'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद; २५ कोटींच्या दाव्यावर अभिनेत्री दीपाली सय्यद म्हणाल्या...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटावरून वाद सुरू आहे. यावर आता अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी भूमिका मांडली आहे.

Published : July 7, 2026 at 9:06 PM IST
पुणे : नुकतंच नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू असून, या घटनेच्या आधारे 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' हा चित्रपट लवकरच राज्यात येत असून या आगामी चित्रपटावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. असं असताना या चित्रपटावर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता आणि मुख्य अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यावर २५ कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
यावर अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया देत सत्य दाखवण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, अस म्हटलं आहे. पुण्यात मंगळवारी आगामी महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स हा चित्रपटाबाबत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली.
यावेळी अभिनेत्री दीपाली सय्यद म्हणाल्या की, आमच्यावर २५ कोटींचा दावा ठोकण्यात आला आहे. ज्या व्यक्तीने हा दावा केला आहे, त्यांच्यावर मला हसू येत आहे. कारण, हा चित्रपट कोणाच्याही वैयक्तिक जीवनावर आधारित नाही. हे कोणाचे आत्मचरित्र नाही आणि यामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा वापर करण्यात आलेला नाही. हा चित्रपट केवळ आणि केवळ महाराष्ट्रात चाललेल्या भोंदूगिरीवर आणि त्या भोंदूगिरीला बळी पडून कित्येक महिलांचे आयुष्य आणि संसार कसे उद्ध्वस्त झाले आहेत यावर प्रकाशझोत टाकणारा आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, महिलांमध्ये या गोष्टीची जनजागृती व्हावी, त्यांना ज्ञात व्हावे म्हणूनच आम्ही हा चित्रपट बनवत आहोत. अशावेळी आमच्यावर जर अशी रोखठोक केली जात असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. आम्ही कायदेशीर प्रक्रियेला घाबरत नाही. जे काही असेल त्याला आम्ही कोर्टात नक्कीच उत्तर देऊ.
"एक कलाकार म्हणून अभिनय करून समाजात घडणारे सत्य लोकांसमोर आणणे हे आमचे कर्तव्य आहे. चित्रपट हेच असे माध्यम आहे ज्यातून आपण लोकांपर्यंत चांगले-वाईट आणि सत्य पोहोचवू शकतो. महिलांचे होणारे शोषण आणि अत्याचार थांबवण्यासाठी आम्ही आवाज उठवत राहू आणि यासाठी आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही," अशी रोखठोक भूमिका अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी मांडली.
हेही वाचा - 'रुपाली चाकणकरांचे 177 कॉल अशोक खरातला, तरीही त्यांना का ताब्यात घेतलं जात नाही?' सुषमा अंधारे यांचा सवाल

