राज्यात एका वर्षात तब्बल 41 वाघांचा मृत्यू, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती
वाघांच्या मृत्यूच्या वाढत्या घटनांबाबत विधानसभेत लेखी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

Published : February 25, 2026 at 6:42 PM IST
मुंबई : राज्यात 2025 या वर्षात विविध कारणांनी एकूण 41 वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी (25 फेब्रुवारी) विधानसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. यापैकी 28 वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणांनी झाला असून 8 वाघ अपघातात दगावले. तर विजेचा धक्का लागून 4 वाघांचा मृत्यू झाला, तर 1 वाघ शिकारीत मारला गेल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केलं.
विधानसभेत लेखी प्रश्न : वाघांच्या मृत्यूच्या वाढत्या घटनांबाबत विधानसभेत लेखी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. वीजप्रवाह, शिकार आणि अपघातांमुळं होणारे मृत्यू रोखण्यासाठी शासनानं कोणती उपाययोजना केली आहे, याबाबतही माहिती मागविण्यात आली होती. यावर रेल्वे अपघात टाळण्यासाठी नव्या प्रस्तावित रेल्वेमार्गांवरील जंगल पट्ट्यात वन्यप्राण्यांच्या हालचालीसाठी अंडरपास व ओव्हरपास उभारण्याच्या सूचना रेल्वेला देण्यात आल्या आहेत. तसंच संवेदनशील क्षेत्रात रेल्वेचा वेग ताशी 40 किमीपर्यंत मर्यादित ठेवण्याबाबतही निर्देश देण्यात आल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी यांनी सांगितलं.
व्याघ्र संरक्षण दलामार्फत नियमित गस्त : शिकार रोखण्यासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दलामार्फत नियमित गस्त घालण्यात येत आहे. परिक्षेत्र स्तरावर खबऱ्यांची नेमणूक, अतिसंवेदनशील भागांत बिनतारी संदेश यंत्रणा, तसंच तपासणी नाके उभारून वाहनांची तपासणी केली जात आहे. याशिवाय, वाघ व बिबट्यांच्या अस्तित्वाचा मागोवा घेण्यासाठी पंधरवड्याचा कार्यक्रम राबविण्यात येतो. गावालगतच्या मुसाफिरांच्या तळांची तपासणी, वाघांच्या भ्रमणमार्गांवर आणि पाणवठ्यांवर कॅमेरा ट्रॅप बसविणे, तसंच पाण्यात विषप्रयोग होऊ नये, यासाठी नियमित पाहणी, अशा उपाययोजना सुरू असल्याचंही वनमंत्री गणेश नाईक यांनी यांनी लेखी उत्तरात नमूद केलं.
उपाययोजना तातडीने हाती घेण्याची आवश्यकता : राज्यातील व्याघ्र प्रकल्प आणि संरक्षित क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात असताना वाघांच्या मृत्यूच्या घटना घडत राहणे, ही गंभीर बाब मानली जात आहे. वन्यजीव अभ्यासकांच्या मते, मानव–वन्यजीव संघर्ष आटोक्यात आणणे, वाघांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सतत देखरेख वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. पर्यावरणीय साखळीत वाघ हा सर्वोच्च घटक मानला जातो. त्यामुळं वाघांचे संरक्षण म्हणजे संपूर्ण जंगलव्यवस्थेचे संरक्षण होय. मृत्यूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं अधिक ठोस आणि परिणामकारक उपाययोजना तातडीने हाती घेण्याची आवश्यकता अधोरेखित होत आहे.
हेही वाचा :
- अजित पवार विमान अपघाताच्या चौकशीत नवा ट्विस्ट, DGCA नं VSR व्हेंचर्सच्या चार लिअरजेट विमानांवर बंदी घातली
- एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांनी दिलेला शब्द पाळला
- राज्यातील 99 लाख अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आणि मच्छीमारांना दिलासा; 15,661 कोटींची थेट मदत बँक खात्यात जमा

