'शिर्डी साईबाबा संस्थान'मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा; 54 आदर्श कर्मचाऱ्यांचा गौरव
शिर्डीत आज महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Published : May 1, 2026 at 3:06 PM IST
शिर्डी : येथील साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आयोजित संयुक्त कार्यक्रम आज शुक्रवारी (1 मे) उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते ध्वजारोहणानं झाली. या प्रसंगी संस्थानच्या विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 54 कर्मचाऱ्यांचा ‘आदर्श कर्मचारी’ म्हणून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना गाडीलकरांनी संस्थानच्या प्रगतीत कर्मचाऱ्यांचं योगदान महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन सेवा व सुविधांमध्ये सातत्यानं वाढ करण्यात येत असल्याचं त्यांनी नमूद केलं. तसेच, मागील वर्षभरात राबविण्यात आलेल्या सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांचा आढावा घेत संस्थानच्या कार्याचा विस्तार स्पष्ट केला.
विद्यार्थ्यांच्या कामगिरीचं कौतुक : साईबाबा संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल त्यांच्या कामगिरीचं विशेष कौतुक करण्यात आलं. यावर्षीपासून अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी NEET व JEE परीक्षांसाठी मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. तसेच बाह्यस्त्रोतावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांना ESIC रुग्णालय सेवेचा लाभ मिळावा यासाठीचा प्रस्ताव प्रगतिपथावर असल्याची माहिती देण्यात आली.
विविध विभागांतील 54 कर्मचाऱ्यांचा सन्मान : कार्यक्रमात साईबाबा संस्थानमधील विविध विभागांतील 54 कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र, शाल व साई दिनदर्शिका देऊन सन्मानित करण्यात आलं. यामध्ये डॉ. एन. रामप्रसन्ना नाईक, डॉ. अजिंक्य पानगव्हाणे, राजेंद्र कोते, किशोर गवळी, योगेश सोनवणे, सुनिल साखरे, राहुल गोडगे, बबन वाघे, बेबीताई नागरे, पंढरीनाथ ठुबे, बाबासाहेब बढे, देवराम धाकतोडे, म्हाळू सोनवणे, आसाराम गोरे, अशोक गोतृक्ष, सचिन जाधव, राहुल वाणी, केशव उदावंत, अनिल गाढवे, प्रदीप डांगे, राजेंद्र नन्नवरे, बापूसाहेब गायके, चंद्रशेखर धनवटे, केशव मोरे, अनिल सोमवंशी, अलका खैरनार, शरद कोते आदींचा समावेश होता.
तसेच साईबाबा शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी श्लोक सचिन गिते याची किर्गिस्तान इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय केटलबेल स्पर्धेसाठी, तर वंश रुपेश जाट याची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थानचे अधिकारी, कर्मचारी व भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

