ETV Bharat / state

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सेवानिवृत्त; वादग्रस्त कारकिर्दीला सन्मानपूर्वक निरोप: मुख्यमंत्र्यांनी केला गौरव

महाराष्ट्र पोलीस दलाच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सेवानिवृत्त झाल्या आहेत. आज नायगाव इथल्या मैदानावर त्यांना निरोप देण्यात आला.

First Woman DGP Rashmi Shukla
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सेवानिवृत्त (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 3, 2026 at 4:30 PM IST

|

Updated : January 3, 2026 at 10:41 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला शनिवारी सेवानिवृत्त झाल्या. यानिमित्तानं नायगाव पोलीस ग्राउंडवर रश्मी शुक्ला यांना निवृत्तीनिमित्त प्रतिष्ठेची 'गार्ड ऑफ ऑनर' मानवंदना देण्यात आली. 1988 बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक होत्या. "राज्यात दोन वर्षाच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली, याचा अभिमान आहे," असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रश्मी शुक्ला यांच्या सेवेनिमित्त गौरवोद्गार काढून त्यांना शुभेच्छा दिल्या.

First Woman DGP Rashmi Shukla
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सेवानिवृत्त (ETV Bharat Reporter)

रश्मी शुक्ला यांची वादग्रस्त कारकिर्द : महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणात गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र राज्यात सत्तापालट होताच दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यात आले. याशिवाय विधानसभा निवडणुकीच्या काळात विरोधीपक्षांनी रश्मी शुक्ला यांच्यावर पक्षपाताचे आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगानं त्यांची बदली केली. पुढं भाजपा सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वर्णी लावण्यात आली.

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सेवानिवृत्त; वादग्रस्त कारकिर्दीला सन्मानपूर्वक निरोप: मुख्यमंत्र्यांनी केला गौरव (ETV Bharat Reporter)

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली याचा अभिमान - रश्मी शुक्ला : नायगाव इथल्या समारंभात रश्मी शुक्ला यांनी आपल्या भाषणात सर्वांचे आभार मानले. "तब्बल 37.5 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त होत असल्याचा अभिमान आहे. गेली दोन वर्ष आपल्याला महाराष्ट्र पोलिसांची सेवा करण्याची संधी मिळाली. या कार्यकाळात राज्यातील कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहिली. सगळे सणवार देखील व्यवस्थित पार पडले, याचा आपल्याला अभिमान आहे. या कार्यकाळात झालेल्या निवडणुकाही शांततेत पार पडल्या. हे सारं यश केवळ एका व्यक्तीचं नाही, तर संपूर्ण पोलीस दलाचं आहे. या कार्यकाळात गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागांची स्थितीही सुधारली. तिथल्या नक्षलवाद्यांची संख्या देखील कमी होतेय, याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे," असं यावेळी रश्मी शुक्ला यांनी सांगितलं.

First Woman DGP Rashmi Shukla
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सेवानिवृत्त , सदानंद दातेंनी स्वीकारला पदभार (ETV Bharat Reporter)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला गौरव : नायगाव इथल्या सोहळ्यानंतर रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील त्यांच्या 'वर्षा' या शासकिय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रश्मी शुक्ला यांचं त्यांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी पोलीस कारकिर्दीबद्दल अभिनंदन केलं. महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात त्यांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी गौरव केला. प्रशासकीय सेवेतील त्यांचा अनुभव आणि कर्तव्यनिष्ठा राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस आणि सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या.

First Woman DGP Rashmi Shukla
सदानंद दातेंनी घेतला पदभार (ETV Bharat Reporter)

सदानंद दाते यांची पोलीस महासंचालक पदी वर्णी : महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदावरून रश्मी शुक्ला यांच्या निवृत्तीनंतर कोणाची नियुक्ती केली जाणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले. गृह खात्याकडून सात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावं मंजुरीसाठी यूपीएससीकडं पाठवण्यात आली होती. सदानंद दाते यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजीव कुमार सिंगल, पोलीस महासंचालक (विधी व तांत्रिक) संजय वर्मा, पोलीस महासंचालक (पोलीस गृहनिर्माण) अर्चना त्यागी, नागरी संरक्षण दलाचे संचालक संजीव कुमार, गृहरक्षक दलाचे महासमादेशक रितेश कुमार, पोलीस महासंचालक (रेल्वे पोलीस) प्रशांत बुरडे या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश होता. अखेर सदानंद दाते यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. सदानंद दाते राज्याचे 48 वे पोलीस महासंचालक आहेत.

First Woman DGP Rashmi Shukla
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सेवानिवृत्त (ETV Bharat Reporter)

मुंबई दहशतवादी हल्ल्याविरोधात सदानंद दातेंनी गाजवलं शौर्य : सदानंद दाते यांनी मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. ते भारतीय पोलीस सेवेचे 1990 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. तसेच पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याच्या तपासाचं नेतृत्वही त्यांच्याकडंच होतं. सदानंद दाते यांची 1 एप्रिल 2024 रोजी‘एनआयए’च्या महासंचालकपदी नियुक्ती झाली. त्याआधी ते महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख होते. तसेच त्यांनी मुंबईतील सहपोलीस आयुक्त (गुन्हे) यासह अनेक महत्त्वाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली. केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेल्यानंतर त्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दल आणि कायदा व न्याय विभागात संयुक्त सचिव म्हणूनही काम केलं. राज्याचे पोलीस प्रमुख म्हणून त्यांना डिसेंबर 2027 पर्यंतचा दोन वर्षांचा कार्यकाळ मिळेल. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) प्रमुख राहिलेले सदानंद दाते हे आता महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाची सूत्र सांभाळतील. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं सदानंद दाते यांना महाराष्ट्र केडरमध्ये परतण्यास मंजुरी दिली. त्यानंतर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी त्यांची नेमणूक जवळपास निश्चित झाली होती. सदानंद दाते यांच्या मुदतीपूर्व प्रतिनियुक्तीच्या गृह मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी देत त्यांना त्यांच्या मूळ महाराष्ट्र कॅडरमध्ये परत पाठवलं जात असल्याचं केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशातून स्पष्ट करण्यात आलं होतं.

First Woman DGP Rashmi Shukla
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सेवानिवृत्त (ETV Bharat Reporter)

हेही वाचा :

  1. रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती; विरोधकांना सरकारची चपराक
  2. सरकारला मोठा धक्का ; रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश
  3. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला पक्षपाती, तत्काळ हटवण्याची नाना पटोले यांची निवडणूक आयोगाकडे तिसऱ्यांदा मागणी
Last Updated : January 3, 2026 at 10:41 PM IST