'होळी लहान करा, पोळी दान करा', अंनिस राज्यभर राबवणार पर्यावरण पूरक होळी अभियान
होळी सणाच्या निमित्ताने महाराष्ट्र अंनिसच्या वतीने यंदाही सामाजिक भान जपणारा आणि पर्यावरण पूरक उपक्रम राबवला जाणार आहे. गेल्या २० वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.

Published : February 28, 2026 at 8:58 PM IST
सातारा : राज्यभारत मंगळवारी (३ मार्च) होळीचा सण साजरा होणार आहे. समाजात मोठ्या प्रमाणात कुपोषण आणि गरिबी असताना पौष्टिक अन्न असलेली पुरणाची पोळी होळीमध्ये न टाकता गोरगरीब कुटुंबाना पोळी दान करून सण साजरा करा. तसेच होळीमध्ये लाकूड जाळण्याऐवजी कचरा गोळा करून समाजातील हिंसाचार, भ्रष्टाचार, व्यसन, अंधश्रद्धेसारख्या वाईट प्रवृत्तींचा पुतळा करून तो जाळण्याचं आवाहन महाराष्ट्र अंनिसनं केलं आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात महाराष्ट्र अंनिसनं म्हटलंय की, "होळीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात लाकूड तोड करून लाकडं जाळली जातात. त्यातून मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होते. तसेच होळीच्या निमितानं काही अनिष्ट प्रथा पाहायला मिळतात. अपशब्द वापरले जातात. त्यामुळे अनेक ठिकाणी तंटे निर्माण होतात. अशा प्रथांना फाटा दिला पाहिजे. डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या नेतृत्वातून साकारलेला पर्यावरण पूरक होळीचा उपक्रम गेली २० वर्षे अंनिस राज्यभर राबवत आहे. होळीमध्ये लाकडं जाळण्याऐवजी आजूबाजूचा परिसर साफ करून गोळा केलेला कचरा जाळण्याचा एक पर्याय आहे. कचऱ्यापासून हिंसाचार, भ्रष्टाचार, व्यसन, अंधश्रद्धा, या वाईट प्रवृत्तींचा पुतळा करून तो जाळण्याचा पर्याय समाजात पुढं येत आहे. तसेच पर्यावरण पूरक होळीला शालेय मुलांचा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती अंनिसनं दिली आहे.
पर्यावरणाच्या वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर लोकांनी पर्यावरण पूरक होळी साजरी करून त्याला पोळी दान करण्याच्या उपक्रमाची जोड द्यावी, असं आवाहन अंनिसनं केलं आहे. सातारा शहरानजीकच्या वाढे गाव, खेड परिसरात 'पर्यावरण पूरक होळी' आणि 'होळी लहान करा, पोळी दान करा', या उपक्रमाचे डॉ. हमीद दाभोलकर, वंदना माने, उदय चव्हाण, डॉ. दीपक माने, प्रकाश खटावकर, विजय पवार, भगवान रणदिवे यांच्या पुढाकारानं आयोजन करण्यात आलं आहे.

