांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात दादांसोबत झाली. तर माझी आणि दादांची कारकीर्द मात्र विरोधी विचारांच्या वाटेनं चालत होती. एक सकाळ त्यांच्या एका निर्णयामुळे धक्का देणारी ठरली होती. तर दुसरी सकाळ त्यांच्या निधनाच्या बातमीनं अंत:करण हादरवून गेली. आम्ही अनपेक्षितपणे एकत्र सरकारमध्ये आलो. मला सरकार चालवण्याचा अनुभव नव्हता. मात्र, हळूहळू लक्षात आलं की दादांसारखा विश्वासू मित्र माझ्यासोबत आहे. आज तो मित्र मी गमावला आहे. विषयांचा सखोल अभ्यास करणारा नेता विरळच असतो. मोठ्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. काहींना मात्र आयुष्यभर सावलीखालीच राहावं लागतं".
- अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवार यांच्यासोबत माजी आमदार राज पुरोहित यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.
हेही वाचा-

