डोंबिवलीपाठोपाठ महाडमध्ये सरकारी अधिकाऱ्यावर कथित हल्ला! भाजपा नगरसेवकानं मुख्याधिकाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारल्याचा आरोप
महाड पालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना पाणीप्रश्नावरून भाजपा नगरसेवक सुरज बामणे व अन्य दोघांनी कथित मारहाण केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी पालिका कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं.

Published : July 9, 2026 at 6:24 PM IST
रायगड : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीची घटना ताजी असतानाच रायगड जिल्ह्यातील महाड नगरपालिकेतही सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याचा आरोप केला जात आहे. महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना पाणीप्रश्नावरून झालेल्या वादानंतर भाजपा नगरसेवक सुरज बामणे आणि अन्य दोघांनी कथितरित्या लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांविरोधात महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.9) महाड नगरपालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. मारहाण करणाऱ्यांना तातडीनं अटक करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. दरम्यान, मंत्री भरत गोगावले यांनीही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत कायदा हातात घेणं अयोग्य असल्याचं स्पष्ट केलं आहे.
लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप : महाड शहरातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून नागरिकांच्या तक्रारी घेऊन भाजपाचे नगरसेवक सुरज बामणे हे महाड नगरपालिकेत आले होते. यावेळी मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान शाब्दिक वाद झाला. हा वाद काही क्षणांतच उग्र बनत त्याचं रूपांतर हाणामारीत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी महाड पोलीस ठाण्यात भाजपा नगरसेवक सुरज बामणे आणि अन्य दोघांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
आरोपींना अटक करून कारवाई करावी : यानंतर महाड नगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सरकारी अधिकाऱ्यांवर सातत्यानं होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.9) महाड नगरपालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं. कार्यालयातील दैनंदिन कामकाज ठप्प झालं असून, मारहाण करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, राज्यभरातील कर्मचारी संघटनांकडूनही या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सरकारी कार्यालयात घडलेल्या या प्रकारामुळं प्रशासकीय यंत्रणेत चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी या संपूर्ण घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
अधिकाऱ्यांना मारहाण करणं चुकीचं : "नगरसेवकानं अधिकाऱ्याला मारहाण करणं पूर्णपणे चुकीचं आहे. काही तक्रार असेल तर त्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. ज्या कारणासाठी नगरसेवकानं ही भूमिका घेतली. त्या संदर्भातील वस्तुस्थिती प्रशासनाकडून जाणून घेणंही आवश्यक आहे. मात्र मारहाण कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरू शकत नाही. संबंधितांना त्यांच्या कृत्याचे परिणाम भोगावे लागतील," असं मंत्री भरत गोगावले म्हणाले आहेत.
हेही वाचा :
- डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर अटक; धिंड काढण्याची आदित्य ठाकरे यांची मागणी
- कोंबड्यांचं मोल्टिंग पाहिलं अन् शेतकऱ्याला सुचला शून्य खर्चात पुन्हा तुरीच्या उत्पादनाचा प्रयोग; बहरलं तुरीचं तुफान पीक
- विधानभवनावर शेतकऱ्यांचा मोर्चा; सोयाबीन-कापूस उधळून सरकारचा केला निषेध, रविकांत तुपकर ताब्यात

