राज्यसभा खासदारकीसंदर्भात संध्याकाळपर्यंत महाविकास आघाडी निर्णय घेणार- संजय राऊत
राज्यसभा खासदाराविषयी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षांनी आपापल्या भूमिका मांडल्यात. आता खासदार संजय राऊतांनी महत्त्वाचं विधान केलंय.

Published : March 4, 2026 at 12:18 PM IST
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडीचा राज्यसभा खासदार कोण होणार? या संदर्भात विविध चर्चा सुरू आहेत. राज्यसभा खासदाराविषयी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षांनी आपापल्या भूमिका मांडल्यात. अशात उद्या म्हणजेच 5 तारखेला फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस असताना याबाबत आज खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचं विधान केलंय.
आघाडी एकत्र असेल तर नक्कीच ही जागा निवडून येईल : यावेळी संजय राऊत म्हणाले की, राज्यसभेची एक जागा ही महाविकास आघाडीची आहे. महाविकास आघाडी एकत्रित आहे. आघाडी एकत्र असेल तर नक्कीच ही जागा निवडून येईल. शिवसेना महाविकास आघाडीतला मोठा पक्ष असला तरी देखील एकत्रित राहणं गरजेचं आहे. अशावेळी कालच जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. आज संध्याकाळपर्यंत महाविकास आघाडीचा निर्णय होईल, असे यावेळी राऊत म्हणालेत.
काही महिने नाही तर वर्षभर हे युद्ध चालणार : पत्रकारांनी आदित्य ठाकरेंनी केलेल्या ट्विटबद्दल विचारले असता ते म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये काय चूक आहे?. आदित्य ठाकरे आपल्या पक्षाची भूमिका मांडत असल्याचे यावेळी राऊत म्हणालेत. तर दुसरीकडे अमेरिका-इराक युद्धाविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, हे युद्ध जास्त काळ चालेल. काही महिने नाही तर वर्षभर हे युद्ध चालणार आहे. अमेरिकेने हे युद्ध सुरू केलं, मात्र युद्धात उतरून चूक केली, असं अमेरिकेला वाटू लागलंय.
ही कृती भारताच्या शिष्टाचाराला धरून नाही : तर दुसरीकडे एखाद्या राष्ट्रप्रमुखाची हत्या होते आणि आपण कोणत्याही प्रकारचा खेद व्यक्त करत नाही, ही कृती भारताच्या शिष्टाचाराला धरून नाही. यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाची हानी झाल्याचे पाहायला मिळत आहे, असेही यावेळी संजय राऊत म्हणालेत. याचबरोबर ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये तणाव वाढला नसल्याचंही यावेळी संजय राऊत म्हणालेत. मुंबई महानगरपालिकेतील वाटाघाटीवेळी राज ठाकरे नाराज झाले असतील तर त्यांची भेट घेऊ आणि नाराजी दूर करू, असे यावेळी संजय राऊत म्हणालेत.
हेही वाचाः
इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे अफवांना उधाण, छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल पंपांवर तुफान गर्दी

