ETV Bharat / state

सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळ परिसरात नमाज अदा करण्याची परवानगी देता येणार नाही, राज्य सरकारची हायकोर्टात भूमिका

यासंदर्भातील याचिकेवर न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुन्नीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

High Court
मुंबई हायकोर्ट (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 26, 2026 at 8:03 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज डोमेस्टिक विमानतळ परिसरात म्हणजेच टी-1 जवळ सुरक्षेच्या कारणास्तव एकाचवेळी हजारो लोकांना नमाज अदा करण्याची परवानगी देता येणार नाही, असं राज्य सरकारनं गुरूवारी (26 फेब्रुवारी) मुंबई हायकोर्टात स्पष्ट केलं. यासंदर्भातील याचिकेवर न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुन्नीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी रमजानच्या महिन्यातील नमाज अदा करण्याकरता आसपासच्या परिसरातील मशिदींचा वापर करता येऊ शकतो, असा पर्याय विमानतळ प्रशासनानं हायकोर्टाला सुचवलाय. मात्र सुरक्षेसोबत कोणतीही तडजोड न करता त्याच परिसरात तात्परत्या स्वरूपात नमाज अदा करण्यासाठी पर्यायी जागा देता येईल का?, यावर 5 मार्चच्या पुढील सुनावणीत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत.


काय आहे प्रकरण? : साल 1995 पासून गेल्या तीन दशकांपर्यंत या परिसरात अस्तित्त्वात असलेली नमाज अदा करण्यासाठीची एक तात्पुरती शेड एमएमआरडीएनं एप्रिल 2025 मध्ये तोडली. त्यामुळं रमजानच्या महिन्यात होणारा त्रास वाचवण्यासाठी या परिसरात गेली 30 वर्षे उपलब्ध असलेली रमजानची नमाज अदा करण्यासाठी ही शेड तातडीनं पुन्हा बांधून द्यावी, अशी मागणी करत येथील तब्बल दोन हजार रिक्षा-टॅक्सी आणि ओला-उबर चालकांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीय. या ठिकाणी केवळ रिक्ष टॅक्सी चालकच नाही तर आसपासच्या हॉटेलात तसंच विमानतळावर काम करणारे, विमानतळावर ये-जा करणारे हजारो मुस्लीम बांधवही नमाज अदा करतात, अशी माहिती याचिकाकर्त्यांकडून कोर्टाला देण्यात आली. यावर मानवतेच्या दृष्टीनं विचार केल्यास संभाव्य संघर्ष टाळता येईल, अशी सूचना हायकोर्टानं प्रशासनाला केलीय.


राज्य सरकारकडून सुरक्षेच्या मुद्यावर परवानगी देण्यास नकार : याबाबत राज्य सरकारच्यावतीनं उत्तर देताना सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी कोर्टाला सांगितलं की, टी- 1 च्या गेट नंबर 9 जवळ अशी जागा उपलब्ध आहे. मात्र हा व्हीव्हीआयपी गेट असून दिवसभर इथं अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची येजा सुरू असते. अशावेळी तिथं दिवसातून पाचवेळा एकाचवेळी 1500 ते 2000 लोकं जमू लागली तर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना परिस्थिती हाताळणं कठीण होऊन बसेल. त्यामुळं सुरक्षेच्या कारणास्तव इथं तात्पुरती शेड टाकून नमाज पठणाला परवानगी देता येणार नाही. याकरता याचिकाकर्ते आसपसाच्या परिसरातील मशिदींचा वापर करू शकतात. या परिसरात 1 ते 3 किमीच्या परिघात तीन मशिदी उपलब्ध आहेत. ज्या 15 ते 20 मिनिटांच्या पायी अंतरावर आहेत. तसंच या लोकांकडे स्वतःची रिक्षा किंवा टॅक्सी आहे, त्यामुळं त्यांना तिथं ये-जा करण्यात काहीच अडचण नाही.


हायकोर्टाचे निर्देश काय? : दरम्यान, या याचिकेवर न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुन्नीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावर हा अतिशय संवेदनशील विषय असल्यानं एमएमआरडीएनं मानवतेच्या दृष्टीकोनातून विमानतळ परिसरात नमाज अदा करु द्यावा. कारण या रिक्षा-टॅक्सी चालकांनी जर आंदोलनाच्या पवित्र्यात जर प्रवाशांची भाडी नाकारल्यास प्रवाशांचे प्रचंड हाल होतील. तेव्हा याचा गांभीर्यानं विचार करत या परिसरात तात्पुरती पर्यायी जागा देण्याचा विचार करवा, असे निर्देश देत हायकोर्टानं ही सुनावणी 5 मार्चपर्यंत तहकूब केलीय.


हेही वाचा :

  1. मरिन ड्राईव्हनंतर बारामती पोलिसांकडूनही एफआयआर नाही; रोहित पवार म्हणाले,'पोलिसांचे चेहरे पाहूनही दबाव जाणवतो'
  2. टिपू सुलतान आणि शिवाजी महाराज तुलना वादग्रस्त; इतिहासाच्या मांडणीवरून विधानसभेत खळबळ
  3. फळबाग कशी जोपासायची? कीटकनाशकांच्या फवारणीनं मधमाशांचा मृत्यू; डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात