‘स्पेसफेस्ट’मधून महाराष्ट्राची नजर आता अंतराळ उद्योगांवर : मुंबईत उभारणार अंतराळ, विज्ञानावर आधारित 'पॉप कल्चर'
महाराष्ट्रात विज्ञान, अवकाश आणि मनोरंजनाची सांगड घालणारा ‘स्पेसफेस्ट’ आयोजित केला जाणार आहे. महाराष्ट्राला स्पेस टेक उद्योगांसाठी मोठं केंद्र बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे

Published : August 26, 2026 at 8:47 AM IST
|Updated : August 26, 2026 at 9:55 AM IST
मुंबई : रॉकेट, उपग्रह आणि अंतराळ मोहिमा आता केवळ शास्त्रज्ञांपुरत्या राहिलेल्या नाहीत. या क्षेत्रात उद्योग, स्टार्टअप आणि रोजगाराच्या मोठ्या संधी तयार होत आहेत. याच संधी महाराष्ट्रात आणण्यासाठी विज्ञान, अवकाश आणि मनोरंजनाची सांगड घालणारा ‘स्पेसफेस्ट’ आयोजित केला जाणार आहे. महाराष्ट्राला स्पेस टेक उद्योगांसाठी मोठं केंद्र बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी मंगळवारी मुंबई इथं पत्रकारांशी बोलताना दिली.

अंतराळाशी जोडलेल्या पॉप कल्चरवरील पहिला कार्यक्रम : नोडविन गेमिंग आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्यानं हा कार्यक्रम होणार आहे. अंतराळ, विज्ञान, नव्या कल्पना आणि अंतराळाशी जोडलेल्या पॉप कल्चरवर आधारित हा भारतातील पहिला कार्यक्रम असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, "कार्यक्रमाचा उद्देश केवळ मनोरंजन नसून तरुणांना स्पेस टेकच्या क्षेत्रात असलेल्या नव्या संधींची माहिती करून देणं हा आहे. आजच्या काळात अंतराळ क्षेत्रात काम करण्यासाठी फक्त शास्त्रज्ञ किंवा इंजिनिअरच लागतात असं नाही, तर उपग्रहांचे भाग तयार करण्यापासून इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर, रोबोटिक्स, एआय, डिझाइन आणि उत्पादनापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये कामाच्या संधी आहेत. विद्यार्थ्यांना आणि तरुणांना याच संधींची ओळख ‘स्पेसफेस्ट’च्या माध्यमातून करून दिली जाणार आहे," असंही उदय सामंत म्हणाले.
चंद्रयानात महाराष्ट्राचा वाटा : "चंद्रयान मोहिमेत महाराष्ट्रातील अनेक छोट्या आणि मध्यम उद्योगांनी काम केलं आहे. विशेषतः पुण्यातील काही कंपन्यांनी चंद्रयानासाठी आवश्यक असलेले भाग तयार केले होते. अशा कंपन्यांची ताकद एका ठिकाणी आणून महाराष्ट्रात स्पेस टेकची मोठी साखळी तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे," असं सामंत यांनी सांगितलं. अंतराळ म्हणजे फक्त संशोधन नाही. त्यातून उद्योग आणि रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात. विमानांचे सुटे भाग, उपग्रहांचे घटक, संरक्षण तंत्रज्ञान आणि आधुनिक उत्पादन क्षेत्राकडं उदय सामंत यांनी लक्ष वेधलं. स्पेस आणि डिफेन्स कंपन्यांना राज्यात जागेची अडचण येऊ नये, यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून औद्योगिक भूखंड आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. शिर्डी, रत्नागिरीसह काही ठिकाणी संरक्षण क्षेत्रासाठी हब आणि क्लस्टर उभारण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

२०४० पर्यंत १०० अब्ज डॉलरची बाजारपेठ : उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबळगन यांनी स्पेस टेकच्या वाढत्या बाजारपेठेचा अंदाज मांडला. भारतातील स्पेस टेक क्षेत्र सध्या सुमारे ८.५ ते ९ अब्ज डॉलरचे आहे. २०३२-३३ पर्यंत ते ४५ ते ५० अब्ज डॉलर आणि २०४० पर्यंत १०० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या वाढीत महाराष्ट्राचा वाटा वाढवण्यासाठी उद्योग, शिक्षणसंस्था, संशोधन संस्था आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणलं जात आहे, असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात केवळ रॉकेट किंवा उपग्रह बनवण्यावर लक्ष न देता त्यासाठी लागणाऱ्या वस्तू, तंत्रज्ञान आणि सेवांची संपूर्ण साखळी उभी करण्याचा प्रयत्न आहे. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये आधुनिक उत्पादन आणि प्रिसिजन इंजिनीअरिंगची क्षमता वाढवली जाणार आहे. नांदेड, नागपूर आणि मिहानमध्ये हेलिकॉप्टर आणि विमान निर्मितीच्या संधीही निर्माण होत आहेत. त्यामुळे एअरोस्पेस आणि स्पेस टेकशी संबंधित उद्योगांना राज्यात विस्तारण्याची संधी मिळू शकते.
स्टार्टअप्ससाठी २०० केंद्रं : स्पेस क्षेत्रात एखादी नवी कंपनी सुरू करणाऱ्यांसाठी ही राज्य सरकारची योजना आहे. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी सांगितलं की, "‘मॅट्रिक्स’ योजनेंतर्गत राज्यात सुमारे २०० इनक्युबेशन केंद्र उभारली जाणार आहेत. या केंद्रांमध्ये स्टार्टअप्सना कामासाठी जागा, प्रयोगशाळा, उत्पादनाची चाचणी, प्रमाणपत्रासाठी मदत, एआय आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळणार आहे. या सुविधा बाजारभावापेक्षा ७५ ते ८० टक्के कमी दरात देण्याचं नियोजन आहे. स्पेस टेकमधील स्टार्टअप्सना यामध्ये विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकमध्ये सुमारे १५ लाख चौरस फूट जागेत ही केंद्र उभारली जाणार आहेत. आयआयटी मुंबई, आयआयएम नागपूर, व्हीजेटीआय आणि सीईओपीसह पहिल्या टप्प्यातील सुमारे १२ केंद्रांचं काम सुरू झालं आहे."

तीन दिवसांच्या कार्यक्रमापेक्षा मोठी सुरुवात : अनबळगन यांच्या मते, ‘स्पेसफेस्ट’कडं केवळ तीन दिवसांचा कार्यक्रम म्हणून पाहता येणार नाही. विद्यार्थ्यांना अंतराळ आणि विज्ञानाकडं वळवण्यापासून ते संशोधक, स्टार्टअप आणि उद्योगांना एकत्र आणण्यापर्यंतचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्राला स्पेस टेकच्या नकाशावर ठळकपणे आणण्यासाठी सरकारनं उद्योगांसाठी जमीन, स्टार्टअप्ससाठी सुविधा आणि नव्या गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आता ‘स्पेसफेस्ट’च्या माध्यमातून या प्रयत्नांना किती प्रत्यक्ष उद्योग आणि रोजगाराची जोड मिळते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :

