बारावीचा निकाल 2 मे रोजी होणार जाहीर; जाणून घ्या, कुठे पाहावा ऑनलाईन निकाल?
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचे निकाल 2 मे रोजी (शनिवार) जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहेत.

Published : April 30, 2026 at 10:40 PM IST
|Updated : April 30, 2026 at 10:55 PM IST
पुणे- बारावीच्या निकालाची प्रतीक्षा आता संपणार आहे. शिक्षण मंडळ कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे निकाल प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे लाखो विद्यार्थी आणि पालक संभ्रमात सापडले असताना बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे.
मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर 2 मे, 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत.
1. https://results.digilocker.gov.in
2. https://mahahsscboard.in
3. https://hscresult.mkcl.org
4. https://results.targetpublications.org
5. https://results.navneet.com
- शिक्षण मंडळाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होतील. तसेच माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in ( in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल. ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) विद्यार्थ्याना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्यानं संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.
- गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी 3 मे 2026 ते रविवार दिनांक 17 मे 2026 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीनं शुल्क Debit Card/ Credit Card/UPI/ Net Banking याद्वारे भरता येईल. फेब्रुवारी-मार्च 2026 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणं अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे मंडळानं आवाहन केलं आहे.
- फेब्रुवारी-मार्च 2026 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) पैरीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून-जुलै 2026, फेब्रुवारी-मार्च 2027 व जून-जुलै 2027) श्रेणी / गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.
- जून-जुलै 2026 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीनं आवेदनपत्रे भरुन घेण्याच्या तारखांचे परिपत्रक स्वतंत्रपणं काढण्यात येणार आहे.
3387 मुख्य केंद्रावर घेण्यात आली होती परीक्षा -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक इयत्ता बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण 15,32,487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. त्यामध्ये 8,20,229 मुले, 7,12,240 मुली आणि 18 ट्रान्सजेंडर होते. एकूण 10,664 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी होती. परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याध्यर्थ्यांसाठी 3387 मुख्य केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
हेही वाचा-

