रायगडला पुन्हा पुराचा वेढा अन् मगरीचा थरार, महाड तालुक्यात रस्त्यावर मगरीचा मुक्त संचार
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळं नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीचं पाणी ओसरल्यानंतर महाकाय मगर नदीपात्रातून बाहेर पडून थेट नागरी वस्तीत आली आहे.

Published : July 8, 2026 at 1:34 PM IST
रायगड : रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा पुराची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील सावित्री, अंबा आणि कुंडलिका या प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. महाड, नागोठणे आणि रोहा शहरात पुराचं पाणी शिरल्यानं अनेक सखल भाग जलमय झाला असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. रविवार आणि सोमवारी जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर मंगळवारी पावसानं काहीशी विश्रांती घेतल्यानं परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचं चित्र होतं. मात्र, बुधवारी पहाटेपासून पुन्हा पावसाचा जोर वाढल्यानं जिल्ह्यावर पुन्हा पुराचं संकट ओढवलं आहे.
नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ : रायगड जिल्ह्यात बुधवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळं अनेक नद्या आणि नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. सावित्री, अंबा आणि कुंडलिका नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुराचं पाणी शिरलं घरात : महाड शहरातील अनेक सखल भागांमध्ये पुराचं पाणी शिरलं असून काही रस्ते जलमय झाले आहेत. नागोठणे आणि रोहा शहरातही पाणी शिरल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसल्यानं नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.
वाहतूकीवर झाला परिणाम : सततच्या पावसामुळं जिल्ह्यातील अनेक लहान-मोठे ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळं काही अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचलं असून वाहतूकीवर परिणाम झाला आहे. नदीकाठच्या भागातील नागरिकांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी : जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि बचाव पथके सतर्क असून परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून आहेत. सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी करण्यात आली आहे. तसेच नदीकाठ, पूल आणि जलमय रस्त्यांवरून प्रवास टाळण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
रायगड जिल्ह्यावर पुन्हा पुराचं संकट : रविवार आणि सोमवारी आलेल्या पुरानंतर मंगळवारी परिस्थिती काहीशी पूर्वपदावर येत असल्याचे चित्र होते. मात्र अवघ्या एका दिवसाच्या विश्रांतीनंतर बुधवारी पुन्हा मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं रायगड जिल्ह्यावर पुन्हा पुराचं संकट कोसळलं आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांतही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिल्यानं प्रशासन अधिक सतर्क झाले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
महाड तालुक्यातील बिरवाडी शहरात मगरीचा मुक्त संचार: रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील बिरवाडी येथे पूर ओसरल्यानंतर एक महाकाय मगर थेट मुख्य रस्त्यावर फिरताना आढळली, ज्यामुळं स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
हेही वाचा -

