ETV Bharat / state

वीर धरण 87.27 टक्के भरलं; पूरनियंत्रणासाठी नीरा नदीत 6,037 क्यूसेक विसर्ग सुरू

वीर धरण (Veer Dam) 87.27 टक्के भरलं असून पूरनियंत्रणासाठी नीरा नदीत (Nira River) 6,037 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

वीर धरण
Veer Dam (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 8, 2026 at 8:32 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

बारामती : नीरा खोऱ्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं वीर धरणातील (Veer Dam) पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून धरणात 8.28 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळं धरण 87.27 टक्के भरलं असून संभाव्य पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि धरणाचं सुरक्षित व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनं धरण पूर्ण क्षमतेनं भरण्यापूर्वीच बुधवारी (दि.8) सायंकाळी 6 वाजल्यापासून नीरा नदीपात्रात 6,037 (Nira River) क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.


पाण्याचा विसर्ग सुरू : नीरा उजवा कालवा विभाग, फलटण यांच्या माहितीनुसार, धरणाच्या सांडव्यावरून 4,637 क्यूसेक तर एस्केपमधून 1,400 क्यूसेक असा एकूण 6,037 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार विसर्गात वाढ अथवा घट केली जाऊ शकते, असंही विभागानं स्पष्ट केलं आहे. वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह नीरा देवघर, भाटघर आणि गुंजवणी धरण परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळं धरणातील पाणीसाठा झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळं भविष्यात अचानक पूरस्थिती निर्माण होऊ नये, तसेच अतिरिक्त पाण्याचं नियोजनबद्ध व्यवस्थापन करता यावं, यासाठी धरण पूर्ण भरण्यापूर्वीच नदीपात्रात टप्प्याटप्प्याने विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वीर धरण 87.27 टक्के भरलं (ETV Bharat Reporter)


नागरिकांनी नदीपात्रात जाणं टाळावं : दरम्यान, नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदीपात्रात जाणं टाळावं, जनावरे व शेतीसाठी ठेवलेले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी

  • नदीपात्रात उतरू नये.
  • नदीकाठावरील जनावरे व साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे.
  • सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे.
  • प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
  • अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे.



नीरा नदीवर अवलंबून लाखो हेक्टर शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योग : वीर धरणातून सोडले जाणारे पाणी केवळ नीरा नदीपुरते मर्यादित नसून, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील विस्तीर्ण भागासाठी जीवनदायी ठरते. नीरा नदीच्या पाण्यावर पुरंदर, बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यांतील लाखो हेक्टर शेती अवलंबून आहे. ऊस, डाळिंब, द्राक्षे, भाजीपाला, गहू व इतर नगदी पिकांसाठी हे पाणी महत्त्वाचे मानले जाते. याशिवाय नदीकाठच्या अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, विविध औद्योगिक क्षेत्रांची पाण्याची गरज, तसेच पशुधनासाठी पाणी या सर्व गरजा नीरा नदीच्या प्रवाहावर अवलंबून आहेत. त्यामुळे वीर धरणातील पाण्याचे नियोजन आणि वेळोवेळी करण्यात येणारा विसर्ग हा केवळ धरणाच्या सुरक्षिततेसाठी नव्हे, तर संपूर्ण नीरा खोऱ्यातील जलव्यवस्थापन आणि पूरनियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

हेही वाचा -

  1. नीरा नदीच्या पाणी पातळीत वाढ; चारही धरणांच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग!
  2. पंढरपूरमधील चंद्रभागा वाळवंटातील अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा; पाहा व्हिडिओ - Pandharpur
  3. वीर धरण पूर्ण भरले; नीरा नदी पात्रात १९५० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू