Maharashtra Monsoon Update : राज्यात किमान 10 जूनपर्यंत बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही
सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. 1 जूनपासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल.

Published : May 31, 2026 at 6:51 PM IST
मुंबई Maharashtra Weather Update - राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य व्यक्ती उकाड्याने त्रासले आहेत. सर्वजण आता मान्सूनकडे डोळे लावून बसले आहेत. शेतकऱयांनीही मान्सूनपूर्वी शेतीची कामे उरकून पावसाची वाट पाहत आहेत. राज्यात पाऊस नेमका कधी येणार याबाबतची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यात किमान 10 जूनपर्यंत बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही. 1 जूनपासून वादळी पावसाचा अंदाज आहे, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
नेमका कुठे - कुठे पडणार पाऊस? - सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. 1 जूनपासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपारनंतरचे ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकणात देखील काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे.
विदर्भात तापमान कायम - याचबरोबर मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात घट होईल, मात्र विदर्भातील काही भागांमध्ये, प्रामुख्याने पूर्व विदर्भ, कमाल तापमान 40 अंशाच्या वर कायम राहील. आगामी वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळात पोहोचलेला नाही. सध्याच्या स्थितीनुसार, राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही.
कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन - कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून शेतकऱ्यांना आणि लोकांना आवाहन करण्यात येत आहे की, संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून आणि मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये. विजेच्या कडकडाटाच्यावेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशावेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्याजवळ उभे राहणे टाळावे.
हेही वाचा - यंदा हवामानाचा दुहेरी फटका: मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी; जूनमध्ये उष्णतेच्या अधिक लाटा येण्याचा अंदाज

