टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; पुढील वर्षापासून ऑनलाइन परीक्षा
'टीईटी 2026' पेपरफुटी प्रकरणामुळे रद्द झालेली परीक्षा पुन्हा घेतली जाणार असून, ही फेरपरीक्षा उमेदवारांसाठी पूर्णपणे मोफत असेल.

Published : June 30, 2026 at 6:59 AM IST
मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पुढील वर्षापासून पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीनं घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत केली.
'टीईटी 2026' परीक्षेचा पेपर फुटल्याच्या घटनेवरून सोमवारी (29 जून) विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधकांसह सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत गदारोळ केला होता. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. यावेळी सभागृहात सरकारची भूमिका स्पष्ट करत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं की, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पुढील वर्षापासून शिक्षक पात्रता परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल.
फेरपरीक्षा पूर्णपणे मोफत : 'टीईटी 2026' पेपरफुटी प्रकरणामुळे रद्द झालेली परीक्षा पुन्हा घेतली जाणार असून, ही फेरपरीक्षा उमेदवारांसाठी पूर्णपणे मोफत असेल. यासाठी कोणतंही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारलं जाणार नसल्याची घोषणादेखील राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली.
मंत्र्यांनी सांगितलं की, फेरपरीक्षा अत्यंत पारदर्शक, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात घेतली जाईल. तसेच, पुढील वर्षापासून शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व महत्त्वाच्या परीक्षा टप्प्याटप्प्यानं ऑनलाइन प्रणालीकडे वळविण्याचा निर्णयही शासनानं घेतला आहे. यासाठी आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय पायाभूत सुविधा उभारण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचंही मंत्री भुसे यांनी सांगितलं.
'निर्णय योग्य, पण प्रभावी अंमलबजावणी करावी' : दरम्यान, 'अखिल भारतीय शिक्षक संघा'चे सरचिटणीस संजय कांबळे यांनी ऑनलाइन परीक्षा हा योग्य निर्णय असल्याचं सांगत त्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला. कांबळेंनी म्हटलं की, पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा ऑनलाईन करणं हा योग्य मार्ग असला, तरी त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. ऑनलाईन परीक्षा सुरू करण्यापूर्वी राज्यातील सर्व उमेदवारांना समान संधी मिळणं गरजेचं आहे. राज्यभर पुरेशी परीक्षा केंद्रे, सक्षम तांत्रिक सुविधा आणि ग्रामीण भागातील उमेदवारांसाठी मॉक टेस्टची व्यवस्था करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. तसेच, फेरपरीक्षा कोणतंही शुल्क न आकारता पूर्णपणे निष्पक्ष वातावरणात पार पडावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

