ETV Bharat / state

9 महिन्यांची गरोदर असताना उमेदवाराचा निवडणुकीत पायी प्रचार; मतदारांकडून आस्थेवाईकपणानं प्रकृतीची होतेय विचारपूस

9 महिन्यांच्या गरोदर असताना उमेदवार गीतांजली या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी पायी चालत आहेत. आरोग्य सांभाळत निवडणूक जिंकणारच असा त्यांनी विश्वास व्यक्त केलाय.

9 month pregnant congress candidate Geetanjali Hawaldar
9 महिन्यांची गरोदर उमेदवार गीतांजली हवालदार (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 7, 2026 at 7:59 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

कोल्हापूर - राज्यभरात 29 महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. प्रभागांमध्ये प्रचार शिगेला पोहोचला असून मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी पायाला भिंगरी बांधली आहे. मात्र, कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत नऊ महिन्यांची गरोदर माता अवघडलेल्या अवस्थेतही मतदारांना साद घालत आहे. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधून काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर गीतांजली हवालदार या निवडणूक लढवत आहेत.

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक यंदा बहुसदस्यीय पद्धतीनं होत असल्यामुळे चार नगरसेवकांचा एक प्रभाग झाला आहे. 15 ते 20 हजार मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची दमछाक होत आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असल्यानं आता प्रचारासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. यामुळे दिवस-रात्र एक करून उमेदवार मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

गरोदरपणात उमेदवाराचा कसा सुरू आहे प्रचार? (Source- ETV Bharat Reporter)

कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 जवाहर नगर या प्रभागातून राष्ट्रीय काँग्रेसच्या चिन्हावर गीतांजली महेश हवालदार या निवडणूक लढवत आहेत. लग्नापूर्वी एका खासगी संस्थेत शिक्षिका म्हणून सेवा बजावलेल्या गीतांजली यांचे पती महेश हवालदार समाजकार्यात सक्रिय आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत सर्वसाधारण गटातून गीतांजली यांना उमेदवारी मिळाली आहे. नऊ महिन्यांची गरोदर माता असूनही प्रभागात मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी रोजचा चार किलोमीटर त्या पायी प्रवास करतात. उच्चशिक्षित असल्यानं गीतांजली यांना प्रभागातील समस्यांची चांगली जाण आहे. "समस्या सुटल्या पाहिजेत. जनसामान्यांना महापालिकेच्या सर्व सुविधा मिळाव्यात, या दृष्टिकोनातूनच महापालिका निवडणुकीच्या रणांगणात आपण उतरले आहे", असे गीतांजली यांनी सांगितलं.

ज्या ठिकाणी प्रचाराला जाईन तिथं कोल्हापूरकरांच्या माणुसकीचं दर्शन मला होतं. माझ्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे माझे मतदार चौकशी करतात. ज्या घरात जाईल, त्या ठिकाणी तुम्ही काळजी करू नका. तब्येतीची काळजी घ्या असाही सल्ला मतदार देतात- प्रभाग 18, काँग्रेस उमेदवार, गीतांजली उमेदवार



प्रभागात फिरताना माहेरला आल्याची भावना- पन्हाळा तालुक्यातील कोतोली-कनेरी माहेर असलेल्या गीतांजली पाच वर्षांपूर्वी विवाह होऊन कोल्हापुरात आल्या होत्या. त्यापूर्वी त्यांनी एका खासगी संस्थेत शिक्षिका म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. गरोदरपणाच्या काळात निवडणुकीची जबाबदारी पेलताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत घराघरातील माता-भगिनी आपली काळजी घेतात. त्यामुळे मला प्रभागात कोणत्याही घरात गेल्यानंतर माहेरवाशीन असल्याचा अनुभव येतो, अशी भावना गीतांजली यांनी व्यक्त केली. प्रचारासाठी आता अवघे काही दिवसच बाकी असताना प्रभागातील सर्व मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही यावेळी गीतांजली महेश हवालदार यांनी सांगितलं. नऊ महिन्यांची गरोदर माता असूनही निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या गीतांजली हवालदार यांचं करवीर संस्थानच्या छत्रपती ताराराणी यांचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापुरात कौतुक होत आहे.


हेही वाचा-